Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
· एलपीजी वितरकांकडे पाच किलो वजनाची छोटी सिलिंडर्स उपलब्ध-फक्त वैध ओळखपत्राच्या
आधारे खरेदीला मान्यता
· बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी-मुख्यमंत्र्यांचं आवाहन
· नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर
· नांदेड इथं दोन गटात हिंसाचार; तीन ठार-चौघांना अटक
आणि
· डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांत सलग १८ तास
वाचन उपक्रमाचं आयोजन
****
देशात इंधनाचा अखंडित पुरवठा होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं
उचलली जात असल्याची ग्वाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. नागरिकांनी
टंचाईच्या भीतीतून पेट्रोल डिझेल खरेदीचा किंवा एलपीजी बुकिंग करणं टाळावं, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, सर्व
एलपीजी वितरकांकडे पाच किलो वजनाची छोटी सिलिंडर्स उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांना आपलं वैध ओळखपत्र दाखवून हे सिलिंडर खरेदी करता येईल, त्यासाठी घरच्या पत्त्याचा पुरावा आवश्यक नसल्याचं, मंत्रालयाकडून
स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
दरम्यान, ‘ग्रीन सान्वी' हे भारतीय जहाज ४४ हजार टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनी पार करून मुंबईकडे
येत आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिन्याभरात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून
प्रवास करणारं हे सातवं भारतीय जहाज आहे. सामुद्रधुनीच्या पश्चिमेला थांबलेल्या १७
भारतीय जहाजांपैकी, 'ग्रीन आशा' आणि
'जग विक्रम'
ही दोन जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत. या जहाजांना सामुद्रधुनी
पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि देशांतर्गत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होईल, असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
****
बारामती विधान सभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
या निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. ते म्हणाले..
बाईट- मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस
****
नाशिक इथल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिंडोरी इथं काल एक चारचाकी गाडी रस्त्याजवळच्या विहिरीत
पडून नऊ जणांचा मृत्यू झाला, या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना
सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. अशा धोकादायक विहिरींची
पाहणी करून,
आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागपूर इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती
दिली,
ते म्हणाले…
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
दरम्यान, ही विहीर तातडीनं बुजवण्याचे
निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री
गिरीष महाजन यांनी आज या अपघात स्थळाला भेट दिली त्यानंतर ही माहिती दिली. अन्न आणि
औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसंच
अधिकाऱ्यांशी संवाद साधला. चंचलकुमार यांनी आज भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था-
एफटीआयआय ला भेट दिली. चंचलकुमार यांनी संस्थेतल्या प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच
शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड इथं आज पहाटे दोन गटात झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा
मृत्यू झाला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गुन्हेगारी टोळ्यांमधे
काही कारणाने वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले
गेले,
यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी
नेलं असता,
दुसऱ्या टोळीने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक
अविनाश कुमार यांनी सांगितलं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, मोठ्या प्रमाणावर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला. ते म्हणाले…
बाईट- पोलीस अधीक्षक अविनाश कुमार
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या
ग्रंथालयात येत्या १२ एप्रिल रोजी सलग १८ तास वाचन उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या
संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची
सवय निर्माण होणं, एकाग्रता वाढवणं आणि वेळेचे व्यवस्थापन करणं, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सदर अभियानास
सुरुवात होणार आहे.
****
लातूरचे नवीन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज मावळत्या
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. वर्षा ठाकूर-घुगे यांनी
त्यांचं स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथलं उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, येत्या सोमवार ६ मार्चपासून स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित
होत आहे. त्यामुळं नागरिकांनी वाहन नोंदणी, वाहन
परवाना,
कर भरणा तसंच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी
नागरिकांनी यापुढे लोखंडी सावरगाव इथल्या नवीन कार्यालयात आपली कामं करून घ्यावीत, असं आवाहन अंबाजोगाईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलं आहे.
****
परळी इथून थेट मुंबईसाठी रेल्वे सेवा सुरु करावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे, सोनवणे
यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन याबाबतचं निवेदन
त्यांना सादर केलं. लातूर-मुंबई एक्सप्रेस परळीपर्यंत विस्तारित करण्यासह रेल्वेच्या
विविध प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
हिंगोली जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या बसने धडक
दिल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा इथं आज
दुपारी ही दुर्घटना घडली.
****
ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी एका बेवारशी टेम्पोमधून सहा लाख ६०
हजार रुपये किंमतीचा बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. मीरा
भाईंदर,
वसई आणि विरार पोलिसांच्या पथकाला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत
रस्त्याच्या कडेला हा टेम्पो आढळला. टेंपोच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
****
धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीरपणे
विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे
यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत एकूण ६१ हजार ४७४ रुपयांचा
प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील
पदवी परीक्षा ७ एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १६ एप्रिलपासून सुरू
होत आहे. यावेळी पदवीच्या परीक्षा ३८, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या
परीक्षा ३२ दिवसांत पूर्ण होतील. पदवी परीक्षेसाठी दोन लाख ८१ हजार, तर पदव्युत्तर परीक्षेसाठी ४१ हजार परीक्षार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा
आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील १३ लाख ३३ हजार
ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे. यासाठी नव्यानं नोंदणीसाठी तसंच
आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या
सेवांचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी
केलं आहे.
****
क्रिकेट
इंडियन प्रीमिअर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीत
अरुण जेटली मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना सुरू आहे. मुंबई
इंडियन्स संघाने दिल्ली संघासमोर १६३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. कर्णधार सूर्यकुमार
यादवने ३६ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्स
संघानं सातव्या षटकात दोन
बाद ४३ धावा केल्या होत्या.
****
हवामान
राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment