Saturday, 28 March 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.03.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 March 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मार्च २०२६ सायंकाळी ०६.१०

****

·      देशातला तेलसाठा संपत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील वृत्तांचं केंद्र सरकारकडून खंडन

·      पी एम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये केंद्रसरकारकडून बदल

·      ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा दुसरा क्रमांक-विभागातल्या तीन अधिकाऱ्यांचा गौरव

·      चंद्रपुरात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शांतता प्रतिकाची गिनिज बुकमध्ये नोंद

आणि

·      १९ व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

****

देशातला तेलसाठा संपत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील वृत्तांचे केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पत्रसूचना कार्यालयाच्या तथ्य-तपासणी पथकाने हे दावे दिशाभूल करणारे असल्याचं सांगत, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही, असं स्पष्ट केलं आहे. देशात इंधनाचा पुरवठा स्थिर असून त्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. देशाची इंधनाची साठवण क्षमता सुमारे चौऱ्याहत्तर दिवसांची असून, सध्याचा साठा सुमारे साठ दिवसांसाठी पुरेसा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक पुरवठा साखळीत होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा मार्ग असून, मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक करू देण्याची संयुक्त राष्ट्रांची विनंती इराणने मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रांमधे इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, भारताची दोन तेलवाहू जहाजं आज होर्मुझची सामुद्रधुनी पार करणार आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.

****

विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आणलेल्या पी एम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमधे केंद्रसरकारने बदल केला आहे. आता ३१ जुलै २०२६ पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि ३१ मार्च पर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढकलगाड्यांना ‘ही’ प्रोत्साहनपर सूट मिळेल. प्रोत्साहन मिळण्यासाठी दुचाकींची कमाल किंमत मर्यादा दीड लाख रुपये तर रिक्षांची कमाल किंमत मर्यादा अडीच लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या मन की बातकार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १३२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण वाहिन्यांसह, ‘एआयआर न्यूजसंकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआरमोबाईल ॲपवर केलं जाईल. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

****

महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आज मुंबईत सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं.

ही कामगिरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने केला जाईल असा विश्वास, आयुक्त पापळकर यांनी या कार्यक्रमानंतर बोलतांना व्यक्त केला.

१५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमात ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आलं.

सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये पुण्याचे गजानन पाटील, सांगलीचे विशाल नरवाडे, ठाण्याचे रणजित यादव, नाशिकचे ओमकार पवार आणि नागपूरचे विनायक महामुनी हे सर्वोत्तम जिल्हा प्रशासकीय अधिकारी ठरले आहेत. सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा मान जळगावचे रोहन घुगे, ठाण्याचे श्रीकृष्ण पांचाळ, धाराशिवचे कीर्ती किरण पुजार, लातूरच्या वर्षा ठाकूर घुगे, आणि कोल्हापूरचे अमोल येडगे यांना मिळाला आहे.

****

महाराष्ट राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकारातून राबवण्यात येत असलेल्या मधाचे गांव या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत राज्य शासनानं राज्यातील दहा गावांना मान्यता दिली आहे. यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या बोरझर गावाची निवड करण्यात आली आहे. यासाठी ३० मधपाळांची निवड करुऩ त्यांना प्रशिक्षण देत त्यांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, चंद्रपूरच्या सोमय्या ग्रुप आँफ इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी आज शांततेचे प्रतीक असलेले चिन्ह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारत गिनिज बुकात नाव नोंदवलं आहे. यापूर्वी हा विक्रम १ हजार ७० मुलांच्या नावावर होता. आज झालेल्या या कार्यक्रमात १ हजार ३०० विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम केला आहे. त्यासाठी गिनिज बुक संस्थेच्या प्रतिनिधीने सोमय्या ग्रुपचे संचालक पांडुरंग आंबटकर यांनी प्रमाणपत्र सोपवले.

****

छत्रपती संभाजीनगर इथले तालवादक शरद दांडगे यांच्या ओम पंचनाद या कार्यक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. दांडगे यांनी नऊ तबले आणि एका ढोलच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीतातल्या २४ वाद्यांचा आभास निर्माण केल्याबद्दल ही नोंद करण्यात आली.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव परवा ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान साजरा होत आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी बीडकर पायऱ्यांवरुन सोडण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांसाठीचे रेफरल दर्शन पास आणि ५०० रुपयांचे दर्शन पास बंद राहणार आहेत. सशुल्क २०० रुपयांचा पास घेणारे भाविक, अभिषेक पासधारक, धर्मदर्शन आणि मुखदर्शन करणाऱ्या भाविकांना या बीडकर पायऱ्यांवरुन दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचं तुळजाभवाऩी मंदिर प्रशासनानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर नजिक श्रीक्षेत्र देवगड इथं आजपासून मातृसंस्कार अधिवेशनाला प्रारंभ झाला. विश्वमांगल्य सभेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत व्याख्यानं, परिक्रमा, गंगा गोदावरी आरती, आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

लातूर जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाच्या निवडीसाठी ३० मार्च, रोजी दुपारी दोन वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांना सदर विशेष सभेची नोटीस देण्यात आली आहे.

****

वाचन संस्कृती काल होती, आज आहे, उद्याही राहणार असून, त्याची चिंता करण्याचं कारण नाही, असं मत, माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज बीड जिल्ह्यातील गेवराई इथं ग्रंथमहोत्सव-२५च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचे वारे जरी वाहत असले, तरी त्यासाठी लागणारा डेटा तज्ज्ञ माणसं तयार करुन फीड करतात. माहिती भरल्याशिवाय त्याची उत्तरे मिळत नाहीत, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधलं.

****

दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतिनिमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं नाथस्वर संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. स.भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

****

बीड जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम – २०२५ प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ४१६ मतदान केंद्रांवर सुमारे २२ लाख ४३ हजार मतदार नोंदींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी सुमारे १५ लाख ९६ हजार नोंदींचं काम पूर्ण झालं आहे.

****

१९ वी इंडियन प्रीमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु होत आहे. बंगळुरू इथं एम. चिन्नास्वामी मैदानावर 'सनरायझर्स हैदराबाद' आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूया संघांमध्ये सलामीचा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांची लढत होणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बंगळुरूमध्येच अंतिम सामन्यानंतर विजय सोहळ्याच्या वेळी चेंगराचेंगरी झाल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या प्रति संवेदना म्हणून, यंदा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार नाही असं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. या मृत ११ जणांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी प्रेक्षागृहातली ११ आसनं पूर्ण स्पर्धेदरम्यान रिकामी ठेवली जाणार आहेत.

****

हवामान

मुंबई तसंच रायगड जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. तर उद्या सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसात अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्या गारपिट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment