आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 31 March 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.03.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 31 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या
मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल. उद्या भारतीय
रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित
राहणार आहेत.
****
देशभरात आज ईद-उल-फित्रचा उत्साह आहे. मुस्लीम
धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता ईदच्या दिवशी होते. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
हा सण समाजात आशा, आकांक्षा, सद्भाव
आणि दयाळूपणाची भावना वृद्धिंगत करेल, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी, सगळ्यांना
आनंद आणि यश मिळण्याची प्रार्थना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जनतेला ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान ईद हा
सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह
देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक असल्याचं
पवार यांनी समाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
राज्यभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत
आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या
ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं.
हिंगोली इथंही आज सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम
बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण
कोकाटे यांनी मुस्लिम बांधवांना पोलिसांच्या वतीने ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
****
छत्तीसगढमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा
दलासोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. बिजापूर - दंतेवाडा जिल्ह्यांच्या
सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवत असताना आज सकाळी
ही चकमक झाली. घटनास्थळावरुन काही शस्त्र, दारुगोळा जप्त करण्यात आला.
****
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं उद्यापासून
तीन एप्रिल पर्यंत नवी दिल्ली इथं विकसित भारत युवा संसदेचं आयोजन केलं आहे. देशभरातल्या
७५ हजार युवांनी माय भारत पोर्टलमधे आपली व्हिडिओ नोंद केली आहे. जिल्हा नोडल फेरी, राज्य
फेरी आणि राष्ट्रीय फेरी अशा तीन टप्प्यात विकसित भारत युवा संसद होत असल्याचं युवा
व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं काल गुढीपाडव्याच्या
शुभ मुहूर्तावर श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवणे
अर्थात नाईट लँडिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंडिगो कंपनीच्या यात्रेकरू
विमानाचं यशस्वी लँडिंग झालं. भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह विमान प्राधिकरणाचे
अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेवेमुळे हवाई प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना इथं काल दु:खी राज्य काव्य पुरस्कार
आणि ना. धो. महानोर पुरस्कारांचं वितरण “कवितेचा पाडवा” या कार्यक्रमात साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उर्दू शायर राय
हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
२७ वा “दु:खी” राज्य काव्य पुरस्कार
कवी -गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों. महानोर राज्य साहित्य
पुरस्कार ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना यावेळी
प्रदान करण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात भूम इथल्या खवा क्लस्टरमध्ये
इंडक्शन मशीनवर खवा निर्मितीसाठी वीज जोडणीला शासनाची मान्यता मिळाली आहे. इंडक्शन
मशीनद्वारे सोलरवर खवा निर्मिती करण्याचा भारतातला पहिला प्रकल्प भूम इथल्या या क्लस्टरमध्ये
सुरु करण्यात आला आहे. परंतू, वीज जोडणी घेत असताना खवा उत्पादनासाठी इंडस्ट्रियल
टेरिफच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाते, त्यामुळे महावितरणचे दर खवा
उत्पादकांना परवडत नव्हते. मात्र, सोलर इंडक्शन मशीनवर खवा उत्पादन करणाऱ्या
शेतकऱ्यांना एग्रीकल्चर अँड ऑदर या टेरिफमध्ये वीज जोडणी मिळणार असल्यामुळे मोठ्या
प्रमाणात उत्कृष्ट प्रतीच्या खव्याच्या निर्यातीमध्ये भर पडेल. यासाठी निर्मल प्रॉडक्ट
असोसिएशन, खवा क्लस्टरचे अध्यक्ष विनोद जोगदंड यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. या वीज
जोडणीला मान्यता मिळाल्यामुळे खवा उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
वाशिम इथं दोन दिवसीय महाड सत्याग्रह स्मृती
व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. यावेळी मुंबई इथले घटनातज्ञ विधिज्ञ डॉक्टर सुरेश
माने यांचं “भारतीय राज्यघटनेचा भारत विरुद्ध राज्यकर्त्यांचा
हिंदुस्तान” या विषयावर व्याख्यान झालं. लोकशाहीमध्ये अल्पसंख्यांक
आणि बहुसंख्यांक दोघांचाही जातीयवाद धोकादायक असला, तरी
बहुसंख्याकाचा जातीयवाद लोकशाहीला मारक ठरतो, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त
केलं.
****
जॉर्डनची राजधानी अम्मान इथं झालेल्या अशियाई
कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या फ्रीस्टाईल प्रकारात दीपक पुनिया आणि उदित यांनी काल
रौप्य पदकं पटकावली. दिनेशने १२५ किलो वजनी गटात तुर्कमेनिस्तानच्या खेळाडुला नमवत
कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताने दहा पदकं जिंकली, यामध्ये
एक सुवर्ण,
तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
हवामान
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात
पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 31 March 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात आलं.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव बंधुता, सहकार्य आणि करुणेचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
हा सण समाजात आशा, आकांक्षा, सद्भाव आणि दयाळूपणाची भावना वृद्धिंगत करेल, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी, सगळ्यांना आनंद आणि यश मिळण्याची प्रार्थना केली.
राज्यभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं.
हिंगोली इथंही आज सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुस्लिम बांधवांना पोलिसांच्या वतीने ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
****
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या ५० नक्षलवाद्यांनी काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात प्रत्येकी ६८ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या १४ नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एका आदिवासी महिलेचा काल मृत्यू झाला. तर गडचिरोली जिल्ह्यात जुव्वी गावातल्या एका व्यक्तीची नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हत्या केली. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
****
राज्यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर झाली. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. चारचाकी प्रकारात यंदा २२ हजार ८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून, ही मागील वर्षीच्या तुलनेत चार हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८ पर्णांक ८४ इतकी आहे.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी इथं काल गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर नाईट लँडिंग सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंडिगो कंपनीच्या यात्रेकरू विमानाचं यशस्वी लँडिंग झालं. भाजपचे माजी खा. डॉ. सुजय विखे यांच्यासह विमान प्राधिकरणाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सेवेमुळे हवाई प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ४५ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचं लोकार्पण आणि अहिल्यानगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक इथं करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एसटी बस स्थानकांचं सुशोभीकरण, बस स्थानकांची आणि बसेसच्या नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून, एसटी स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी एसटी बसमधून प्रवास करत प्रवाश्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
****
जालना इथं काल दु:खी आणि ना. धो. महानोर पुरस्कारांचं वितरण "कवितेचा पाडवा" या कार्यक्रमात साहित्यिक महावीर जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. लेखक, साहित्यिकांनी चांगली लेखणी घेऊन सक्षमपणे समाज साकारावा लागेल असं मत, जोंधळे यांनी यावेळी व्यक्त केलं. उर्दू शायर राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २७ वा "दु:खी" राज्य काव्य पुरस्कार कवी -गीतकार प्रकाश होळकर यांना, तर ना. धों. महानोर राज्य साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखक रफीक सूरज यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
****
लातूर पोलीस दलातर्फे काल घेण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन काढण्यात आली.
****
परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे एक, पाच आणि आठ एप्रिल दरम्यान धावणारी काचीगुडा- नगरसोल जलदगती गाडी नियमित वेळेपेक्षा उशिरानं धावेल. तर औरंगाबाद-गुंटूर ही गाडी एक ते आठ एप्रिल दरम्यान दुपारी पाच वाजून ४० मिनिटांनी सुटेल, अशी माहिती रेल्वे विभागानं दिली आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वात जास्त ४२ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक चार, तर परभणी इथं ३९ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مارچ 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.03.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 31 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्याला सरकारचं प्राधान्य-पंतप्रधानांचं
प्रतिपादन
· रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई दौऱ्यावर
· गुढीपाडवा सर्वत्र उत्साहात साजरा-आज ईद-उल-फित्र;विशेष
नमाजसह स्नेहमिलनाचं आयोजन
आणि
· सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
****
देशवासियांना उत्तम आरोग्य सुविधा
पुरवण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. नागपूर इथं काल माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या इमारतीची पायाभरणी का
पंतप्रधानांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे
नागरिकांना मोफत उपचार दिले जात असून, वैद्यकीय
महाविद्यालयांची संख्या तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा देखील वाढल्या
असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
संघटन, समर्पण
आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं सूत्र ठरणार असून, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब
करावा,
असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
डॉ. मोहन भागवत,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना, अनेकांचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम माधव नेत्रालयानं केलं असून, मोठ्या प्रमाणात नेत्रदान होत असताना अशा प्रकारची संस्था देशात असणं अत्यंत
महत्त्वाचं असल्याचं सांगितलं.
नागपूर इथं रेशीमबाग भागातील स्मृती
मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर तसंच दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना काल पंतप्रधानांनी अभिवादन केलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई
ससाई यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गवई
यावेळी उपस्थित होते.
दीक्षाभूमी आपल्याला गरीब, वंचित आणि गरजूंसाठी समान हक्क आणि न्यायाच्या व्यवस्थेसह पुढे जाण्याची ऊर्जा
प्रदान करते. एक विकसित आणि सर्वसमावेशक भारत घडवणं हीच बाबासाहेबांना खरी
आदरांजली ठरेल’,
असा संदेश पंतप्रधानांनी अभिप्राय नोंदवहीत लिहिला.
कालच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी
नागपूर- अमरावती मार्गावर बाजारगाव परिसरातल्या सोलर एक्सप्लोसीव्ह इथं टेस्ट रेंज
आणि रनवे सुविधेचं उद्घाटन तसंच सोलर ग्रुप द्वारा निर्मित अत्याधुनिक सुरक्षा
यंत्रणेचं अवलोकन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल
आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या
मालिकेतला एकशे विसावा भाग होता. यावेळी बोलताना त्यांनी, उन्हाळ्याच्या
पार्श्वभूमीवर जलसंवर्धनावर भर दिला. या मोहिमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांत
पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची
माहिती त्यांनी दिली.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि
युवा वर्गानं नवी कौशल्यं शिकावीत यावर पंतप्रधानांनी मन की बात मध्ये भर दिला.
आरोग्याविषयी बोलताना त्यांनी दिल्लीतल्या फिट इंडिया कार्निव्हल` विषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे उत्सव आयोजित करण्याचं आवाहन
त्यांनी केलं. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना बळकट करायची असल्याचं सांगत
पंतप्रधानांनी,
गुढीपाडवा, ईद यासह विविध सणांच्या
शुभेच्छा दिल्या.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज आणि उद्या
मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईत आगमन होईल. उद्या भारतीय
रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती
उपस्थित राहणार आहेत.
****
छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या
५० नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. यापैकी १३ नक्षलवाद्यांवर एकूण ६८ लाख
रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबद्दल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे. इतर नक्षलवाद्यांनाही
हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी समाज माध्यमावरून
केलं आहे.
****
वर्षप्रतिपदा, अर्थात
गुढी पाडव्याचा सण काल सर्वत्र उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा झाला. रेशमी
वस्त्र,
कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी
घरोघरी उभारण्यात आली.
मराठवाड्यात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं गुढी
पाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. पैठण इथं, सातकर्णी
सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील
रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काल उत्साहात
प्रारंभ झाला. काल दुपारी घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली.
****
गुढीपाडव्यानिमित्त धाराशिव शहरात सकल
हिंदू समाजाच्या वतीने वाहन फेरी काढण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन करण्यात आलं.
