Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 February
2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
·
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये
दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मंजूर, हे
आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल - मुख्यमंत्र्यांना
विश्वास
·
ओबीसी आरक्षणातूनच मराठा
आरक्षण
देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम, उद्या पुढच्या आंदोलनाची
घोषणा करणार
· पीएम उषा अभियानाची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात
आणि
· राज्य
शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरूवात, यंदा
१५ लाखावर विद्यार्थ्यांची नोंदणी
****
मराठा समाजाला
आरक्षण देणारं,
राज्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण
विधेयक २०२४ राज्य विधीमंडळानं आज मंजूर केलं. दोन्ही
सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा
झाला आहे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशात या समाजाला दहा टक्के
आरक्षण मिळणार आहे.
मराठा आरक्षणासाठी आज घेतलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
प्रथम विधानसभेत हे विधेयक मांडलं. यापूर्वी
मराठा समाजासाठीचं आरक्षण रद्दबातल ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून
दिलेल्या त्रुटी दूर करुन हे विधेयक तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. इतर मागासवर्गीय
किंवा इतर कोणत्याही समाजगटावर अन्याय न करता मराठा समाजाचं मागासलेपण दूर
करण्यासाठी ही तरतूद करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात
याविषयीची क्युरेटीव्ह याचिका दाखल असून, त्याप्रकरणी तज्ज्ञ
विधिज्ञांची मदत घेतली जात आहे, असं सांगून हे आरक्षण
न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ मराठाच नाही, तर सगळ्या
समाजांसाठी सरकारची समान भूमिका असून, इतरही एखाद्या समाजाला
अन्याय होत असल्याची भावना जाणवत असेल, तर त्याचाही सरकार
सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यानंतर विधानपरिषदेतही
मुख्यमंत्र्यांनी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण विधेयक २०२४
मांडलं. यावेळी बोलताना त्यांनी, मराठा
समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण देणं आवश्यक होतं, असं सांगितलं. अडचणीत येणाऱ्या समाजाला न्याय देण्याचं
काम आम्ही करत आहोत, मागास समाजाला मुख्य प्रवाहात
आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला
सुरुवात झाली.
गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात
घेतला. जागतिक आर्थिक मंचावर राज्यशासनानं केलेल्या तीन लाख ५३ हजार ६७५ कोटींच्या
विविध सांमजस्य करारांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार
प्रस्ताव मांडला तर संजय रायमुलकर यांनी अनुमोदन दिलं. यावरची चर्चा पावसाळी अधिवेशनात
घेण्यात येईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर
केलं.
या कामकाजानंतर विधिमंडळाचं विशेष
अधिवेशन संस्थगित
झालं.
****
अधिवेशनाआधी
मराठा
समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या गायकवाड आयोगाचा अहवाल राज्य शासनानं
स्वीकारला. आज सकाळी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं या अहवालाच्या मसुद्याला
मंजुरी दिली. राज्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाज २८ टक्के असून,
त्यातला ८४ टक्के समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे,
इंद्रा साहनी प्रकरणातल्या निर्णयाच्या अनुषंगानं नोकरी आणि
शिक्षणात हा समाज आरक्षणाला पात्र असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
****
दरम्यान, ओबीसी
आरक्षणातूनच मराठा आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची
आमची मागणी असल्याचं सांगत, उद्या पुढच्या आंदोलनाची
घोषणा करणार असल्याची माहिती, आंदोलनकर्ते मनोज जरांगे
पाटील दिली. ते जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत येणाऱ्या हरकती हा
सरकारचा मुद्दा असून, सरकारला मनुष्यबळ वाढवून या हरकती
एका दिवसात निकाली काढता येतील, असं ते म्हणाले. आंतरवाली
सराटी इथं जरांगे यांचं उपोषण सुरूच असून त्यांनी सलाईन घेणं बंद केल्याचं वृत्त
आहे.
****
ओबीसी
समाजाला कोणतीही अडचण न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला असून, आता
दोन्ही समाजातला सलोखा कायम राहून दोन्हींचा विकास होईल, असा
विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन
परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
****
सरकारनं
मराठा समाजासाठी आज दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणारं नाही आणि फसव्या सरकारनं
मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आज सभागृहात विरोधी पक्ष
नेत्यांना बोलु दिलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
रिपब्लिकन
पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं
स्वागत करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
मराठा समाजाच्या
धर्तीवर मुस्लिम समाजालाही आरक्षण दिलं जावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार
अबू आझमी यांनी केली आहे. सध्या राज्य सरकार मुस्लिम आरक्षणाबाबत
उदासीन असल्याचं त्यांनी सांगितलं. अबू आझमी आणि त्यांच्या
समर्थकांनी आज सकाळी विधिमंडळ परिसरात यासाठी आंदोलन केलं.
****
छत्रपती शिवाजी
महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध लढायांमध्ये वापरलेल्या
पट्टा अर्थात दांडपट्टा, या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्य
शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. छत्रपत्री शिवाजी महाराजांचा
साडेतीनशेवा राज्यभिषेक सोहळा तसंच शिवजयंतीचं औचित्य साधून हा निर्णय सरकारनं घेतला
असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
****
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान - पीएम उषा ची
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात
झाली. देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांचं बळकटीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पीएम उषा
अंतर्गत देशातल्या विविध उच्च शैक्षणिक संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये
राज्यातल्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.
****
निरोगी भारत देश
एक दिवस विश्वगुरु होणार,
असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन
भागवत यांनी व्यक्त केला आहे. लातूरच्या विवेकानंद कॅन्सर
अँड सुपर स्पेशालिटी विस्तारित रुग्णालयाचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय
आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते. आरोग्य सेवेच्या
बाबतीत भारत परिपूर्ण झाल्याचं सांगत, झपाट्यानं वाढणाऱ्या
कर्करोगावर देश येत्या चार वर्षात नियंत्रण मिळवेल, असा विश्वास मांडवीय यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून
सुरू होत आहेत. या परिक्षेला यंदा एकूण १५ लाख १३ हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी
नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण तीन हजार तीनशे वीस मुख्य
केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
****
संगीत
क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल नांदेड इथले गायक पंडित शाम गुंजकर यांना 'संगीत
शंकर दरबार जीवन गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या संगीत शंकर
दरबारमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती, श्री शारदा भवन सोसायटीच्या उपाध्यक्ष तथा माजी आमदार अमिता चव्हाण
यांनी दिली.
****
जालना इथं जिल्हास्तरीय जानकी वस्तू
आणि प्रदर्शनाचं उद्घाटन
आज केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या हस्ते
झालं. महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनोन्नती अभियान
- उमेदच्या वतीने तयार
करण्यात येणाऱ्या
मालाला बाजारपेठ
उपलब्ध करून देण्यासाठी
सर्व प्रकारचं
सहकार्य केलं जाईल, असं दानवे
यांनी यावेळी सांगितलं.
या महोत्सवात बचत
गटांचे विविध स्टॉल्स लावण्यात
आले आहेत.
****
परभणी इथं देखील
उद्यापासून विभागीय कृषी मेळावा तसंच महिला बचत गटांच्या उत्पादनांचं जिल्हास्तरीय
विक्री प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या
स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे सुमारे शंभर स्टॉल लागणार आहेत.
****
No comments:
Post a Comment