Monday, 6 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारने पाच किलो वजनाच्या लहान एलपीजी सिलिंडर्सच्या विक्रीत वाढ केली आहे. हे सिलिंडर्स एलपीजी वितरक केंद्रांवर वैध ओळखपत्र दाखवून थेट खरेदीसाठी उपलब्ध आहेत. मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाने पुरवठा वाढवल्यापासून, २३ मार्चनंतर आतापर्यंत पाच किलो वजनाच्या सुमारे ६ लाखांपेक्षा अधिक एलपीजी सिलिंडर्सची विक्री झाल्याची माहिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली. चार एप्रिल रोजी ५१ लाखांहून अधिक घरगुती सिलिंडर्सचं वितरण करण्यात आलं असून, एकूण मागणी पैकी ९५ टक्के मागणी ही ऑनलाइन बुकिंगद्वारे नोंदवली गेली, असंही मंत्रालयानं सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेत नेहमी आघाडीवर राहणारा पक्ष म्हणून ‘देश प्रथम’ या तत्त्वावर भाजप कार्य करत आहे. कार्यकर्त्यांची निःस्वार्थ सेवा, अटळ समर्पण आणि सुशासनाबद्दलची निष्ठा हीच पक्षाची खरी ताकद असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने भाजप कटिबद्ध असून, आपला सामूहिक संकल्प देशाला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व संकल्पांची यशस्वी पूर्तता करून दाखवल्याचं त्यांनी नमूद केलं.

पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत नरिमन पॉइंट इथं भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यलयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रातून सभागृहावर पुन्हा निवड झाली आहे. तसंच नवनिर्वाचित खासदार माया इवनाते, ज्योती वाघमारे आणि रामराव वडकुते या राज्यातून निवडलेल्या सदस्यांनीही आज शपथ घेतली.

****

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन महायुतीकडून करण्यात आलं आहे. काँग्रेसनं ही निवडणूक लढवण्यावर ठाम राहात आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मात्र अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर वार्ताहरांशी संवाद साधला. राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडी सोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

****

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली पायाभूत सोयीसुविधांची सर्व विकास कामं निर्धारित वेळेत, उच्च दर्जासह संबंधित विभागांनी समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिल्या. त्र्यंबकेश्वर इथं विविध विकास कामांच्या पाहणी दरम्यान ते काल बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. नाशिक–त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्त्याच्या कामांना गती देण्यासोबतच गुणवत्तेवर भर देण्यात यावा, कुशावर्त कुंडातील पाण्याची नियमित स्वच्छता, कुंडातील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करावं, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

****

अकोला पोलिस दलातर्फे आज सिटी कोतवाली पोलिस स्थानक इथं आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. यासोबतच संतुलित जीवनशैली, तणावपूर्ण सेवेमुळे उद्भवणारे आजार याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.

****

मंगोलिया इथं सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुड्डा आणि जैसमीन लंबोरिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दोघींच्या विजयामुळे भारतीय महिला संघातल्या सर्व खेळाडूंचं पदक निश्चित झालं आहे.

****

No comments:

Post a Comment