Friday, 3 November 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

  नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्यासाठी वर्ल्‍ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. तीन दिवस चालणारा या महोत्सवात ८० हून अधिक देशांतल्या १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, ते खाऊ गल्लीचं उद्घाटनही करतील. या महोत्सवात पौष्टिक तृणधान्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

****

दिल्ली विद्यापीठात अमृत महोत्सवी संमेलनात काल भारतीय संसदेत महिलांची भुमिका या विषयावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मार्गदर्शन केलं. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून, स्त्री-पुरुष समानता नसेल तर समाजात समानता असू शकत नाही, असं ते म्हणाले.

****

कांद्याच्या वाढत्या किमती स्थिर करण्यासाठी केंद्र सरकार या महिन्यात एक लाख टन कांदा बाजारात आणणार आहे. केंद्रीय ग्राहक कार्य मंत्रालयाचे सचीव रोहित कुमार सिंह यांनी काल दिल्लीत ही माहिती दिली. देशाचे काही बाजार सरकारनं यासंदर्भात निश्चित केले असून त्या बाजारांमध्ये हा कांदा पुरवला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

पुणे इसीस मोड्यूलप्रकरणी आणखी एकाला काल राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं अटक केली. हा संशयित दहशतवादी मूळचा झारखंडचा रहिवासी असून, तो परदेशी दहशतवादी संघटनेसाठी पुण्यात काम करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

****

पुस्तकाचे गाव योजनेचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ, गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप इथं विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.

****

गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६१ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment