Friday, 2 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा आज राज्यभरात उत्साहात साजरा होत आहे. रायगड किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासनातर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचं उद्घाटन झालं. शिवाजी महाराजांच्या चांदीच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं, पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रायगड किल्ल्यावर शिवप्रेमींनी गर्दी केली असून, जाणत्या राजाला अभिवादन केलं जात आहे.

***

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल, आज दुपारी एक वाजता होणार जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल.

***

मध्य प्रदेशातल्या अमरकंटक इथं सुरु असलेल्या ‘हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणं: शाश्वतता ही जीवन शैली बनवणं’, या विषयावरच्या वाय - 20 सल्लामसलत परिषदेचा आज समारोप होत आहे. भारत हा एक तरुण देश म्हणून उदयाला येत आहे, अशा वेळी भविष्याचा विचार करण्याच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग आवश्यक असल्याचं, केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी काल या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी सांगितलं.

***

भारतीय राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन संस्था - नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ- एन सी सी एफ यांच्या संयुक्त विद्यमानं, राज्यात उन्हाळी कांद्याच्या खरेदीला कालपासून सुरुवात झाली. नाशिक जिल्ह्यात उमराणे इथल्या उप बाजार समितीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते या खरेदीची सुरुवात करण्यात आली.

***

थायलंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि किरण जॉर्ज यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आज लक्ष्यचा सामना मलेशियाच्या लिओंग जुन हाओ याच्याशी, तर किरणचा सामना फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्ह याच्याशी होणार आहे.

 

//*************//

No comments:

Post a Comment