Friday, 3 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 03.11.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date: 03 November 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतातली समृद्ध खाद्य संस्कृति ही जगातल्या गुंतवणुकदरांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्यासाठी वर्ल्‍ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. आपल्या देशातली अन्न विविधता हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी लाभांश असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरणे देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत आहेत, २१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे जगासमोर एक महत्त्वाचं आव्हान असून, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी सून, देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं याब संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून, या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत जीवनशैलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्नाची नासाडी कमी करण्यावर देखील पंतप्रधानांनी भर दिला.

प्रगती मैदान इथल्या भारत मंडपम इथं होत असलेल्या या महोत्सवात ८० हून अधिक देशांतले १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात पौष्टिक तृणधान्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

****

चालू खरीप हंगामात एक कोटी ६१ लाख टनांहून अधिक धान्याची खरेदी झाली असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. ३५ हजार ५७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमान आधारभूत मूल्याच्या खरेदीचा फायदा नऊ लाख ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. आजपर्यंत एक कोटी आठ लाख टनांहून अधिक तांदूळ खरेदी करण्यात आला असून, त्यात पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडू यांचा प्रमुख वाटा असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

****

पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेरुळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.

****

दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली रायगड जिल्ह्यातल्या माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून नेरळ-माथेरान प्रवासासाठी सज्ज होत आहे. दररोज सकाळी वाजून ५० मिनिटांनी नेरळहून माथेरानसाठी सुटणाऱ्या या गाडीमध्ये विस्टाडोम असलेला एक डबाही असेल. या मिनी ट्रेनला जवळपास १२० वर्षांची परंपरा आहे.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार २२३ नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. पूर्वी परवानगी मिळालेल्या मात्र बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही, तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी पाच खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर येत्या तीस तारखेपर्यंत शेतक-यांना मोबाईल ॲपच्या मदतीनं ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरीप पणन हंगामासाठी राज्याच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्य खरेदीसाठी महागाव, आर्णी, पांढरकवडा, झरी आणि पुसद या पाच तालुक्यांमध्ये ही खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.

****

गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६१ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संघानं काल पाचहून अधिक सुवर्ण पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या खेळाडुंनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पकावलं तर याचं सामन्यात महाराष्ट्राच्या दुसऱ्या गटानं कांस्य पदक जिकलं. महिला दुहेरीत सुद्धा संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर महिला एकेरीत रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं.

****

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघादरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. 

****

No comments:

Post a Comment