****
जालना इथल्या रुक्मिणी परिवाराच्या
वतीने चैत्र पालवी हा सांगितिक कार्यक्रम काल घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर
इथल्या ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालक केतकी नेवपूरकर यांच्या
विद्यार्थिनींनी शारदा वंदना आणि श्रीराम स्तुतीवर आधारित नृत्य सादरीकरण केलं
गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक
मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोन्या चांदीच्या आभुषणांसह, इलेक्ट्रॉनिक्स
तसंच गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये काल गर्दी दिसून आली.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी
होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात येणार
आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशात
आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना, विशेषतः मुस्लिम
बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हा उत्सव बंधुता, सहकार्य
आणि करुणेचा संदेश देतो, असं त्यांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
यानिमित्त लातूर शहरात वाहतुकीत बदल
करण्यात आला आहे. बार्शी रोडवरील इदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गर्दी होत असल्याने
सकाळी सात ते अकरा या वेळेत वाहतुक मार्गात बदल
राहील असं प्रशासानानं कळवलं आहे.
****
सोलापूरचा वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी
कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत इथं काल झालेल्या
अंतिम लढतीत शेळके यानं मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याच्यावर सात गुणांनी मात केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वेताळ शेळके याला मानाची गदा प्रदान करण्यात
आली.
****
जॉर्डनमध्ये अम्मान इथं सुरु आशियाई
कुश्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू उदित आणि दीपक पुनिया यांनी फ्रीस्टाईल प्रकारात
अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उदितनं चीनच्या वानहाओ झोउचा २-० असा, तर दीपक पुनियानं जपानच्या ताकाशी इशिगुरोचा ८-१ असा पराभव केला. पुरुषांच्या
फ्रीस्टाइलमध्ये ८६ किलो वजनी गटात मुकुल दहियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग- आयपीएल क्रिकेट
स्पर्धेत काल गुवाहाटी इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई सुपर
किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. तर अन्य एका सामन्यात दिल्ली कॅपिल्सने
सनराईजर्स हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स
आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे.
****
भारताच्या निहाल सरीननं उझबेकिस्तानच्या
ताश्कंद इथं ताश्कंद खुल्या अग्झामोव स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं
आहे. वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं दहापैकी आठ गुणांसह हे विजेतेपद मिळवलं. या
विजयामुळं निहालला ७.१ दशांश एलो रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत.
****
लातूर पोलीस दलातर्फे काल घेण्यात
आलेल्या मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. वाढती सायबर
गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी ही मॅरेथॉन
काढण्यात आली.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राज्य
पोलिस तक्रार प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांच्या सामाजिक कार्यावर
आधारित मराठी माहितीपट `इदं द मम’चं लोकार्पण काल
छत्रपती संभाजीनगर इथं झालं. या माहितीपटाचे लेखक, दिग्दर्शक
दत्ता जोशी यावेळी उपस्थित होते.
****
उन्हाळी सुट्यांची गर्दी लक्षात घेता
नांदेड-हजरत निझामुद्दीन-नांदेड विशेष गाडीच्या २६ फेऱ्या होणार असल्याची माहिती
दक्षिण मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ही गाडी पाच एप्रिल ते २८ जून दरम्यान दर
शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दोन वाजता
निझामुद्दीन इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सहा एप्रिल ते २९ जून दरम्यान
धावेल. या गाडीचं आरक्षण कालपासून सुरु झालं.
