Thursday, 17 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.07.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 July 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

स्वच्छता हा देशाच्या सांस्कृतिक जाणिवेचा पाया असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज २०२४-२५ या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचं कौतुक करताना राष्ट्रपतींनी, स्वच्छ सर्वेक्षण हा एक यशस्वी उपक्रम असल्याचं नमूद केलं.

इंदूरने सलग आठव्या वर्षी देशातलं सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कायम राखला आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात इंदूरला पहिल्या क्रमांकाचा, सुरतला दुसऱ्या, तर नवी मुंबईला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तीन ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीच्या ‘स्वच्छ शहर’ श्रेणीत महाराष्ट्रातलं मीरा-भाईंदर, छत्तीसगढ मधल्या बिलासपूर, आणि झारखंड मधल्या जमशेदपूर शहराला गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान विविध श्रेणींमध्ये एकूण ७८ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं आतापर्यंत १४ ठिकाणी छापे टाकले आहेत. यात उत्तर प्रदेशातल्या उत्तरौला आणि बलरामपूर जिल्ह्यातल्या १२ आणि महाराष्ट्रात मुंबई इथल्या दोन ठिकाणांचा समावेश आहे.

****

जम्मू काश्मिर इथं सुरू असलेली अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम मार्गांवर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजनेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या १४ दिवसांत काल संध्याकाळपर्यंत सुमारे अडीच लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.

****

पंढरपूर इथला सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य हेमंत रासने यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या आराखड्या अंतर्गत पंढरपुरातल्या सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरं देण्यात येणार असून, यासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील असंही पवार यांनी सांगितलं.

राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असं पवार यांनी सदनात सांगितलं. दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, असं ते म्हणाले.

****

डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहणं बंधनकारक असून, त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत सांगितल. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

दरपत्रक न लावणाऱ्या तसंच इतर नियम न पाळणाऱ्या ३३४ खासगी रुग्णालयांवर बंदी घातल्याची माहितीही आबिटकर यांनी दिली. आरोग्य विभागाकडून दरवर्षी रुग्णालयांची तपासणी केली जाईल, तसंच बॉम्बे नर्सिंग ॲक्ट मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढच्या अधिवेशनात विधेयक आणलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाचं गेल्या पाच ते सहा महिन्यांचं मानधन प्रलंबित असल्याबाबत कॉंग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर मानधन यापुढे प्रलंबित राहणार नाही असं आश्वासन आबिटकर यांनी दिलं.

****

नाशिक जिल्ह्यात येवला इथल्या पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार असून, यासाठी १२ कोटी २३ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सेंटरमुळे येवल्यातल्या पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

****

परभणी इथं आज राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर परिचारिकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारच्या क्रमाने राज्यातल्या परिचारिकांना वेतन श्रेणी, भत्ता, गणवेश भत्ता वाढवून देण्यात यावा, तसंच प्रशासकीय बदली न करता विनंतीनुसार, तक्रार आधारित बदली करावी, परिचारिकांवर होणारे हल्ले चिंताजनक असून त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घ्यावेत, वाढत्या लोकसंख्येनुसार परिचारिकांची पदे भरण्यात यावी अशा विविध मागण्या संघटनेनं केल्या आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे काचीगुडा इथून दर गुरूवारी दुपारी पावणे चार वाजता सुटेल. तर नगरसोल इथून दर शुक्रवारी संधयाकाळी साडे पाच वाजता सुटेल.

****

लास वेगासमध्ये झालेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदला विजेत्या गटात स्थान मिळालं. प्रज्ञानंदनं जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. 

****

No comments:

Post a Comment