आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२१ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. ४ पूर्णांक ५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी बसल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली. भूकंपाचा दुसरा धक्का ३ पूर्णांक ६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा तसंच दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपांचा केंद्रबिंदू होता. भूकंपाच्या या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची माहिती आहे. मात्र, कोणत्याही जिवित हानीचे वृत्त नाही.
***
आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यासाठी आपण एकत्र काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘लोकशाहीसाठी शिखर परिषदे’ला संबोधित करताना काल ते बोलत होते. जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांना आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि परस्परांकडून शिकण्यासाठी, ही शिखर परिषद अतिशय महत्वाचं व्यासपीठ असल्याचं ते यावेळी म्हणाले.
***
भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात काल एक सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या कार्यक्षमतेचा वापर करणं हा असून धानुका ऍग्रीटेक लिमिटेड केंद्रीय संस्था, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने देशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येईल.
***
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडे तीनशेव्या राज्याभिषेक वर्षा निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं परभणी इथं शिवरायांच्या चारित्र्यावर आधारीत शिवगर्जना हे महानाट्य आजपासून येत्या २३ तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. शहरातल्या जिल्हा क्रीडा संकुल इथे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान या महानाट्याचं सादरीकरण होईल.
***
No comments:
Post a Comment