Saturday, 24 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा ९६ वा आणि या वर्षाचा शेवटचा भाग असेल.

***

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. त्यांचं सकाळी पावणे अकरा वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर ते छावणी परिषदेच्या मैदानावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्यानं राबवल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहर स्वच्छता जनजागृती मोहिमेत मार्गदर्शन करतील आणि दुपारी सव्वा बारा वाजता विमानानं सोलापूरला रवाना होतील.

***

साताऱ्यातल्या माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाचा आज पहाटे सातारा जिल्ह्यात फलटण लोणंद रस्त्यावर अपघात झाला असून यात त्यांच्यासह चौघे जण जखमी झाले आहेत. ते प्रवास करत असलेलं वाहन आज पहाटे पावणे चार वाजेदरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बाणगंगा पुलावरुन खाली कोसळल्याचं पोलिसांनी सांगितलं.

***

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी बांगलादेश संघानं आपल्या दुसऱ्या डावात तीन बाद ६६ धावा केल्या आहेत. ढाका इथं सुरू या सामन्यात भारतानं पहिल्या डावात ९२ धावांची आघाडी घेतली आहे. 

***

राज्यात भारतीय जनता युवा मोर्चा उद्यापासून १२ जानेवारीपर्यंत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपासून ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती - १२ जानेवारी अर्थात राष्ट्रीय युवा दिनापर्यंत विविध स्पर्धा घेत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही माहिती दिली.

 

//*********//

No comments:

Post a Comment