Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 April 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ एप्रिल २०२६
सायंकाळी ६.१०
****
·
महात्मा
जोतिराव फुले यांना १९९व्या जयंती दिनी सर्वत्र अभिवादन
·
शालेय
बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा राज्य सरकारचा
प्रस्ताव
·
नांदेड,
परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला आज भूकंपाचा
धक्का
आणि
·
आशियाई
बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत
धडक
****
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव
फुले यांची १९९वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्ताने देशभारासह राज्यात विविध पक्ष
संघटनांच्या वतीने त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. विविध भागांत विविध कार्यक्रमांचही
आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा
अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरातील प्रेरणा स्थळ इथं महात्मा फुले यांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रस्तावित
दोनशेव्या जयंतीनिमित्त आगामी २०२७ हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा
निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत आजच्या अकरा
एप्रिलपासून ते पुढच्या वर्षीच्या दहा एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये
विविध शैक्षणिक, सामाजिक
आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा व्यापक कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने
आज सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालयं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन
करून या उपक्रमांची सुरुवात होत आहे.
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती
वर्षानिमित्त पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातल्या त्यांच्या मूळ गावी,
जिल्हा परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या
‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचं’ उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते आज झालं. ही अत्याधुनिक शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून
महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून
भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आजचा
शिक्षणाचा अधिकार कायदा ही महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
विचारांची फलश्रुती असल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण
करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर
इथं जयंती उत्सव समितीतर्फे आज सायंकाळी शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. तसंच शहरातल्या
तापडीया नाट्य मंदिरात आज सायंकाळी भीम ज्योती महोत्सव होणार आहे.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात
कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विविध रंगांच्या १९९ किलो फुलांचा वापर करून महात्मा
ज्योतिबा फुले यांची भव्य आणि जिवंत भासणारी प्रतिमा साकारण्यात आली. तर डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांच्या आगामी १३५व्या जयंतीनिमित्त दहा हजार,
१३५ दिवे काल प्रज्वलित करण्यात आले.
****
बीड इथं सिध्दीविनायक व्यापारी संकुल
परिसरात महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विविध पक्ष संघटनांतर्फे
अभिवादन करण्यात आलं. तसंच ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
नांदेड इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा
फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण
करून अभिवादन करण्यात आलं. समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सामाजिक
समता सप्ताहांतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि स्वछता अभियान राबवण्यात आलं. यावेळी
प्रभात फेरीही काढण्यात आली.
****
जालना इथं महापालिका उद्यानातल्या फुले
यांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केलं.
विविध कार्यक्रमही यावेळी पार पडले.
****
शालेय बसचे शुल्क प्रादेशिक वाहतूक
प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे.
यानुसार पालकांकडून केवळ मासिक शुल्क घेतले जाईल, एकरकमी आगाऊ रक्कम घ्यायला सरकारनं मनाई केली आहे. बसमधला
विद्यार्थी किती वाजता आला आणि किती वाजता उतरला या वेळेसह त्याची दैनिक उपस्थिती नोंद
बंधनकारक करण्यात आली आहे. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनात
महिला परिचर असणं आवश्यक असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक
वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टम बसवणे आवश्यक असेल. सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये
GPS-आधारित Vehicle
Location Tracking Device, पॅनिक
बटण, अग्निसुरक्षा
यंत्रणा, CCTV तसेच
सर्व सीट्ससाठी सीट बेल्ट सक्तीचे आहे. बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी,
वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्रही
सरकारनं अनिवार्य केलं आहे. प्रत्येक शाळेत परिवहन समिती कार्यरत असेल. भाडे,
सुरक्षा आणि सेवा यासंबंधी पालकांच्या
तक्रारींचे निवारण समितीच्या माध्यमातून करण्या येईल.
****
मुंबईत एन एफ डी सी अर्थात राष्ट्रीय
चित्रपट विकास महामंडळाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार
यांनी आज भेट देत इथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महामंडळाच्या प्रांगणात
वृक्षारोपणही केलं. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली.
एन एफ डी सी प्रांगणातल्या आय आय सी टी मधल्या सुविधांचाही यावेळी कुमार यांनी आढावा
घेतला.
****
मराठवाड्यातील नांदेड,
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी
पावणे नऊ वाजेच्या सुमारास भूकंप झाला. हिंगोली जिल्ह्यात भूगर्भातून आवाज होऊन जमीन
हादरल्याने नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर पळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची नोंद झाली असून ४ पूर्णांक ७ रिश्टर स्केल एवढी तीव्रता
असल्याचं या विभागाचे प्रमुख डॉक्टर टी. विजयकुमार यांनी सांगितलं.
नांदेड शहरासह अर्धापूर,
मुदखेड,
लोहा,
नायगाव तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे
धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच नांदेड शहर तसंच ग्रामीण भागातील नागरिकांनी
घराबाहेर धाव घेतली.
या भूकंपामुळे जिल्ह्यातील अनेक भागात
घरांना तडे गेले, तर
काही भागात कच्च्या घरांची पडझड झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात होता.
परिसरातील दीडशे किलोमीटर पर्यंत या भूकंपाचे परिणाम जाणवले आहेत. स्थितीवर जिल्हा
प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं
आहे.
नागरिकांनी या काळात खबरदारी घेण्याचं
आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी केलं आहे.
****
लव्ह जिहादच्या मुद्द्यावर कठोर कायदा
करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण
तोगडिया यांनी केली आहे. ते आज लातूर इथं हिंदू मेळावासाठी आले असता,
पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंदू समाजाच्या
समृद्धी तसंच सुरक्षेसाठी देशात हिंदू बहुमत टिकून राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त
केली.
****
चीनमध्ये निंगबो इथे सुरु असलेल्या
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीने पुरुष एकेरी गटात अंतिम
फेरीत धडक मारली. जागतिक मानांकनात २५व्या स्थानावरच्या आयुषने उपांत्य फेरीत अग्रमानांकित
आणि गतविजेता थायलंडच्या खेळाडूला १०-२१, २१-१९, २१-१७ असं पराभूत केलं. अंतिम सामन्यात आयुषचा मुकाबला चीनच्या
द्वितीय मानांकित शी यु कि बरोबर होईल. भारताच्या दिनेश खन्ना याने १९६५ साली या स्पर्धेत
पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवलं होतं, त्यानंतर आता आयुष शेट्टी हा अंतिम फेरी गाठणारा
दुसरा भारतीय ठरला आहे.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये आज पंजाब किंग्सचा
सामना सनराइजर्स हैदराबादशी सध्या सुरु आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण
करायचा निर्णय घेतला आहे.
आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज
आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार असून हा सामना चेन्नईमध्ये एम ए चिदंबरम स्टेडियमवर
आज संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.
****
संघटन सृजन अभियानाद्वारे काँग्रेस
आगामी काळात संघटन मजबूतीवर भर देत असून धाराशिव जिल्ह्याची कार्यकारणी जिल्ह्यातील
चारही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नागरिक यांच्याशी चर्चा करून घोषित केली जाईल,
अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे
सचिव राजेश तिवारी यांनी आज धाराशिव इथं पत्रकार परिषदेत दिली. धाराशिव दौऱ्यावर आलेल्या
काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळात उदयसिंह पाटील, श्रावण रॅपनवाड यांच्यासह प्रदेश पदाधिकारी सहभागी आहेत.
दरम्यान,
सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने
आज ११ एप्रिल २०२६ रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह, धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर,
विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच
ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार आणि गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
****
जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुळ जहांगीर
इथं आज छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरात ९७१ ग्रामस्थांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला. या शिबिरात
३७२ शेतकऱ्यांना सातबारा वितरण करण्यात आले. तसेच नॉन-क्रिमिलियर,
उत्पन्न आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसह
विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत
१३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
****
No comments:
Post a Comment