Thursday, 17 July 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.07.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 17 July 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जूलै २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत २०२४-२५ या वर्षासाठी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन - शहरी अंतर्गत स्वच्छतेसाठी राबवण्यात येणार्या अपक्रमाअंतर्गत सर्वात स्वच्छ शहरांचा गौरव केला जाईल. यावर्षी चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील. सुपर स्वच्छ शहरे आणि लोकसंख्येच्या आधारे पाच श्रेणींमध्ये तीन स्वच्छ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी एकंदर ७८ पुरस्कार प्रदान केले जातील, अशी माहिती गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं दिली आहे.

****

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ अर्थात एनपीटीसी लिमिटेड च्या उपकंपन्यांमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. त्यामुळे आता एनटीपीसीला नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता २०३२ पर्यंत ६० गिगावॅट इतकी वाढवण्याच्या दृष्टीनं २० हजार कोटी रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येईल. या निर्णयाकरता महारत्न आणि नवरत्न उद्योगांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमधेही आवश्यक बदल करायला मंजुरी मिळाली आहे. यामुळे हरित हायड्रोजन, पवन उर्जा, सौर उर्जा आदी क्षेत्रांचा विकास होणार आहे.

****

गेल्या अकरा वर्षांत वार्षिक अन्नधान्य उत्पादन आठ पूर्णांक एक दशलक्ष टनांपर्यंत, तसंच फळे, भाज्या आणि दुधाचे वार्षिक उत्पादन अनुक्रमे सात पूर्णांक पाच दशलक्ष टन आणि १० पूर्णांक दोन दशलक्ष टनांपर्यंत वाढलं आहे, असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं ९७ व्या आय सी ए आर स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.

****

वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत, सागरी महासत्ता होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती घडवून आणणारा केंद्रबिंदू ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय, बंदरे विभाग, आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं आयोजित ‘सागरी शिखर परिषद २०२५’ चं उद्घाटन करताना ते बोलत होते. भविष्यात भारत हा जागतिक सप्लाय चेनमधला महत्वाचा भागीदार बनू शकतो, असं फडणवीस म्हणाले.

****

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेनं महाराष्ट्रातल्या १६ बी.एड.महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. यापैकी नऊ महाविद्यालयं बंद असल्यानं तिथं विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत. अन्य सात महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५०० असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांचा बी.एड. अभ्यासक्रम म्हणजेच एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम लागू करण्यात आला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

****

नाशिक- त्र्यंबकेश्वर इथं २०२६- २७ मध्ये नियोजित कुंभमेळा हरित कुंभ होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून १५ लाख रोपांची लागवड करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ काल जिल्हा प्रशासनातर्फे चामर लेणी परिसरात करण्यात आला. ‘माझा कुंभ- माझी जबाबदारी, माझा वृक्ष- माझी जबाबदारी’ ही संकल्पना पूर्णत्वास आणावी, असंही आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केलं.

****

मधु मक्षिका पालन हे शेतीसाठी महत्वाचं असून, मधुमक्षिका संवधर्नात लक्ष देण्याची गरज असल्याचं खासदार डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पुणे इथल्या केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, तसंच वसंतराव नार्इक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल “एक विद्यार्थी एक वृक्ष” तथा 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाला. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

****

नाशिक जिल्ह्यात वणी- दिंडोरी रोडवर मध्यरात्री झालेल्या एका अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. दिंडोरी तालुक्यातल्या देवपूर, देवठाण आणि कोशिंबे इथले काही कुटुंबीय एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्या मारुती अल्टोला समोरून येणाऱ्या एका दुचाकीची धडक बसून हा अपघात झाला.

****

नाशिक इथं जीएसटी तसंच ई-वे बिल न घेता रासायनिक खतांची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक कृषी विभागाच्या भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी ट्रकचालक प्रभाकर भामरे याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment