Monday, 6 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 06.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 06 April 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ एप्रिल २०२ सकाळी .०० वाजता

****

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. एलपीजी सिलिंडरची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करावा, वितरकांकडे जाऊन अनावश्यक गर्दी करू नये, असा सल्ला सरकारनं दिला आहे. एलपीजी वितरणाच्या बाबतीत होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड-आधारित एलपीजी वितरण आता ९० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. तसंच पाच किलोचे छोटे एफ टी एल सिलिंडर ओळखीच्या किंवा पत्त्याच्या कोणत्याही वैध पुराव्याशिवाय एलपीजी वितरकांकडे उपलब्ध होतील, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, एलपीजी घेऊन येणाऱ्या भारताच्या ग्रीन आशा या जहाजानं होर्मूझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या पार केली आहे. पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर या सामुद्रधुनीतून आलेलं हे नववं भारतीय जहाज आहे.

****

भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजसेवेत नेहमी आघाडीवर राहणारा पक्ष म्हणून ‘देश प्रथम’ या तत्त्वावर भाजप कार्य करत आहे. कार्यकर्त्यांची निःस्वार्थ सेवा, अटळ समर्पण आणि सुशासनाबद्दलची निष्ठा हीच पक्षाची खरी ताकद असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने भाजप कटिबद्ध असून, आपला सामूहिक संकल्प देशाला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व संकल्पांची यशस्वी पूर्तता करून दाखवल्याचं त्यांनी नमूद केलं.

पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत नरिमन पॉइंट इथं भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यलयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

****

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत “साधना सप्ताह” अंतर्गत विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ केला. या कार्यक्रमात उन्नती पोर्टल आणि कर्मयोगी कर्तव्य कार्यक्रम यांच्या राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीचा आराखडा सादर करण्यात आला. मिशन कर्मयोगी उपक्रमाला पाच वर्ष पूर्ण झाल्याचा उल्लेख करत, या कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासात लक्षणीय प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं.

****

सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून ठाण्यात काल आठवी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद पार पडली. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

****

आयुष मंत्रालयाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं उद्या योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २१ जून रोजी १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून हा योग महोत्सव होणार असल्याचं, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल बुलडाणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योग साधनेमध्ये सात हजारांहून अधिक योग साधक सहभागी होणार आहेत. सर्वजण एकत्र येऊया, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी योगाच्या या प्रवासात सहभागी होऊन एक पाऊल पुढे टाकूया असं आवाहन जाधव यांनी यावेळी केलं.

****

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली पोलिस विशेष पथक यांनी संयुक्त कारवाई करत दहशतवादी गटाशी संबंधित दोन संशयितांना अटक केली. ही कारवाई ठाणे आणि कुर्ला इथं करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्याकडून कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली.

****

पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताची दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिनं भारताच्याच दिव्यांग तिरंदाज शितल देवी हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. बँकॉक इथं झालेल्या या स्पर्धेत भारताला सर्वाधिक ७ सुवर्ण पदकं मिळाली आहेत

****

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग आणि कायाकिंग या जलक्रीडा स्पर्धेला कालपासून सांगली इथे प्रारंभ झाला. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. विविध क्रीडाप्रकारांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या ३७२ खेळाडूंना राज्य शासनाच्या सेवेमध्ये थेट सामावून घेण्यात आल्याचं, पाटील यांनी सांगितलं. या स्पर्धेत देशभरातील ४० विद्यापीठांचे जवळपास ६८५ खेळाडू सहभागी झाले आहेत.

****

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्घा सुरू आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या संघाने पात्रता फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Post a Comment