****
राज्यात काल सर्वात जास्त ४२ अंश
सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ३८
पूर्णांक चार,
तर परभणी इथं ३९ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
झाली. पुढचे दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.03.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
• सणांतून दिसणारी एकतेची भावना बळकट व्हावी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
• युवकांनी नवी कौशल्यं शिकण्याचं पंतप्रधानांचं `मन की बात`द्वारे आवाहन
• पंतप्रधानांच्या हस्ते नागपूरमध्ये विविध विकास प्रकल्पाचं उदघाटन
आणि
• शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू - कृषीमंत्री कोकाटे यांची माहिती
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधला. हा या मालिकेतला एकशे विसावा भाग होता. आपल्या सणांतून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सातत्यानं बळकट करायची आहे, असं प्रतिपादन त्यांनी याद्वारे केलं. महाराष्ट्रातल्या गुढीपाडव्यासह, देशभरात विविध ठिकाणी येत्या काही दिवसात नववर्षाच्या स्वागतानिमित्त साजऱ्या होत असलेल्या रोंगाली बिहू, पोईला बोइशाख, नवरेह सणांच्या, तसंच उद्या साजऱ्या होणाऱ्या ईदच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्यं शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बात मध्ये भर दिला. या काळात मुलांनी तंत्रज्ञान, नाट्यकला, पर्यावरणासह विविध विषयांवरची शिबीरं तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. अशा उपक्रमांची माहिती `माय हॉलीडेज` या हॅशटॅगसह सामायिक करावी असं ते म्हणाले. या निमित्तानं पंतप्रधानांनी उन्हाळी सुट्टीसाठी
तयार केलेल्या ` माय भारत` या दिनदर्शिकेची माहिती दिली. उन्हाळा सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जल संवर्धनावरही भर दिला. या मोहीमेअंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांत पावसामुळे वाहून जाणारं अकरा अब्ज घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. तंदुरुस्तीविषयी बोलताना त्यांनी दिल्लीमध्ये आयोजित `फिट इंडिया कार्निव्हल`विषयी सांगितलं. आपापल्या परिसरात अशा प्रकारचे उत्सव आयोजित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला केवळ १०० दिवस उरले असल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करून दिलं. जगभरात भारतीय समुदाय आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी करत असलेल्या कामांची उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असलेल्या `टेक्स्टाईल वेस्ट` अर्थात कपड्यांमुळे निर्माण होत असलेल्या कचऱ्यांच्या नव्या आव्हानाविषयी देखील त्यांनी चर्चा केली. असा कचरा निर्माण करण्यात आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची जाणीव त्यांनी श्रोत्यांना करून दिली. मात्र यावरही अनेक स्टार्टअप्स आणि संस्था उपाय शोधत आहेत, शाश्वत फॅशन आणि कचरा
व्यवस्थापनासाठी अभिनव पद्धतीनं काम करत आहेत असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
****
देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर इथं केलं. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या इमारतीची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या आहेत. जास्तीत जास्त आणि चांगले डॉक्टर तयार करणं हे सरकारचं ध्येय असल्याचं मोदी म्हणाले. संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असं आवाहन त्यांनी केलं. नागपूर मध्ये विमान उड्डाण चाचण्यांसाठी बांधलेल्या हवाईपट्टीचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मधल्या रेशिमबाग भागातील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांच्या स्मृतीस्थळांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावर जाऊन मोदी यांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. त्या आधी पंतप्रधानांचं आज सकाळी नागपूर मधल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.
****
वर्षप्रतिपदा, अर्थात गुढी पाडव्याचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. रेशमी वस्त्र, कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी
घरोघरी उभारुन, तिची पूजा करुन तसंच रांगोळ्या, झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी कडुनिंबाची पानं आणि
गुळाचा प्रसाद खाल्ला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोनं, चांदी, इत्यादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी
दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल आहे.
गुढीपाडव्यानिमित्त राज्यातल्या विविध मंदिरांमधे दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सणानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. पैठण इथं, सातकर्णी सम्राट शालिवाहनाच्या प्रसिद्ध तीर्थस्तंभ परिसरातही विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदीरात आज पहाटे गुढी उभारण्यात आली. यानिमत्त आज तुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा आणि रात्री छबिना मिरवणूक पार पडेल. तसंच पाडवा वाचन होईल. नाशिक तसंच धुळ्यामध्ये मराठी नव वर्ष स्वागतासाठी स्वागत यात्रा काढण्यात आली.
गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल आज रमले. त्यांनी कांदिवली इथल्या त्यांच्या लोककल्याण कार्यालयात गुढी उभारून पूजा केली. त्यानंतर ते चारकोप, बोरिवली, दहिसर, मालाड इथं काढण्यात आलेल्या शोभा यात्रांमध्ये सहभागी झाले. त्यांनी यावेळी लेझीम खेळ, ढोल वादनाचा आनंद घेत पालखी खांद्यावर घेतली आणि रथही ओढला.
मुंबईत गिरगाव इथं नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखीचं पूजन करून मिरवणुकीची सुरुवात केली. डोंबिवलीमधेही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नटून थटून मोठ्या संख्येनं नागरिक स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. रत्नागिरीत आज गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. वेगवेगळे संदेश देणारे विविध चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गोंदियात महिला संघटनांनी एकत्र येत सामूहिक गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत केलं. अकोल्यात पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेतल्या स्त्री-पुरुषांनी दुचाकी फेरी काढली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज दुपारी घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. देवीची महाआरती संस्थानचे सचिव, किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी झेनिथ चंद्र दोन्थुला यांच्या हस्ते करण्यात आली. नऊ दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे.
****
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्यात येतील, असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनी, वावी यांच्या गोदाम बांधकामाचा प्रारंभ कोकाटे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. `स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचं मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आणि नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली कॅपीटलविरुद्ध विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. विशाखापट्टनम इथं सुरू या सामन्यात दिल्ली कॅपीटल संघानं दमदार सुरुवात करताना सहा षटकांत बीन बाद ५२ धावा केल्या आहेत. स्पर्धेतला दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमधे गुवाहाटी इथं संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल.
****
वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृती करिता आज लातूर पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या लातूर मॅरेथॉनमध्ये सुमारे आठ हजार धावपटुंनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या संदर्भातली माहिती दिली. या मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला, पुरुष तसंच ज्येष्ठांनीही मोठा सहभाग नोंदविला.
****
भारताच्या निहाल सरीननं उझबेकिस्तानच्या ताश्कंद इथं ताश्कंद खुल्या अग्झामोव स्मारक बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं आहे. वीस वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरनं दहापैकी आठ गुणांसह हे विजेतेपद मिळवलं. या विजयामुळं निहालला ७.१ दशांश एलो रेटिंग गुण प्राप्त झाले आहेत.
****
उद्याच्या रमजान ईद निमित्त लातूर शहरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बार्शी रोडवरील इदगाह मैदानावर नमाज पठणासाठी गर्दी होत असल्याने सकाळी सात ते अकरा या वेळेत वाहतुक मार्गात बदल राहील असं प्रशासानानं कळवलं आहे.
****
परभणी ते मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे एक,पाच आणि आठ एप्रिल दरम्यान धावणारी काचीगुडा- नगरसोल जलदगती गाडी नियमित वेळेपेक्षा उशिरानं धावेल.
****
Sunday, 30 March 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.03.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या आपल्या मन की बातच्या एकशे विसाव्या भागाद्वारे देशवासियांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यांनी हिंदू नववर्षाच्या विविध भाषांमधून शुभेच्छा दिल्या. आज
महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात असल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. आजचा सण वेगवेगळ्या
प्रदेशांत वेगळ्या पद्धतीनं साजरा होत असला तरी भारताच्या विविधतेत एकता कशी विणली
गेली आहे, हे यातून दिसत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. आपल्याला एकतेची भावना सतत बळकट करायची आहे, असं आवाहनही पंतप्रधानांनी यानिमित्त केलं. भारतातील कित्येक
