Sunday, 29 March 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार

·      ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाचा दुसरा क्रमांक-विभागातल्या चार अधिकाऱ्यांचा गौरव

·      १९ व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ; सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सनरायजर्स हैदराबादवर विजय

आणि

·      लातूर, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत आज पावसाचा यलो अलर्ट जारी

****

विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात जेवर इथं, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधांवरच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सहापट वाढ केली असून, महामार्ग तसंच द्रुतगती महामार्गांवर सुमारे १७ लाख कोटी रुपये खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात एक लाख किलोमीटर महामार्ग जाळं विणण्यात आलं असून जवळपास १०० टक्के ब्रॉडगेज नेटवर्कचं विद्युतीकरण झालं आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना देशवासियांच्या विश्वासाच्या बळावरच करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले…

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

देशातला तेलसाठा संपत असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील वृत्तांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पत्रसूचना कार्यालयाच्या तथ्य-तपासणी पथकाने हे दावे दिशाभूल करणारे असल्याचं सांगत, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही, असं स्पष्ट केलं. देशात इंधनाचा पुरवठा स्थिर असून त्यावर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे. देशाची इंधनाची साठवण क्षमता सुमारे चौऱ्याहत्तर दिवसांची असून, सध्याचा साठा सुमारे साठ दिवसांसाठी पुरेसा असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आणलेल्या पी एम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमधे केंद्र सरकारने बदल केला आहे. आता ३१ जुलै २०२६ पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि ३१ मार्च पर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढकलगाड्यांना ‘ही’ प्रोत्साहनपर सूट मिळेल. प्रोत्साहन मिळण्यासाठी दुचाकींची कमाल किंमत मर्यादा दीड लाख रुपये तर रिक्षांची कमाल किंमत मर्यादा अडीच लाख इतकी ठेवण्यात आली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या 'मन की बात' कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा १३२ वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण सकाळी ११ वाजता, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण वाहिन्यांसह, 'एआयआर न्यूज' हे संकेतस्थळ आणि 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर केलं जाईल. आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

****

महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय मूल्यमापनात, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत, राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. काल मुंबईत सह्याद्री सभागृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं.

ही कामगिरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असून, भविष्यातही प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने केला जाईल असा विश्वास, आयुक्त पापळकर यांनी या कार्यक्रमानंतर बोलतांना व्यक्त केला.

१५० दिवसांच्या या सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत ‘सेवा कर्मी प्लस’ या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी केली. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला सर्वोत्तम पोलिस महानिरीक्षक पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा मान जळगावचे रोहन घुगे, ठाण्याचे श्रीकृष्ण पांचाळ, धाराशिवचे कीर्ती किरण पुजार, लातूरच्या वर्षा ठाकूर घुगे, हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि कोल्हापूरचे अमोल येडगे यांना मिळाला आहे.

****

राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक प्रकल्पांमुळे भूसंपादनांशी संबंधित प्रलंबित राज्यातल्या २८ हजार प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी ५७ नवीन लवादांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने ही नियुक्ती करण्यात आली. यामुळे अनेक वर्षांपासून मोबदल्याविना रखडलेले २८ हजारांहून अधिक प्रकल्पग्रस्तांचे दावे आता जलद गतीने निकाली निघणार आहेत.

****

महाराष्ट्रात पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा नेटवर्कचा विस्तार वेगाने करण्यासाठी केंद्राने तांत्रिक आणि आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नवी दिल्लीत काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी, पीएनजी विस्तारातील अडचणींकडे लक्ष वेधलं. बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर आणि हरदीप सिंग पुरी यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पीएनजी जोडणी अनिवार्य करण्याचा प्रस्तावही भुजबळ यांनी या बैठकीत मांडला.

****

राज्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, राज्यभरात २१० पैकी १८३ साखर कारखान्यांमधलं गाळप बंद झालं आहे. आतापर्यंत ९८ लाख ८० हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे, यामध्ये सर्वाधिक सुमारे २३ लाख टन उत्पादन कोल्हापूर विभागात झाल्याची माहिती, साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा उत्सव उद्या ३० मार्च ते ३ एप्रिल दरम्यान साजरा होत आहे. या उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी बीडकर पायऱ्यांवरुन सोडण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांसाठीचे रेफरल दर्शन पास आणि ५०० रुपयांचे दर्शन पास बंद राहणार आहेत. सशुल्क २०० रुपयांचा पास घेणारे भाविक, अभिषेक पासधारक, धर्मदर्शन आणि मुखदर्शन करणाऱ्या भाविकांना या बीडकर पायऱ्यांवरुन दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचं तुळजाभवानी मंदिर प्रशासनानं कळवलं आहे.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गॅस कंपन्यांचे वितरण अधिकारी आणि गॅस एजन्सी धारकांची बैठक घेतली. ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 'होम डिलिव्हरी' देणं बंधनकारक असून, ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत एजन्सीवर बोलावून गॅस देऊ नये, असे निर्देश कर्डीले यांनी यावेळी वितरण अधिकाऱ्यांना दिले.

****

१९ वी इंडियन प्रीमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धा कालपासून सुरू झाली. बंगळुरू इथं एम. चिन्नास्वामी मैदानावर 'सनरायझर्स हैदराबाद' आणि गतविजेते 'रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू' या संघांमध्ये झालेल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं सहा गडी राखून विजय मिळवला. हैदराबादच्या संघाने दिलेलं २०२ धावांचे लक्ष्य बंगळुरुच्या संघानं १५ षटकं ४ चेंडूतच पूर्ण केलं. विराट कोहली ६९ धावांवर नाबाद राहत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर देवदत्त पडिक्कलने ६१ आणि रजत पाटीदारने ३१ धावा केल्या. जेकब डफीला 'सामनावीर' म्हणून घोषित करण्यात आलं.

****

महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला काल सोलापूर इथं सुरूवात झाली. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत काल पहिल्या फेरीत महिला कुस्तीपटूंच्या विविध वजनी गटातल्या स्पर्धा पार पडल्या.

****

वाचन संस्कृती काल होती, आज आहे, उद्याही राहणार असून, त्याची चिंता करण्याचं कारण नाही, असं मत, माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ए आय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वारे जरी वाहत असले, तरी त्यासाठी लागणारा डेटा तज्ज्ञ माणसं तयार करुन फीड करतात. माहिती भरल्याशिवाय त्याची उत्तरे मिळत नाहीत, याकडे गव्हाणे यांनी लक्ष वेधलं.

****

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय गंगाधर करंडक स्पर्धेचं उद्घाटन काल ज्येष्ठ अभिनेते नितीन दंडुके यांच्या हस्ते झालं. नाटक हे मानवी जीवन समृद्ध करणारं एक महत्वाचं कला माध्यम असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

दिवंगत शास्त्रीय गायक पंडित नाथराव नेरळकर यांच्या स्मृतिनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं नाथस्वर संगीत महोत्सव साजरा झाला. स.भु. शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचं, महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गायिका प्राजक्ता जोशी आणि गायक प्रसाद खापर्डे यांनी सांगितिक सादरीकरणातून पंडित नेरळकर यांना आदरांजली अर्पण केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथले तालवादक शरद दांडगे यांच्या ओम पंचनाद या कार्यक्रमाची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद झाली आहे. दांडगे यांनी नऊ तबले आणि एका ढोलच्या माध्यमातून एकाच सादरीकरणात भारतीय तसंच पाश्चिमात्य संगीतातल्या २४ वाद्यांचा आभास निर्माण केल्याबद्दल ही नोंद करण्यात आली.

****

महिलांनी आजार होण्यापूर्वीच तपासणी करुन उपचार करून घ्यावेत असं आवाहन, धाराशिवचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केलं आहे. ते काल धाराशिव जिल्ह्यात पळसप इथं शिक्षण महर्षी वसंतराव काळे यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ११ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं घेतलेल्या स्त्रीरोग निदान शिबीरात बोलत होते. या शिबिरात ५०० पेक्षा अधिक महिलांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आलं.

****

यंदाचा गोविंद देशपांडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पशुवैज्ञानिक डॉ. दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर यांना काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या समारंभात डॉ. के. डी. देशमुख यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्काराचं हे १९ वं वर्ष आहे. प्राध्यापक रविशंकर झिंगरे यांनी यावेळी डोकं चालतं कसं, या विषयावर मार्गदर्शन केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मार्च - एप्रिल २०२६ च्या उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. पदवीच्या परीक्षा सात एप्रिलपासून तर पदव्युत्तर परीक्षा १६ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

****

शक्तिपीठ तसंच सुरत – चेन्नई ग्रीफफिल्ड महामार्गासाठी करण्यात येणार्या भूसंपादनाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज धाराशिव इथं शेतकरी संघर्ष न्याय यात्रा काढण्यात येणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे यांनी काल ही माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार्या या यात्रेत शेतकर्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन, देहाडे यांनी केलं.

****

हवामान

राज्यात लातूर, धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसात अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्या गारपीट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment