आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 16 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16 August 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं
आजपासून देशातील सुमारे १ हजार १५० पथकर नाक्यावर फास्ट टॅग वार्षिक पासची सुविधा सुरू
केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १
लाख ४० हजार लोकांनी वार्षिक पास खरेदी करुन सक्रिय केला. वार्षिक पाससह सुरळीत प्रवासासाठी,
प्रत्येक पथकर नाक्यावर प्राधिकरणाचे अधिकारी आणि समन्वय अधिकारी नियुक्त
करण्यात आले असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं. तीन
हजार रुपये किमतीचा हा पास एक वर्षासाठी किंवा पथकर नाक्यावरून २०० वेळा वाहतूक करेपर्यंत
मर्यादीत राहील.
****
भारतातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत
जुलै महिन्यात लक्षणीय वाढ झाली असून ती ३७ अब्ज ३४ कोटी डॉलर इतकी झाली आहे. वार्षिक
आधारावर ही सात पुर्णांक तीन टक्के वाढ आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या तात्पुरत्या
आकडेवारीनुसार, अभियांत्रिकी
वस्तू, रत्नं आणि दागिने, इलेक्ट्रॉनिक
वस्तू, औषध आणि सेंद्रिय तसंच अजैविक रसायनांच्या निर्यातीत प्रामुख्याने
वाढ झाली आहे. जुलैमध्ये व्यापार तूट २७ अब्ज ३५ कोटी डॉलर झाली असून ती आठ महिन्यांतील
सर्वाधिक आहे. आयातीमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे हे घडलं असून जुलैमध्ये आयात आठ पुर्णांक
सहा टक्क्यांनी वाढून ती ६४ अब्ज ५९ कोटी डॉलर इतकी झाली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या
पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणांच्या घोषणेचं देशभरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी
स्वागत केलं आहे. त्यांनी करप्रणाली सुलभ करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी
हे अत्यंत आवश्यक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. या सुधारणांमुळे ५ ते २८ टक्के करदरांना
तोंड देणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असं सदर बाजार व्यापारी संघटनेनं म्हटलं
आहे.
****
नंदूरबार जिल्ह्यातील भारतीय जनता
पक्षाचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा इथं काँग्रेस पक्षात प्रवेश
केला. यावेळी माजी मंत्री काँग्रेस नेते वसंत पुरके उपस्थित होते. लवकरच नंदूरबार इथं
एका मोठ्या समारंभाच्या माध्यमातून वळवी यांच्या सहकाऱ्यांचाही काँग्रेस पक्षप्रवेश
सोहळा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णानं
सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी समर्पित राहून मानवजातीला धर्मानुसार कर्तव्य बजावण्याचा
मार्ग दाखवला. भगवान श्रीकृष्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून समाज आणि राष्ट्राला
बळकटी देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशातून नागरिकांनी
केलं आहे.
****
गोपाळकालानिमित्त राज्यात आज दहीहंडीचा
उत्साह शिगेला पोहचला आहे, ठाण्यातील
भगवती शाळेच्या मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहीहंडित किसन नगरचा राजा गोविंदा
पथकानं आठ थर लावून सलामी दिली तर कोकण नगर गोविंदा पथकानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहिहंडीत इथं नऊ थर लावले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात दहीहंडी
निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही
सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन
मंदीरासमोर दहीहंडी आयोजित करण्यात आली असून, या मार्गावरचे रस्ते
दुपारनंतर बंद राहणार आहेत. काल श्रीकृष्ण जन्माष्टमी सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात
आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदीरांमध्ये तसंच घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण
जन्मोत्सव पार पडला.
****
मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून यामुळं
जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुर्ला भागातल्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पावसामुळं रेल्वे
रुळावर पाणी साचलं असून अनावश्यक घराबाहेर पडू नये, अशा सुचना मुंबई वाहतूक विभागानं दिल्या आहेत.
****
वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने
सोयाबीन, हळद
पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं. रिसोड
तालुक्यात या पावसाळ्यात चौथ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, वाडी रायताळ इथं कालच्या पावसात वाहून गेलेल्या व्यक्तीचा आज सकाळी नाल्यात
मृतदेह आढळला.
****
हिंगोली जिल्ह्यात दमदार पावसामुळं
नदी नाले ओसंडून वाहत आहेत, कळमनुरी
तालुक्यातल्या कामठा फाटा ते येलकी रस्त्यावरील ओढ्याला मोठा पूर आला असून पुलावरून
पाणी वाहत आहे. त्यामुळे येलकी, बेलथर, कसबे धांवडा या गावांना जाणारा रस्ता बंद झाला असून संपर्कही तुटला आहे. दरम्यान,
ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं
धरणाचे सात वक्र दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले, सध्या ११
हजार ६३८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळं नदी काठच्या
गावातील नागरिकांना पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
आशियाई नेमबाजी स्पर्धा आजपासून
सुरू होत असून दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर भारताचे नेतृत्व करत आहे. ३० ऑगस्ट
रोजी या स्पर्धेचा कझाकस्तानमधील श्यामकेंट शूटिंग प्लाझा इथं समारोप होईल. या स्पर्धेत
भारताने १६४ नेमबाजांचा समावेश असलेला मोठा संघ स्पर्धेसाठी पाठवला असून २८ देशांतील
७३४ नेमबाज सहभागी झाले आहेत. भारतीय वरिष्ठ नेमबाजी पथकात ३५ सदस्य असून ते १५ स्पर्धांमध्ये
सहभाग घेतील तर मनू भाकर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि २५ मीटर पिस्तूल या दोन्ही
स्पर्धेत भाग घेईल.
****
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 August 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज दिल्लीतील सदैव अटल इथं अटलजींच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती, विद्यार्थ्यांनी भजनं सादर करुन अटलजींना श्रद्धांजली अर्पण
केली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, किरेन रिजिजू, गजेंद्र सिंह शेखावत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीच्या
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होते.
****
मुंबईतील विक्रोळी इथं आज पहाटे झालेल्या
भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. पहाटे दोन वाजेच्या
सुमारास डोंगरावरून माती आणि दगड घसरून झोपडीवर पडल्याने ही दुर्घटना घडली.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये ढगफुटीच्या
पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी किश्तवाडला
पोहोचले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू
झाला असून शंभराहून अधिक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांशी संवाद
साधत या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संवाद साधत केंद्राकडून
सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. परवा किश्तवाड जिल्ह्यातील चिशोती इथं ढगफुटीमुळं
मोठं नुकसान झालं. सद्या या परिसरात बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना
श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमीचा
सण लोकांच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन येईल अशी आशा पंतप्रधानांनी आपल्या
समाजिक माध्यमावरील संदेशात व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या प्रगतीचे उंच थर
रचून संस्कृती, परंपरेचा अभिमान बाळगूया
आणि गोपाळकाल्याचा सण उत्साहात साजरा करू असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी देशवासियांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या.
****
राज्यात आज गोपाळकाला दहीहंडीचा उत्साह
आहे, मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणी दहिहंडीचे आयोजन
करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही गजानन महाराज मंदिर परिसरासह इतरत्र दहीहंडी
उत्सवासाठी तयारी सुरु आहे. शहर आणि जिल्ह्यातल्या शाळामध्येही श्रीकृष्ण अन् राधेच्या
वेशात बाळगोपाळांनी दहीहंडी फोडली. अहिल्यानगरच्या शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिरात
काल श्री गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिरात
रात्री हरी भक्त परायण स्मिता आजेगावकर यांच्या श्रीकृष्णजन्म कीर्तनानंतर श्रीकृष्ण
जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
****
मराठा आरक्षणासाठी मुंबईत २९ ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. बैठकीदरम्यान काही वेळ त्यांना
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांनी पुन्हा बैठका घेतल्या.
जिल्हाभरातून आलेल्या मराठा पदाधिकाऱ्यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चात
मोठ्या सहभागी होण्याचं आशवासन यावेळी दिला.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठाच्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणून पालघरच्या सोनोपंत
दांडेकर महाविद्यालयाचा विशेष सन्मान करण्यात आला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात केंद्रामध्ये
३ हजार ५७६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, ही राज्यातील सर्वाधिक संख्या आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटे तीन वाजल्यापासून
जोरदार पाऊस सुरू असल्यानं धरणाचे पाच वक्र दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून
८ हजार ३१३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील
गावांना पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी
हिंगोली जिल्हा प्रशासनानं तयार केलेल्या 'सेवादूत हिंगोली' प्रणालीचं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते काल स्वातंत्र्य
दिनी उद्घघाटन करण्यात आलं. 'हिंगोली सेवादूत' प्रणाली द्वारे शासन आपल्या दारी
हा उपक्रम अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढाकार घेतला.
व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
****
हवामान - हवामान विभागाने मुंबईत
आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज सकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सततच्या पावसामुळं
अनेक भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई पोलिसांनी प्रवासाबाबत
मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच रायगडसाठी ऑरेंज आणि पालघर तसंच ठाण्यासाठी
यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
भारताच्या अंकिता ध्यानीने इस्रायलमधील
ग्रँड स्लॅम जेरुसलेम अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. तिनं महिलांच्या दोन
हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला. २३ वर्षीय अंकितानं पारुल चौधरीचा
६ मिनिटे १४.३८ सेकंदांचा मागील विक्रम ६ मिनिटे १३.९२ सेकंदांसह मोडला.
****
Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
***** ***** *****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 16 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची पंतप्रधानांची
घोषणा; एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा
·
जीएसटीमधल्या १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा काढून टाकण्याचा
अर्थमंत्रालयाचा प्रस्ताव
·
श्रीकृष्ण जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी; आज दहीहंडीचा
थरार
·
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती
आणि
·
मराठवाड्यात सर्वत्र पाऊस सुरु; लातूर जिल्ह्यात
मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ
****
प्रधानमंत्री
विकसित भारत रोजगार योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
काल ७९ व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर ते बोलत होते. सुमारे एक लाख
कोटी रुपयांची तरतूद असलेली ही योजना देशभरात आजपासून लागू होईल. याअंतर्गत खाजगी क्षेत्रात
पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५ हजार रुपये मिळतील असं त्यांनी सांगितलं.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
येत्या
दिवाळीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीत सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणाही
पंतप्रधानांनी यावेळी केली. आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरसह विविध मुद्यांचा त्यांनी
उल्लेख केला. देशाची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी मिशन सुदर्शनचक्र ही प्रणाली
विकसित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
मुंबईत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या
भाषणात मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित
भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाड्यात
सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
बीड इथं
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. नवा विकसित
बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
बाईट- उपमुख्यमंत्री
अजित पवार
जालना इथं
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर
यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा
पार पडला.
छत्रपती
संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले,
बाईट- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
सर्व जिल्हा
मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर सेवा पदकं तसंच राष्ट्रपती
पदकं प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
मुंबर्इ
उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय
फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर
चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू
डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
वस्तू आणि
सेवा करांतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवर पाच टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरात दर निश्चित
करावेत, असा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला
आहे. या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, आरोग्याशी संबंधित वस्तू, हस्तकलेच्या वस्तू आणि विमा
यांच्यावर पाच टक्के जीएसटी लागेल, तर इतर वस्तू १८ टक्के जीएसटीच्या
स्तरात येतील. मात्र, सिगरेट, तंबाखू,
साखरयुक्त पेयं आणि पानमसाला अशा आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या वस्तूंवर
आत्ताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल.
****
श्रीकृष्ण
जन्माष्टमी काल सर्वत्र भक्तिभावाने साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या कृष्ण मंदीरांमध्ये
तसंच घरोघरी देखील मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला. आज सर्वत्र दहीहंडीचा
थरार पाहायला मिळणार आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहरात दहीहंडी निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात
गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदीरासमोर दहीहंडी
आयोजित करण्यात आली असून, या मार्गावरचे रस्ते दुपारनंतर बंद
राहणार आहेत.
****
श्री क्षेत्र
तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चित करण्याबाबत
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल आढावा बैठक घेतली. या आराखड्यातून कोणावरही अन्याय
होऊ देणार नाही, असं आश्वासन देत, यामुळे रोजगार निर्मिती,
पर्यटन वाढ, व्यापार वृद्धी आणि सोयी-सुविधांचा
दर्जा उंचावेल, असं सरनाईक यांनी नमूद केलं.
****
शालेय शिक्षणात
नवनवीन उपक्रमांचा समावेश करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना
देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा
भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात भुसे यांनी काल अचानक
भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘दशसूत्री’ या उपक्रमाची माहिती
जाणून घेतली. शाळा अद्यावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल, त्यातून
शाळांचे चित्र बदलेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
****
१०० दिवसात
कार्यालयीन सुधारणा मोहीम जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला काल द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गटविकास
अधिकारी मीना रावताळे, गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षरी
असलेलं प्रशस्तीपत्र पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.
****
मराठवाड्यात
अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल जोरदार
पाऊस झाला. पळशी, आडगाव, अंजन रोड, लिंधारी
या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं
आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत
आहे. जिल्ह्यातल्या शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ८९ टक्क्यांच्या वर गेला
आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यात पाऊस सुरु असून, नदी-नाल्यांना पूर आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर जिल्ह्यात
सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. मांजरा धरणाचा पाणीसाठा
७९ टक्के, निम्न तेरणा ८८ टक्के, तर औसा तालुक्यातल्या
तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. या धरणांमधून पाणी सोडलं जाण्याची
शक्यता असून, मांजरा, तेरणा आणि तावरजा
नदीकाठच्या गावांतल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या पावसाने
अनेक शेतातही पाणी घुसलं असून, आमदार अमित देशमुख यांनी काल
बाधित क्षेत्राची पाहणी करुन, प्रशासनाने याबाबत तातडीच्या उपाययोजना
करण्याची मागणी केली.
नांदेड
जिल्ह्यात २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातही
पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****
हवामान
हा संपूर्ण
आठवडा कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल,
किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही
अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
Friday, 15 August 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
व्होकल
फॉर लोकल हा मंत्र अंगिकारत फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरण्याचं पंतप्रधानांचं आवाहन;
एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचा देशभरात
उत्साह
·
मराठवाड्यात
सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
·
विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार - शालेय शिक्षण
मंत्री दादा भुसे यांची माहिती
·
कार्यालयीन
सुधारणा मोहीम उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला द्वितीय
पारितोषिक
आणि
·
पुढचे
पाच दिवस मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
****
व्होकल फॉर लोकल हा मंत्र अंगिकारत
फक्त स्वदेशी उत्पादनेच वापरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज
७९ व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटबंदीवर पंतप्रधानांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर
ते बोलत होते. विक्रेत्यांनी आपल्या दुकानात स्वदेशी वस्तू विकाव्यात,
स्वदेशीचा वापर नाईलजाने नव्हे तर अभिमानाने
करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र
मोदी
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऑपरेशन
सिंदूरसह विविध मुद्यांचा उल्लेख केला. महात्मा जोतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीच्या
पार्श्वभूमीवर बोलतांना, मागास
घटकांना प्राधान्य देऊन आपण परिवर्तनाची नवी शिखरं पादाक्रांत करू,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी,
पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या
मंत्राकडे लक्ष वेधलं. विकसित भारताच्या संकल्पात विकसित महाराष्ट्र समर्थपणे आपलं
योगदान देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
उत्तम शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या
जोरावर महाराष्ट्र देशाच्या विकासाचं नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांनी पुण्यात राजभवन इथं राष्ट्रध्वज फडकावून तिरंग्याला मानवंदना दिली.
****
मराठवाड्यात सर्वत्र स्वातंत्र्यदिन
उत्साहात साजरा झाला. याबाबतचा हा वृत्तांत –
मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांच्या सहकार्यानं बीड जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, नवा विकसित बीड जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं. ते म्हणाले –
बाईट – उपमुख्यमंत्री
अजित पवार
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं. परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते
तर हिंगोली
इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन पार पडलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री
अतुल सावे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं
पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या
हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.
सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्र्यांच्या
हस्ते सेवा पदकं तसंच राष्ट्रपती पदकं प्रदान करण्यात आली आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर
केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले –
बाईट – पालकमंत्री
संजय शिरसाट
मुंबर्इ उच्च न्यालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय
न्यायमुर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी खंडपीठातील माननीय न्यायधीश, वकील संघ, तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू
डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठात
कुलगुरू डॉ इंद्र मणी
मिश्रा यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आले.
मुंबर्इ उच्च न्यालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात प्रशासकीय न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा कुलगुरू
डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात
कुलगुरू डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याशी संबंधित सर्व कामं वेळेत
पूर्ण व्हावी यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश
महाजन यांनी दिले. ते आज नाशिक इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत
होते. कुंभमेळ्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामं करावीत त्याचप्रमाणे कामांची गुणवत्ता
राखली जाईल याचीही दक्षता घ्यावी, असंही त्यांनी सूचित केलं.
****
शालेय शिक्षणात नवनवीन उपक्रमांचा समावेश
करण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या
कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचं शालेय
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात
भुसे यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या ‘दशसूत्री’
या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. शाळांची आणि शिक्षणाची स्थिती बळकट करण्यासाठी माजी
विद्यार्थ्यांशी शाळा संवाद साधेल. शाळा अद्यावतीकरणाची ही एक लोकचळवळ होईल,
त्यातून शाळांचे चित्र बदलेल,
असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
****
१०० दिवसांत कार्यालयीन सुधारणा मोहीम जिल्ह्यातल्या
सर्व तालुक्यांमध्ये उत्तम पद्धतीने राबवल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीला
आज द्वितीय पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गटविकास अधिकारी मीना रावताळे,
गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरी असलेलं प्रशस्तीपत्र
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं.
****
राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस
सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
त्यानंतरही दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून
पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर अधून-मधून वाढत असून नदी-नाल्यांना पूर आला असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड जिल्ह्यात २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली. विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे
उघडण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातला तावरजा
मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्क्यांवर गेला आहे.
धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या
माकणी इथल्या निम्न तेरणा धरणाचा पाणीसाठा ८५ टक्के झाला असून,
तेरणा नदीपात्रात विसर्ग सुरु होण्याची
शक्यता आहे.
****
हवामान
दक्षिण ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या उत्तर
भागात आज आलेल्या चक्रीवादळामुळे येत्या २० तारखेपर्यंत मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी
मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे पाच दिवस मराठवाड्याच्या
आठही जिल्ह्यात तसंच राज्यातल्या इतर भागातही विजांच्या कडकडाटात मुसळधार ते अतिमुसळधार
पाऊस पडेल, तर
कोकणासह गोव्यातही अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
****