स्टार्ट अप उद्योगांनी वस्त्र पुनर्नविकरण सुविधा संदर्भात काम सुरु केलं असल्याचं त्यांनी या आव्हानावर प्रकाश टाकताना सांगितलं. हे उद्योग कपडे आणि चपला-बुटांना नवं रूप देऊन ते गरजवंतांपर्यंत पोहोचवत आहेत. टाकाऊ वस्त्रापासून पासून सजावटीच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरीच्या वस्तू आणि खेळण्यांसारख्या अनेक वस्तू बनवल्या जात असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. टाकाऊ वस्त्रांच्या समस्येकडे लक्ष वेधताना त्यांनी आपल्या समोर उभं असलेलं हे आव्हान खूप मोठं असल्याचं नमुद केलं. ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात असा कचरा निर्माण होत आहे, अशा देशांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारतीय दिव्यांग खेळाडूंनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १८ राष्ट्रीय विक्रम केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यापैकी १२ महिला खेळाडू असून त्यांच्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या संदर्भात खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुष्टियोद्धा जॉबी मॅथ्यूचं पत्र पंतप्रधानांनी वाचून दाखवलं. येत्या २१ जून ला होणाऱ्या जागतिक योग दिनाची देशवासियांना आठवण करुन देत ज्यांनी आपल्या जीवनात अद्याप योगाचा समावेश केलेला नसेल तर आता नक्की करा, असं ते म्हणाले. यंदाच्या योगदिनाची संकल्पना ‘एक वसुंधरा, एक आरोग्य यासाठी योग’अशी असल्याचं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुट्यात मुलाणी सक्रिय राहावं असं सांगत जर कोणतीही संस्था, शाळा, सामाजिक संस्था किंवा विज्ञान केंद्र अशा
उन्हाळी उपक्रमांचं आयोजन करत असेल तर ते `माय हॉलीडे` यावर पाठवावेत. यामुळं देशभरातली मुलं आणि त्यांच्या पालकांना
याबद्दलची माहिती सहजपणे मिळू शकेल असं पंतप्रधानांनी सांगितलं. या उन्हाळी सुट्टीसाठी तयार केलेल्या `माय-भारत` दिनदर्शिकेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. मुलं आणि त्यांच्या पालकांनी आपल्या सुट्टीचे
अनुभव `हॉलीडे मेमरी` ला पाठवावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी राज्याच्या दौऱ्यावर नागपूर इथं आगमन झालं. त्यांनी या दौऱ्यामध्ये विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन केलं. पंतप्रधानांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या केंद्रीय स्मारकाला आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी यावेळी पंतप्रधानांचं स्वागत केलं. दीक्षाभूमीला भेट देताना पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर प्रार्थना केली आणि अभ्यागत पुस्तिकेत अभिप्राय नोंदवला.
****
पंतप्रधानांनी नागपूरच्या रेशीमबाग परिसरातील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार आणि गोलवलकर गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती आंदोलनाद्वारे महाराष्ट्रातील तसंच देशातील संतांनी राष्ट्र चेतनेला जागृत ठेवलं त्याच प्रमाणं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि माधव गोळवलकर यांनी राष्ट्रीय चेतनेला एक नवी ऊर्जा दिली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या हस्ते आज नागपूर इथं माधव नेत्रालय संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. शंभर वर्ष अगोदर जे विचार बीज या मातीत रोवलं गेलं त्याचा एक वटवृक्ष झालेला आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठला साधारण वटवृक्ष नाही तर भारताच्या संस्कृतींचा एक आधुनिक अक्षयवट आहे, असं मोदी म्हणाले. त्यांच्या हस्ते 'तमसो मा ज्योतीर्गमय' या पुस्तकाचं अनावरण यावेळी करण्यात आलं. माधव नेत्रालय हे केवळ विदर्भ आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य भारताकरता नेत्र रोगावरील संस्था म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
****
राज्यात आज विविध ठिकाणी मराठी नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर, अकोला इथंही मिरवणूक काढण्यात आली. गोंदिया शहरात विविध महिला संघटनानी एकत्र येत सामूहिकरित्या गुढी उभारत मराठी नवं वर्ष साजरं केलं.
****
म्यानमार आणि थायलंडमध्ये
झालेल्या भूकंपात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी
नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. या संकट काळात भारत खंबीरपणे म्यानमारसेाबत उभा आहे, भारतानं याआधीच, मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकूण पाच विमानांमधुन मदत पाठवली
जात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी दिली.
****