Thursday, 1 January 2026

Audio - आकाशवाणी पुणे - दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 January 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जानेवारी २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      सोलापूर – नाशिक या सहा पदरी मार्गिकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला राज्य सरकारची मान्यता

·      वरीष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची पोलिस महासंचालक पदी नियुक्ती

·      साताऱ्यात आजपासून नव्व्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

आणि

·      नवीन वर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत

****

केंद्रीय मंत्रिमंडळाने सोलापूर – नाशिक या सहा पदरी मार्गिकेला काल मंजुरी दिली. ३७४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी १९ हजार १४२ कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली. अनेक शहरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ १७ तासांनी कमी होणार असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव

****

राज्य सरकारनं उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ ला मान्यता दिली आहे. पाच वर्षांसाठी हे धोरण लागू राहणार असून, या कालावधीत ५० लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं एक लाख १८ हजार २७५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली. यासंदर्भातला शासन आदेश उद्योग सचिवांनी काल जारी केला. राज्य मंत्रिमंडळानं ११ डिसेंबरला याला मंजुरी दिली होती.

**

अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा इथल्या अंबादेवी संस्थानाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर आठ आर जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पर्यटन महामंडळाची ही जमीन वापराविना पडून होती, त्यामुळे संस्थानाने या जमिनीची मागणी केली होती.

****

राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्जांची काल छाननी झाली. उद्या दोन जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. तीन जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होईल, आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल.

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला भोसले तसंच ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

****

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चासंदर्भात महत्त्वाचे बदल केले आहेत. रोख खर्चावर मर्यादा ठेवत बँक व्यवहार आणि खर्चाचं लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मनपा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रचार खर्चाची कमाल मर्यादा, मनपाच्या वर्गवारीनुसार निश्चित केली आहे. त्यानुसार अ वर्ग मनपासाठी १५ लाख रुपये, ब वर्गासाठी १३ लाख रुपये, क वर्गासाठी ११ लाख रुपये तर ड वर्ग मनपेसाठी ९ लाख रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

****

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ मधल्या त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर, करुणा शर्मा यांनी आक्षेप घेत, परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. परळी न्यायालयाने, सदर प्रकरणातले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत ते काल फेटाळून लावले.

****

वरीष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या परवा, तीन जानेवारीला सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुढचे दोन वर्ष ते या पदावर कार्यरत असतील.

****

नव्व्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सातारा इथं सुरू होत आहे. आज दुपारी ध्वजारोहण, कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन कट्टा आदी कार्यक्रम होणार असून, नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातारा शहरातून ग्रंथ दिंडी निघेल. संध्याकाळी सात वाजता मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या, साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.

****

सरत्या वर्षाला काल सर्वत्र निरोप देण्यात आला, त्यासोबतच नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह दिसून आला. पर्यटकांनी फुलून गेलेल्या पर्यटन स्थळांसह सर्वच ठिकाणी मध्यरात्री बारा वाजताचे ठोके पडताच, आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करत, परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन्, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आचार्य देवव्रत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. दहावीची परीक्षा येत्या ११ मार्चपासून तर बारावीची परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होईल. यापूर्वी या दोन्ही परीक्षा तीन मार्च रोजी सुरू होणार होत्या.

****

भारतीय कृषी संशोधन परिषदेनं शेतीविषयक अभ्यासक्रम बदलासाठी दहा वर्षांची वाट न पाहता, गरजेनुसार तत्काळ बदल करावेत, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. काल अहिल्यानगर इथं, बाभळेश्वर इथं कृषी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना यंत्रं तसंच अवजारांचं यावेळी वाटप करण्यात आलं. विविध कृषी योजनेतले लाभार्थी तसंच प्रगतीशील शेतकऱ्यांचा यावेळी चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिला तसंच शेतकरी गटांच्या दालनांनाही त्यांनी भेट देत संवाद साधला.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळ- एसटीच्या सर्व बसस्थानकांवर दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे बसस्थानकं अधिक स्वच्छ, आरोग्यदायी ठरणार असून, प्रवासी सेवेमध्ये गुणवत्तावाढ होण्यास मदत होणार आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे वरिष्ठ उद्घोषक नितीन देशपांडे काल सेवानिवृत्त झाले. १९९१ मध्ये आकाशवाणी केंद्रात रुजू झालेल्या देशपांडे यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रात विविध विभागांची जबाबदारी सांभाळली. इसाक आठवले हे आकाशवाणीचे कर्मचारीही ३४ वर्षाच्या सेवेनंतर काल सेवानिवृत्त झाले.

****

क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्यात अतिजोखीम गटात नोंदणी झालेल्या चार लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या  एक  हजार ८८२  क्षयरुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी ३६५ रुग्णांना पोषण आहार किट पुरवण्यात आले आहेत.

****

श्री क्षेत्र तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात काल शाकंभरी नवरात्रोत्सवात जलयात्रा काढण्यात आली. पापनाश तीर्थ कुंडातून पवित्र जलाने भरलेले कलश डोक्यावर घेत, पारंपरिक वेशभूषेत शेकडो महिलांनी या जलयात्रेत भक्तिभावाने सहभाग नोंदवला. जलयात्रेतील रथावर विराजमान असलेल्या शाकंभरी देवीच्या प्रतिमेची विविध प्रकारचा भाज्या आणि फळांचा वापर करून सजावट करण्यात आली होती.

****

बीड जिल्हा कारागृहातील ६० बंदी बांधवांसाठी तीन महिने कालावधीच्या 'हेल्पर वायरमन' प्रशिक्षण वर्गाला काल प्रारंभ झाला. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, दीनदयाल शोध संस्थान तसंच जन शिक्षण संस्थान यांच्या वतीनं आयोजित या प्रशिक्षण वर्गामुळे बंदीजनांना आपल्या पायावर उभं राहता येणार आहे. शिक्षा पूर्ण झाल्यावर, या सर्वांना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राद्वारे शासकीय बँकेकडून कर्ज घेता येतं, या कर्जात २५ टक्के अनुदानही दिलं जातं.

****

धाराशिव विमानतळ आता फक्त वैमानिक प्रशिक्षणापुरतं मर्यादित न राहता बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ विस्ताराचा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून, धाराशिवचा देशातल्या प्रमुख शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

****

केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत आणि हिंदयान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी इथं जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १५ ते १७ वयोगटातल्या मुलामुलींनी धावणे, गोळाफेक, खो खो, कबड्डी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

****

देशाच्या उत्तर भागात थंडीचा कडाका वाढला आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळावरची १४८ उड्डाणं काल रद्द करण्यात आली. उत्तर भारततली बहुतांश राज्यं थंडीनं गारठली असून, महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे.

राज्यात काल सर्वात कमी आठ पूर्णांक दोन दशांश सेल्सियस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल नागपुरात साडे आठ, जळगाव– नऊ पूर्णांक तीन, अहिल्यानगर – सुमारे साडे नऊ, तर परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे ११ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

Audio - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र