Saturday, 11 April 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 11 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

 

·      भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      जलप्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात

·      स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमातून अभिवादन

·      भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक मूल्य जोपासणं आवश्यक-संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपाल यांचं आवाहन

आणि

·      आशियायी बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल

****

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत, अशा घरांसाठी नागरिकांच्या सुविधेकरता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.या संदर्भातील न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्यासाठी १०० विशेष न्यायालयं स्थापन करावीत, तसंच न्यायालयाच्या परवानगीने सायंकालीन न्यायालय सुरू करावं, आदी निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

 

वाढतं जलप्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या बैठकीत त्या काल बोलत होत्या. सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडणाऱ्या आस्थापनांना फक्त नोटीस न बजावता थेट कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंडे दिला.

दरम्यान, 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक तसंच सामाजिक विकासाचं एक सशक्त माध्यम ठरेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत, पशुसंवर्धन आयुक्तालयात एका कार्यशाळेचं उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

****

देशातले सर्व औष्णिक वीज प्रकल्प पुरेशा कोळशाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचं, ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी सांगितलं आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढील तीन महिन्यांत औष्णिक, सौर, पवन आणि हायड्रोगॅस क्षेत्रांमध्ये २२ हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता वाढवण्याची सरकारची योजना असल्याचं पियुष सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी देशात घरगुती एलपीजी आणि इंधनाचा पुरवठा स्थिर असल्याचं सांगितलं. पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता असून तुटवड्याची तक्रार नसल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं डिजिटल घोटाळे किंवा फसवणूक टाळण्याच्या दृष्टीनं ४ नवीन उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. १० हजार रुपयांपेक्षा जास्तीचा डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी एका तासाचा अवधी, वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यकाकडून प्रमाणीकरण, ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना अधिक नियंत्रण सुविधा इत्यादी उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. याबाबत येत्या आठ मे पर्यंत आरबीआयच्या वेबसाइटवरील 'कनेक्ट टू रेग्युलेट' लिंकद्वारे टिप्पण्या आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण-म्हाडाच्या वर्ष २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण १३ हजार १२ सदनिकांचे बांधकाम करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे. वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात बांधकाम खर्चासाठी १० हजार ५८५ कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली आहे.

****

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांची जयंती आज साजरी होत आहे. या निमित्ताने विविध पक्ष संघटनांच्या वतीने त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी  विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जयंती उत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शहरातल्या तापडीया नाट्य मंदिरात आज सायंकाळी भीम ज्योती महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं आहे.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विविध रंगांच्या १९९ किलो फुलांचा वापर करून महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य आणि जिवंत भासणारी प्रतिमा साकारण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १० हजार १३५ दिवे प्रज्वलित करण्यात आले

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन विभागामार्फत १३ आणि १४ एप्रिलला मुंबई, नाशिक आणि नागपुरात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहली’चं आयोजन करण्यात आलं आहे. या सहलीमध्ये या तीनही शहरांत बाबासाहेबांशी संबंधित स्थानांची सफर घडवण्यात येणार आहे. पूर्णपणे निःशुल्क असलेल्या या सहलीत, प्रवासासह सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

****

वैद्यकीय पेशा म्हणजे व्यवसाय नसून एक जबाबदारी असल्याचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात

जन सेहत सेतू’ शिबीराचं उद्घाटन तसंच संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने, पुणे शहरातील विविध संघटना आणि संस्थांच्या पुढाकारातून तज्ज्ञ वैद्यकीय व्यवसायींनी ‘जनसेहत सेतू अभियान’ राबवण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार मांडवीय यांनी काढले.

****

भौतिक प्रगती सोबत अध्यात्मिक मूल्य जोपासणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सह सरकार्यवाह डॉ कृष्णगोपालजी यांनी म्हटलं आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काल धाराशिव इथं, विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबतच्या "प्रमुख नागरिक संगोष्ठी" परिसंवादात ते बोलत होते. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, आणि स्वबोध या पंचसूत्रीच्या आधारे, आपल्या शताब्दी वर्षात, समाज परिवर्तनासाठी संघ काम करणार आहे. संस्कारी, राष्ट्रभक्त आणि सामाजिक बांधिलकी असलेली पिढी घडवण्यासाठी, सर्वांनी योगदान द्यावं, असं आवाहनही डॉ कृष्णगोपालजी यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी नागरिकांना केलं आहे. काल तिसगाव इथं झालेल्या शिबिरात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रलंबित फेरफार तत्काळ निकाली काढून याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर इथं महाराजस्व समाधान शिबीर काल घेण्यात आलं, यावेळी लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.

****

वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने अपघात प्रवण क्षेत्रांची ओळख पटवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचं ठरवलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी ही माहिती दिली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेला आवश्यक निर्देश देण्यात आले.

****

चीन मध्ये सुरू असलेल्या आशियायी बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २३-२१, २१-१७ असा पराभव केला. आज थायलंडच्या बॅडमिंटनपटूसोबत त्याचा उपांत्यफेरीचा सामना होणार आहे.

****

जाहिरात किंवा माहिती फलक झाडांवर लावणारे नागरिक तसंच संस्थांविरुद्ध शहर विद्रूपीकरण प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.

****

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment