Sunday, 23 July 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २३ जूलै २०२३ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या केंद्रीकृत विमान सुरक्षा नियंत्रण केंद्राचं उद्घघाटन करण्यात आलं. वर्तमान सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करणं हा या केंद्राच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षेअंतर्गत येणाऱ्या ६६ विमानतळांशी संबंधित सर्व धमक्या, सामाजिक प्रसार माध्यमांवर येणाऱ्या अफवा आणि डेटावर हे नियंत्रण केंद्र नजर ठेवेल तसंच प्रवासी आणि वाहतुकीसंदर्भात विश्लेषणाची माहिती देईल. 

                                  ****
यमुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दिल्ली प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहे. यमुना नदी आज सायंकाळपर्यंत धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी दिल्लीत मदत शिबीरं उभारण्यात आली आहेत तसंच संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी दिल्ली प्रशासन सज्ज झालं आहे.

                                 ****

गुजरातमध्ये जुनागढसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचल्यानं पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जिल्हा प्रशासनाला आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, गुजरातच्या गीर सोमनाथ, जुनागढ, कच्छ, पोरबंदर आणि दक्षिण गुजरातमध्ये वलसाड आणि नवसारी भागात उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

                                 ****

ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्यानं सुरू असलेल्या पावसामुळं धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नदीलगतच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.

                                **** 

पावसामुळं अप्पर वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळं वर्धा नदीला पूर आला असून नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं चंद्रपूर - तेलांगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गावरील वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. याशिवाय काही अंतर्गत मार्गही बंद झाले आहेत.

दरम्यान, कोरपना तालुक्यातील अंतरगाव इथं पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शिराल्यामुळं  २२ गावच्या नदी लगतच्या शेत शिवाराला आणि गावाला  पाण्यानं वेढलं आहे. कोडशी इथले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अजय लटारी विधाते हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून एनडीआरएफचं पथक त्यांचा शोध घेत आहे.

                                    ****  

काल झालेल्या पावसामुळं अकोला राष्ट्रीय महामार्गावरील होलसेल किराणा बाजारात सुमारे दीडशे दुकानांना पाण्यानं वेढलं आहे. किराणा साहित्य, धान्य पाण्यात भिजल्यानं सुमारे १२ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनासह व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. किराणा बाजारात नव्यानंच बांधलेल्या नाल्या तुंबल्यामुळं बाजारात पाणी शिरलं, या नाल्या तोडून पाणी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

                                  ****

 

वाशिम जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं कारंजा आणि इतर काही तालुक्यांतील यंदाचा खरीप हंगाम बहुतांश हद्दपार झाला आहे. जास्त पावसामुळं अनेक शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाहीत तर ज्यांनी पेरण्या केल्या, त्यातील अनेकांचं बियाणं सुपीक मातीसह वाहुन गेलं आहे.   
                                 ****

झेक रिपब्लिकमध्ये पिलसेन इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय संघानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदकं पटकावली. या कामगिरीमुळं पुढील वर्षी पॅरिस इथं होणाऱ्या दिव्यांग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीसाठी, सहा भारतीय तिरंदाज पात्र ठरले आहेत.

                                **** 

कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीच्या आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीची लढत फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांतो या इंडोनेशियायी जोडीशी होणार आहे.

                               ****

फिनलंडमध्ये टॅम्पिअर इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमीत नागल यानं पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत त्यानं काल, स्पेनच्या डॅनियल रिंकनचा चार-सहा, सहा-तीन, सहा -दोन असा पराभव केला. विजेतेपदासाठी अंतिम फेरीत त्याची लढत आज,  झेक रिपब्लिकचा डॅलिबोर स्वर्सिना याच्याशी होईल.

                              **** 

No comments:

Post a Comment