Saturday, 23 November 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.11.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 November 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल-जनतेची मतच नव्हे तर मनं जिंकल्याची भावना मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

·      विद्यमान मंत्रिमंडळातल्या जवळपास सर्वच सदस्यांचा विजय, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांना पराभवाचा धक्का 

·      मराठवाड्यातल्या ४६ जागांपैकी महायुतीला ३९ जागा, तर महाविकास आघाडीचा सात जागांवर विजय

आणि

·      बॉर्डर गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ २१८ धावांनी आघाडीवर

****

राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला जनतेचा स्पष्ट कौल मिळाला आहे. एकूण २८८ मतदारसंघापैकी भाजपने ६५ जागा जिंकल्या असून, ६८ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसनेनं ३२ जागा जिंकल्या असून, २५ जागांवर शिवसेना उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं २६ जागांवर विजय मिळवला असून, १५ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने पाच जागा जिंकल्या असून १० जागांवर आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १२ जागा जिंकल्या तर आठ जागांवर आघाडी असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सहा जागा जिंकल्या असून चार जागांवर पक्ष आघाडीवर आहे, समाजवादी पक्षाने दोन, जनसुराज्यशक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.

****

महायुतीचा हा विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, राज्यातल्या मतदारांचे विशेषत: महिला आणि युवकांचे आभार मानले.

****

आपण लोकांची मतं नव्हे तर मन जिंकल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासाला जनतेने प्राधान्य दिल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले

लोकांना आरोप प्रत्यारोप नकोय. लोकांना सुडाचं राजकारण नकोय. लोकांना डेव्हलपमेंट हवंय आणि विकास. विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला. विकासाकडे राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केले. यामध्ये केंद्राचं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. जनतेने दिलेल्या विजयाबद्दल नतमस्तक असून, जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर जनतेने विकासाच्या मुद्यावर महायुतीला भरभरून यश दिल्याबद्दल आभार व्यक्त करत, अजित पवार यांनी, लोकसभेच्या अपयशातून सावरून मिळवलेल्या या यशामुळे हुरळून न जाता जनतेची कामं करत राहणार असल्याचं सांगितलं.

****

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. यासोबतच जवळपास सगळेच विद्यमान मंत्री देखील विजयी झाले. परळीमधून धनंजय मुंडे, सिल्लोड-अब्दुल सत्तार, उदगीर - संजय बनसोडे, येवला - छगन भुजबळ, कागल - हसन मुश्रीफ, परंडा - तानाजी सावंत, रत्नागिरी - उदय सामंत, श्रीवर्धन - आदिती तटकरे, सावंतवाडी -दीपक केसरकर, औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, मालेगाव बाह्य - दादा भुसे, जामनेर -  गिरी महाजन, मलबार हिल्स - मंगलप्रभात लोढा, शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील, पाटण - शंभुराज देसाई, अंबेगाव – दिलीप वळसे पाटील, तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. 

****

अनेक युवा चेहऱ्यांना यंदा जनतेने विधानसभेत जाण्याची संधी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक आणि राज्याचे दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा समावेश आहे.

****

काही नवोदितांसह अनेक प्रस्थापितांना यंदा जनतेने नाकारलं आहे, यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे तसंच प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदींचा समावेश आहे.

****

मुंबईत कुलाबा मधून भाजपचे राहुल नार्वेकर, धारावीमधून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड, डोंबिवली मधून भाजपचे रविंद्र चव्हाण तर गोरेगाव मतदार संघातून भाजपच्या विद्या ठाकूर, विजयी झाल्या. 

वरळी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, माहिम मतदारसंघातूनही ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर दुसऱ्या, तर मनसेचे अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी झाले. या मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे झिशान सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहीले.

मुंब्रा कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड ९५ हजार १४५ मतांनी विजयी झाले. नवी मुंबईत ऐरोलीतून भाजपचे गणेश नाईक तर बेलापूर मधून मंदा म्हात्रे विजयी झाल्या.

इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, तर ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.

****

मराठवाड्यातल्या ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने ३९, तर महाविकास आघाडीने सात जागांवर विजय मिळवला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाट, तर औरंगाबाद पूर्व मधून भाजपचे अतुल सावे विजयी झाले. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूर मधून शिवसेनेचे रमेश बोरनारे, कन्नड मधून शिवसेनेच्या संजना जाधव, फुलंब्री मधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे जिंकले आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर, आष्टी मधून भाजप महायुतीचे सुरेश धस, माजलगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित विजयी झाले. 

****

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून भाजप महायुतीचे नारायण कुचे, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर, तर भोकरदन मधून भाजपाचे संतोष दानवे यांनी विजय मिळवला.

****

लातूर जिल्ह्यात लातूर ग्रामीणमधून भाजपचे रमेश कराड, अहमदपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर-राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा-भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले. लातूर शहर-महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित ‌देशमुख यांनी आघाडी घेतली, मात्र भाजपच्या उमेदवार अर्चना चाकूरकर यांच्या मागणीवरुन याठिकाणी फेरमोजणी सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत.

उमरगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी हे मतमोजणी झाल्यानंतर तीन हजार ९६५ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी पुन्हा एकदा मतमोजणीची मागणी केल्यामुळे याठिकाणी पुन्हा मोजणी होत आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद बोंडारकर, नांदेड उत्तर-शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगाव- भाजपचे राजेश पवार, देगलूर भाजपचे जीतेश अंतापूरकर, मुखेड - भाजपचे तुषार राठोड, भोकर -भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवट - भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर विजयी झाले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संतुक हंबर्डे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांचा पराभव केला.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजु नवघरे, हिंगोली मधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष बांगर विजयी झाले.

****

परभणी जिल्ह्यात परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राहुल पाटील, पाथरी मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचा विजय झाला. गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे आघाडीवर आहेत.

****

बडनेरा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांचा सलग चौथ्यांदा विजय झाला. मेळघाटातून भाजपचे केवलराम काळे, मोर्शीतून उमेश यावलकर विजयी झाले. गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे विनोद अग्रवाल विजयी झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीचे उमेदवार अव्वल ठरले. सावंतवाडी इथून दीपक केसरकर, कुडाळ मधून शिवसेनेचे निलेश राणे, कणकवली मधून भाजपचे नितेश राणे विजयी झाले.

शहापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा, शिरपूर मधून भाजपचे काशीराम पावरा, यांचा विजय झाला. 

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे, आरमोरी मधून काँग्रेसचे रामदास मसराम, बोईसर शिवसेनेचे विलास तरे, तर नंदुरबार मधून शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाले.

****

या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत 

****

झारखंड विधानसभा निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चानं आठ जागा जिंकल्या असून, २७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं एक जागा जिंकली असून, १९ जागांवर आघाडी मिळवली आहे. काँग्रेस १४, तर राष्ट्रीय जनता दल चार जागांवर आघाडीवर आहे.

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रियंका गांधी चार लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

****

क्रिकेट

बॉर्डर - गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत, पहिल्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं बिनबाद १७२ धावा करत, २१८ धावांची आघाडी घेतली आहे.

****

No comments:

Post a Comment