Saturday, 18 November 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक: 18.11.2023 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१८ नोव्हेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून पैठणच्या जायकवाडी धरणात ८ पुर्णांक ६० टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर परवा २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महामंडळाच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयातल्या मूळ याचिकेत अंतरिम अर्ज दाखल करून आव्हान दिलं आहे.

****

धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेनं अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चौंडी इथं कालपासून पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची पन्नास दिवसांत अंमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासनाची शासनानं पूर्तता न केल्यानं अध्यादेश निघेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील अशी भूमिका उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी घेतली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. २१ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं अमर हबीब यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

****

No comments:

Post a Comment