Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 12 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
शालेय बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून
निश्चित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
·
महात्मा जोतिराव फुले यांना १९९व्या जयंती दिनी विविध
कार्यक्रमातून सर्वत्र अभिवादन
·
हिंगोली जिल्ह्यात भूकंप-दीडशे किलोमीटरपर्यंत धक्क्याची
तीव्रता
आणि
·
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीची
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक
****
शालेय बसचे
शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य
सरकारनं सादर केला आहे. यानुसार पालकांकडून केवळ मासिक शुल्क घेतले जाईल, एकरकमी आगाऊ
रक्कम घ्यायला सरकारनं मनाई केली आहे. बसमधला विद्यार्थी किती वाजता आला आणि किती वाजता
उतरला या वेळेसह त्याची दैनिक उपस्थिती नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. पाचवीपर्यंतच्या
विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनात महिला परिचर असणं आवश्यक असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टमसह इतर सुरक्षा नियम सक्तीचे
करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत परिवहन समिती कार्यरत असेल. भाडे, सुरक्षा आणि
सेवा यासंबंधी पालकांच्या तक्रारींचे निवारण समितीच्या माध्यमातून करण्या येईल.
****
स्त्री
शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांना १९९ वी जयंतीनिमित्त काल सर्वत्र अभिवादन
करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन
परिसरातील प्रेरणा स्थळ इथं महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली.
महात्मा
जोतीराव फुले यांच्या प्रस्तावित दोनशेव्या जयंतीनिमित्त आगामी २०२७ हे द्विशताब्दी
वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने
शालेय शिक्षण विभागामार्फत कालपासून ते दहा एप्रिल २०२७ या कालावधीत राज्यातील सर्व
शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा व्यापक कृती आराखडा
जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने काल सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालयं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन
करून या उपक्रमांना प्रारंभ झाला.
महात्मा
फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातल्या
त्यांच्या मूळ गावी, जिल्हा परिषदेतर्फे उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा
परिषद शाळेचं’ उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. ही अत्याधुनिक
शाळा म्हणजे द्विशताब्दी वर्षाची सर्वात योग्य सुरुवात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद
केलं. ते म्हणाले…
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कौशल्य
विकास विभागाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या नावाने कौशल्य प्रशिक्षण केंद्राची
सुरुवात करण्यात आली असून भविष्यात अशी एक हजार केंद्रे उभारण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. आजचा शिक्षणाचा अधिकार कायदा ही महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या विचारांची फलश्रुती असल्याचे कृतज्ञतापूर्वक उद्गारही मुख्यमंत्र्यांनी
काढले.
महात्मा
फुले यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्यभर विविध कार्यक्रम पार पडले. मुंबईत लोकभवन
इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी तर विधानभवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
छत्रपती
संभाजीनगर इथं जयंती उत्सव समितीतर्फे शोभायात्रा काढण्यात आली तसंच भीम ज्योती महोत्सव
साजरा झाला.
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यात कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विविध रंगांच्या १९९ किलो फुलांचा
वापर करून महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य आणि जिवंत भासणारी प्रतिमा साकारण्यात
आली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १३५व्या जयंतीनिमित्त दहा हजार, १३५ दिवे
काल प्रज्वलित करण्यात आले.
****
बीड इथं
सिध्दीविनायक व्यापारी संकुल परिसरात महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार
अर्पण करुन विविध पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. तसंच ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती
सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली अर्पण करण्यात
आली.
****
नांदेड
इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. समाज कल्याण विभागातील
कर्मचाऱ्यांच्या सहभागातून मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि स्वछता अभियान राबवण्यात आलं.
तसंच यावेळी प्रभात फेरीही काढण्यात आली.
****
जालना इथं
महापालिका उद्यानातल्या फुले यांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पाहार
अर्पण करुन अभिवादन केलं. विविध कार्यक्रमही यावेळी पार पडले.
****
सामाजिक
समता सप्ताहाच्या अनुषंगाने काल धाराशिव इथं सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी
वैद्यकीय तपासणी शिबीर घेण्यात आलं. विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा तसेच ज्येष्ठ
नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
गाळमुक्त
धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेची व्याप्ती राज्यभरात वाढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातील दरे इथं, कोयना धरणातील
गाळ काढण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
****
ज्येष्ठ
गायिका आशा भोसले यांना मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल
हृदयविकाराचा धक्का बसल्यानं, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्या
छातीत संसर्ग झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्याच्या
सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांच्या मानसिक आरोग्य बळकटीसाठी पुण्यातल्या एकलव्य
फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ यांच्यासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. राज्यातील
सर्व जिल्ह्यांमध्ये केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स च्या माध्यमातून मानसिक आरोग्य
सेवा अधिक व्यापक करणं, हा या कराराचा उद्देश आहे.
****
नवी दिल्ली
इथं आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं
उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन इथं झालं. नवी
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाचा मराठी भाषा विभाग आणि पुण्याची सरहद संस्था यांच्या संयुक्त
विद्यमानं या दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात काल भूकंप झाला. भूगर्भातून आवाज होऊन जमीन हादरल्याने नागरिक भयभीत होऊन
रस्त्यावर पळाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भूकंप मापक यंत्रावर
या भूकंपाची चार पूर्णांक ७ रिश्टर एवढी नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात होता. परिसरातील दीडशे किलोमीटर पर्यंत या भूकंपाचे
परिणाम जाणवले आहेत. स्थितीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून असून नागरिकांना
घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
नांदेड
शहरासह अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव
तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यातील अनेक भागात घरांना तडे
गेले, तर काही भागात कच्च्या घरांची पडझड झाली आहे.
नागरिकांनी
या काळात खबरदारी घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड तहसीलदार
संजय वारकड यांनी केलं आहे.
****
लव्ह जिहादच्या
मुद्द्यावर कठोर कायदा करण्याची मागणी सरकारकडे करणार असल्याचं, आंतरराष्ट्रीय
हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे. ते काल लातूर
इथं हिंदू मेळावासाठी आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंदू
समाजाच्या समृद्धी तसंच सुरक्षेसाठी देशात हिंदू बहुमत टिकून राहण्याची आवश्यकता त्यांनी
व्यक्त केली.
****
चीनमध्ये
सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीने पुरुष एकेरी
गटात अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक मानांकनात २५व्या स्थानावरच्या आयुषने उपांत्य
फेरीत अग्रमानांकित आणि गतविजेता थायलंडच्या खेळाडूला १०-२१, २१-१९,
२१-१७ असं पराभूत केलं. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात आयुषचा मुकाबला चीनच्या
द्वितीय मानांकित शी यु कि बरोबर होईल. भारताच्या दिनेश खन्ना याने १९६५ साली या स्पर्धेत
पुरुष एकेरीत सुवर्णपदक मिळवलं होतं, त्यांनतर आता आयुष शेट्टी
हा अंतिम फेरी गाठणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
****
आयपीएल
क्रिकेटमध्ये काल दोन सामने झाले. नवीन चंदीगड इथं झालेल्या पहिल्या सामन्यात, पंजाब किंग्स
संघानं सनराइजर्स हैदराबादवर सहा गडी आणि सात चेंडू राखून विजय मिळवला. तर चेन्नईत
झालेल्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सवर २३ धावांनी विजय
मिळवला.
आज या स्पर्धेत
लखनौ सुपर जायटंस् आणि गुजरात टायटन्स तसंच मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयज चॅलेंजर्स
बंगळुरू हे दोन सामने होणार आहेत.
****
काँग्रेस
पक्षाची धाराशिव जिल्ह्याची कार्यकारणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते
नागरिक यांच्याशी चर्चा करून घोषित केली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे
सचिव राजेश तिवारी यांनी दिली. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
जालना जिल्ह्यातल्या
वाघ्रुळ जहांगीर इथं काल छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात ९७१ ग्रामस्थांना विविध
सेवांचा लाभ देण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १३८ प्रकरणे निकाली काढण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment