Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 February 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणारं विधेयक विधीमंडळात मंजूर
· ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम, उपोषण अधिक तीव्र
· राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत राज्यातल्या सर्व सहा उमेदवारांची बिनविरोध निवड
आणि
· राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, यंदा १५ लाखावर विद्यार्थ्यांची नोंदणी
सविस्तर बातम्या
मराठा समाजाला आरक्षण देणारं, राज्यातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण विधेयक २०२४ राज्य विधीमंडळानं काल मंजूर केलं. दोन्ही सभागृहात या विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशात या समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार आहे.
मराठा आरक्षणासाठी काल घेतलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम विधानसभेत हे विधेयक मांडलं. यापूर्वी मराठा समाजासाठीचं आरक्षण रद्दबातल ठरवताना सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी दूर करुन हे विधेयक तयार केल्याची माहिती त्यांनी दिली. इतर मागासवर्गीय किंवा इतर कोणत्याही समाजगटावर अन्याय न करता मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी ही तरतूद करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात याविषयीची क्युरेटीव्ह याचिका दाखल असून, त्याप्रकरणी तज्ज्ञ विधिज्ञांची मदत घेतली जात आहे, असं सांगून हे आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ मराठाच नाही, तर सगळ्या समाजांसाठी सरकारची समान भूमिका असून, इतरही एखाद्या समाजाला अन्याय होत असल्याची भावना जाणवत असेल, तर त्याचाही सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
त्यानंतर विधानपरिषदेतही मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडलं. अडचणीत येणाऱ्या समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत, मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
दरम्यान, ओबीसी आरक्षणातूनच मराठा आरक्षण देण्याची आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याची आमची मागणी असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर त्यांनी तीव्र उपोषणाला सुरुवात केली असून, उपचार घेणं थांबवलं आहे. आज त्यांनी आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाला बैठकीसाठी बोलावलं आहे. सगेसोयऱ्याच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होता, ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मान्य केल्याचं जरांगे म्हणाले.
****
ओबीसी समाजाला कोणतीही अडचण न करता मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवला असून, आता दोन्ही समाजातला सलोखा कायम राहून दोन्हींचा विकास होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्व त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्यात आलं आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाचं अभिनंदन केलं.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
सरकारनं मराठा समाजासाठी दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणारं नाही आणि फसव्या सरकारनं मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
सरकारनं या विधेयकावर चर्चासुद्धा न करता घाईघाईनं निर्णय घेतला, हा निर्णय न्यायालयात टिकेल का, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. मागासवर्गीय आयोगानं केलेल्या सर्वेक्षणावर शंका उपस्थित झाल्याचा दावाही त्यांनी केला.
****
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत अखिल भारतीय छावा संघटनेनं काल लातूर इथं प्रतिकात्मक अध्यादेशाची होळी केली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत, ओबीसी प्रवर्गातूनच मराठा आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
****
मराठा समाजाच्या धर्तीवर मुस्लिम समाजालाही आरक्षण दिलं जावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी काल विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं.
****
अधिवेशनाआधी मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या गायकवाड आयोगाचा अहवाल राज्य शासनानं स्वीकारला. काल सकाळी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं या अहवालाच्या मसुद्याला मंजुरी दिली. राज्याच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाज २८ टक्के असून, त्यातला ८४ टक्के समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे त्यामुळे, इंद्रा साहनी प्रकरणातल्या निर्णयाच्या अनुषंगानं नोकरी आणि शिक्षणात हा समाज आरक्षणाला पात्र असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
****
राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं काल अधिवेशनाला सुरुवात झाली. गेल्या वर्षभरात राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. जागतिक आर्थिक मंचावर राज्यशासनानं केलेल्या तीन लाख ५३ हजार ६७५ कोटींच्या विविध सांमजस्य करारांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला तर संजय रायमुलकर यांनी अनुमोदन दिलं. यावरची चर्चा पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं.
या कामकाजानंतर विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संस्थगित झालं.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत येत्या सोमवारी २६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला सादर होईल. एक मार्च पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सर्व सहा उमेदवार बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काल केली. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.
****
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान - पीएम उषा ची काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरुवात झाली. देशातल्या उच्च शैक्षणिक संस्थांचं बळकटीकरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि नवीन शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पीएम उषा अंतर्गत देशातल्या विविध उच्च शैक्षणिक संस्थांना निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.
****
निरोगी भारत देश एक दिवस विश्वगुरु होणार, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. लातूर इथं काल विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी विस्तारित रुग्णालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते. आरोग्य सेवेच्या बाबतीत भारत परिपूर्ण झाल्याचं सांगत, झपाट्यानं वाढणा-या कर्करोगावर देश येत्या चार वर्षात नियंत्रण मिळवेल, असा विश्वास मांडवीय यांनी यावेळी व्यक्त केला.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा आजपासून सुरूवात होत आहे. या परिक्षेला यंदा एकूण १५ लाख १३ हजार नऊशे नऊ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही या परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा, या उद्देशानं मंडळानं यावर्षी महत्वाच्या बहुतेक विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवला आहे.
****
संगीत क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल नांदेड इथले गायक पंडित शाम गुंजकर यांना 'संगीत शंकर दरबार जीवन गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणाऱ्या संगीत शंकर दरबारमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती, श्री शारदा भवन सोसायटीच्या उपाध्यक्ष तथा माजी आमदार अमिता चव्हाण यांनी दिली.
****
जालना इथं जिल्हास्तरीय जानकी वस्तू आणि प्रदर्शनाचं उद्घाटन काल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेदच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाईल, असं दानवे यांनी यावेळी सांगितलं. या महोत्सवात बचत गटांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
****
परभणी इथं देखील आजपासून विभागीय कृषी मेळावा तसंच महिला बचत गटांच्या उत्पादनांचं जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांचे सुमारे शंभर स्टॉल लागणार आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणा-या इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी यासाठी पाच मार्च पर्यंत लातूरच्या इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या सहायक संचालकांकडे अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
बीड इथं येत्या २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काल ही माहिती दिली. या महोत्सवातून, लुप्त होत चाललेल्या कला आणि संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न होत असून, स्वातंत्र्यलढ्यातल्या ज्ञात अज्ञात लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment