Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 April
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· एलपीजी
वितरकांकडे पाच किलो वजनाची छोटी सिलिंडर्स उपलब्ध-फक्त वैध ओळखपत्राच्या आधारे खरेदीला
मान्यता
· बारामती
विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· नांदेड
इथं दोन गटात हिंसाचार;तीन ठार-चौघांना अटक
· ईस्टर संडे
निमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
· माहूरच्या
दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती यांचं देहावसान
आणि
· डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांत सलग १८ तास वाचन उपक्रमाचं आयोजन
****
देशात इंधनाचा अखंडित पुरवठा
होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायू मंत्रालयाने दिली आहे. नागरिकांनी टंचाईच्या भीतीतून पेट्रोल डिझेल खरेदी किंवा
एलपीजी बुकिंग करणं टाळावं, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, सर्व एलपीजी
वितरकांकडे पाच किलो वजनाची छोटी सिलिंडर्स उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांना
आपलं वैध ओळखपत्र दाखवून हे सिलिंडर खरेदी करता येईल, त्यासाठी घरच्या पत्त्याचा
पुरावा आवश्यक नसल्याचं, मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, ‘ग्रीन सान्वी' हे भारतीय
जहाज ४४ हजार टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईकडे निघालं आहे. पश्चिम
आशियात युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास
करणारं हे सातवं भारतीय जहाज आहे. सामुद्रधुनीच्या पश्चिमेला थांबलेल्या १७ भारतीय
जहाजांपैकी, 'ग्रीन आशा' आणि 'जग विक्रम' ही दोन जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत. या जहाजांना सामुद्रधुनी पार करण्याची
लवकरच परवानगी मिळेल आणि देशांतर्गत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
****
बारामती विधान सभेची पोटनिवडणूक
बिनविरोध करावी, असं आवाहन मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
या निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. ते म्हणाले..
बाईट-
मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस
****
विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव
ठाकरे यांच्या उमेदवाराला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे
यांच्या पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा दिला होता, आता विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी
निवडणूक होणार आहे. विधान सभेतील सध्याचं संख्याबळ पाहता महायुतीच्या वाट्याला ८ जागा, तर महाविकास
आघाडीच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे.
****
नाशिक इथल्या दुर्घटनेप्रकरणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिंडोरी इथं परवा
एक चारचाकी गाडी रस्त्याजवळच्या विहिरीत पडून नऊ जणांचा मृत्यू झाला होता, या सर्व
मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे.
अशा धोकादायक विहिरींची पाहणी करून, आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. नागपूर इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली, ते म्हणाले…
बाईट-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, ही विहीर
तातडीनं बुजवण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले होते, त्यानुसार ती काल बुजवण्यात
आल्याचं वृत्त आहे. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी
काल या अपघात स्थळाला भेट दिली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार
भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे
सचिव चंचल कुमार यांनी काल पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन तिथे सुरू
असलेल्या कामांचा आढावा घेतला तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला.चंचलकुमार यांनी भारतीय
चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था- एफ.टी.आय.आय. लाही काल भेट दिली. चंचलकुमार यांनी
संस्थेतल्या प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा
घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ख्रिस्ती बांधवांचे प्रेषित
येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाचा दिवस, ईस्टर संडे आज साजरा होत आहे.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
येशू ख्रिस्तांची मानवता, प्रेम, दया आणि
त्यागाची शिकवण सर्वाधिक प्रासंगिक असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या
चर्चमधून प्रार्थना सभांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
गर्भाशय काढून
टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे, या
समितीचं कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांच्या
कामाचं स्वरूप लवकरच ठरवण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम
गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
नांदेड इथं काल पहाटे दोन
गटात झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात
आली आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांमधे काही कारणाने वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर
तीक्ष्ण हत्यारांनी वार केले गेले, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी
नेलं असता, दुसऱ्या टोळीने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी
सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, मोठ्याप्रमाणावर कारवाईचा
इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. ते म्हणाले…
बाईट- पोलीस
अधीक्षक अविनाश कुमार नांदेड
****
श्री क्षेत्र माहूर गड इथल्या
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत परमपूज्य मधुसूदन भारती यांचं काल देहावसान झालं, ते ९५ वर्षांचे
होते. साधेपणा आणि आध्यात्मिक चिंतनासाठी ओळखले जाणारे मधुसूदन भारती यांनी आध्यात्म, नैतिक मूल्यं
आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, हिंगोलीचे
खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह अनेक संत, महंत, तसंच विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिव देहावर
आज दुपारी ३ वाजता धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या ग्रंथालयात येत्या १२ एप्रिल रोजी सलग १८ तास
वाचन उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त
कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये
सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण होणं, एकाग्रता वाढवणं आणि वेळेचे
व्यवस्थापन करणं, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी
६ वाजल्यापासून सदर अभियानास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, बाबासाहेबांच्या
१३५ व्या जयंतीनिमित्त येत्या सात ते १४ एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात जयंती महोत्सव साजरा होत आहे. यात, कथाकथन, काव्यवाचन, वक्तृत्व
स्पर्धा, आंबेडकरी जलसा, भीमगीत रजनी, मान्यवरांची व्याख्यानं आदी
कार्यक्रमांचा समावेश आहे.
****
लातूरचे नवीन जिल्हाधिकारी
डॉ. भारत बास्टेवाड यांनी काल मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून
पदभार स्वीकारला. वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी
शुभेच्छा दिल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे
नूतन आयुक्त अमोल येडगे यांनी मावळते आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडून पदभार स्वीकारला.
श्रीकांत यांनी येडगे यांचं मनपा कार्यालयात स्वागत करत, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
दिल्या.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई
इथलं उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उद्या सोमवार ६ मार्चपासून स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय
इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. त्यामुळं नागरिकांनी वाहन नोंदणी, वाहन परवाना, कर भरणा
तसंच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी यापुढे लोखंडी सावरगाव इथल्या
नवीन कार्यालयात आपली कामं करून घ्यावीत, असं आवाहन अंबाजोगाईचे उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात शालेय विद्यार्थी
वाहतुक करणाऱ्या बसने धडक दिल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यात
वारंगा फाटा इथं काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील पदवी परीक्षा परवा सात एप्रिल तर पदव्युत्तर
अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी पदवीच्या परीक्षा ३८, तर पदव्युत्तर
अभ्यासक्रमाच्या परीक्षा ३२ दिवसांत पूर्ण होतील. पदवी परीक्षेसाठी दोन लाख ८१ हजार, तर पदव्युत्तर
परीक्षेसाठी ४१ हजार परीक्षार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन
मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर
परिमंडलातील १३ लाख ३३ हजार ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यासाठी
नव्यानं नोंदणीसाठी तसंच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून
सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार
कछोट यांनी केलं आहे.
****
क्रिकेट
इंडियन प्रीमिअर लीग टी ट्वेंटी
क्रिकेट स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला.
मुंबई संघाने दिलेलं १६३ धावांचं आव्हान दिल्ली संघाने अठराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर
चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
कालच्या दुसऱ्या सामन्यात
राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा सहा धावांनी पराभव केला. अहमदाबाद इथं झालेल्य
या सामन्यात, राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करत सहा बाद २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात
संघाला आठ बाद २०४ धावाच करता आल्या.
या स्पर्धेत आज सनरायझयर्स
हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायटंस् तसंच रॉयल चॅलेंजर्स बेंगलरु विरुद्ध चेन्नई सुपर
किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
हवामान
राज्यात मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, नांदेडसह
विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज तर विदर्भात यवतमाळसह अनेक जिल्ह्यांना उद्या पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment