Saturday, 11 April 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी इथं विशेष कार्यक्रम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र या उपक्रमाचा तसंच 'ज्योति-सावित्री' जिल्हा परिषद शाळेचा शुभारंभ या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती होती.  “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाला पुढे नेत शिक्षण देण्याचं काम केलं, म्हणूनच आज दोनशे वर्षानंतर देश त्यांची आठवण करतो” असं भुजबळ म्हणाले. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था-‘इस्रो’नं आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथं गगनयान मोहिमेसाठीची दुसरी एकात्मिक 'वायू क्षेप' चाचणी यशस्वीरित्या पार पडली. मानवी अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळवीर कक्ष-‘क्रू मॉड्यूल’ पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. या चाचणीत १० पॅराशूट्सच्या साहाय्याने मॉड्यूलचा वेग नियंत्रित करून जमीनीवर ते सुरक्षित उतरवण्यात आले. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अशीच पहिली चाचणी घेण्यात आली होती. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या यशाबद्दल ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

****

राज्य शासनाने शहर गॅस वितरण कंपन्यांना २४ तास कार्यरत राहणारी हेल्पलाइन सुरू करण्याचे आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या अर्थात ‘पीएनजी’ जोडण्यांसाठीचे अर्ज हाताळणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा पुरवठा संकटाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने कंपन्यांना, संपूर्ण राज्यात ‘पीएनजी’ची व्याप्ती अधिक विस्तृत करण्यासाठी आपल्या पोहोच तसंच पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांसाठी २४ तास हेल्पलाइन कार्यान्वित करण्याचे आणि जोडणीसाठी अर्ज करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी शहर वायू वितरण कंपन्यांना दिले आहेत. 

****

नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास भूकंप झाला. हिंगोली जिल्ह्यात भूगर्भातून आवाज होऊन जमीन हादरल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर पळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची नोंद झाली असून ४ पूर्णांक ७ रिश्टर स्केल एवढी तीव्रता असल्याचं या विभागाचे प्रमुख डॉ. टी. विजयकुमार यांनी सांगितलं. या भूकंपामुळे जिल्ह्यातील अनेक भागात घरांना तडे गेले, तर काही भागात कच्च्या घरांची पडझड झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात होता. परिसरातील दीडशे किलोमीटर पर्यंत या भूकंपाचे परिणाम जाणवले आहेत. स्थितीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

****

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पंचाळे -शहा रस्त्यावर आज पहाटे ट्रक आणि पिकअप वाहनाच्या अपघातात होरपळून दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला. पंचाळे इथून जागरण गोंधळ कार्यक्रम संपल्यानंतर पीकअप वाहनाने घरी येताना हा भीषण अपघात झाला. पशुखाद्याने भरलेल्या ट्रकने पिकअप वाहनाला सुमारे १०० फूट ओढत नेलं, यादरम्यान डांबरी रस्त्यावर घर्षणामुळे पिकअप पेटली असावी असा अंदाज आहे.

****

संघटन सृजन अभियानाद्वारे काँग्रेस आगामी काळात संघटन मजबूतीवर भर देत असून धाराशिव जिल्ह्याची कार्यकारणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नागरिक यांच्याशी चर्चा करून घोषित केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव राजेश तिवारी यांनी आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत दिली. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळात उदयसिंह पाटील, श्रावण रॅपनवाड यांच्यासह प्रदेश पदाधिकारी सहभागी आहेत.

****

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सतरा कोटी आठ लक्ष नव्वद हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ आणि  नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानीपोटी ही मदत मंजुर करण्यात आली आहे.

****

भारताने यंदाच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक एकूण १६ पदकं जिंकत तालिकेत दुसरं स्थान मिळवलं आहे. या स्पर्धेत भारताने पाच सुवर्णपदकांची कमाई केली, तर कझाकस्ताननं सहा सुवर्णपदकांसह एकूण १३ पदकं जिंकत पहिलं स्थान मिळवलं. याच स्पर्धेत भारतीय महिला संघानं ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण १० पदकं जिंकत पहिलं स्थान मिळवत खंडीय स्तरावर आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

****

 

No comments:

Post a Comment