Thursday, 9 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 09.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश तत्त्वांवर आधारित खतांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      देशात कोळसा, गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असल्याची सरकारची ग्वाही

·      जायकवाडी धरणातील पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच, मंत्री विखे-पाटील यांची माहिती

·      डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाला सुरुवात

आणि

·      राज्यात शालेय विद्यार्थ्यांची पटपडताळणी ११ ते २२ एप्रिल दरम्यान होणार

****

खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश तत्त्वांवर आधारित खतांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४१ हजार ५३३ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांवरील अनुदानात चार हजार ३१७ कोटी रुपयांची वाढ केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांबाबत माहिती देतांना वैष्णव म्हणाले,

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 

राजस्थानातला हा तेल शुद्धीकरण प्रकल्प येत्या जुलै महिन्यात कार्यान्वित होणार आहे. या प्रककल्पामुळे दहा हजार प्रत्यक्ष रोजगार तर मोठ्या प्रमाणावर अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून, देशाची तेल शुद्धीकरण क्षमता नऊ दशलक्ष मेट्रिक टनाने वाढणार आहे.

****

देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, त्याचा नियमित पुरवठा होत आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालयांच्या सचिव सुजाता शर्मा यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात जहाज आणि जलवाहतूक सुरळीत सुरु असून, कुठेही जहाजांची कोंडी झालेली नसल्याची माहिती बंदरे आणि जलवाहतूक मंत्रालयाचे सहसचिव मुकेश मंगल यांनी दिली.

****

पश्चिम आशियातल्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत करण्यात आलं आहे. दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर अमेरिका आणि ईराणने सहमती दर्शवल्यामुळे पश्चिम आशियात शांतता पुनर्स्थापित होईल, आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतुक तसंच जागतिक व्यापार सुरळीत होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाने वर्तवला आहे. हा संघर्ष कायमस्वरूपी थांबावा, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट - रणधीर जयस्वाल

 

इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी लवकरात लवकर इराण सोडण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहून आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गांचा वापर करूनच बाहेर पडावं, असं मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे.

****

रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण आढावा समितीच्या तीन दिवसीय बैठकीत झालेले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल जाहीर केले. त्यानुसार रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

****

व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातल्या इतर निवडक ठिकाणी पाच हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार असून, या माध्यमातून सुमारे २४ हजार ७०० थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

****

बांधकाम करताना उत्खनन करण्यात आलेलं गौण खनिज त्याच जागी वापरलं तर त्याला रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभरातल्या बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणारे प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात क्रेडाईच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, यावेळी बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णयही घेण्यात आले. बिनशेतीसाठी आता जिल्हाधिकार्यांकडे जाण्याची आवश्यकता नसून, ही प्रक्रिया दहा दिवसात ऑनलाईन करण्यात येणार आहे. याबरोबरच महापालिका आणि मिळकतपत्रावरील नोंदीबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचं आश्वासही बावनकुळे यांनी दिलं.

****

राज्यातल्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांमधल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, ‘एकरकमी कर्ज परतफेड योजना’ प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले. काल या योजनेबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली.

****

जायकवाडी धरणातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं जायकवाडी धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तनं, तसंच पिण्यासाठी राखीव पाण्याची तरतूद करण्यात आली आहे, धरणातील गाळ काढून केटीवेअर बंधाऱ्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्यभरात सामाजिक समता सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली. येत्या १४ एप्रिलपर्यंत चालणार्या या सप्ताहात विविध प्रबोधनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

नांदेड इथं आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन झालं. याअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती कार्य करण्यात येणार असल्याचं, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी यावेळी सांगितलं.

नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही सामाजिक समता सप्ताहाचं काल उद्घाटन करण्यात आलं.

**

हिंगोलीत समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्या उपस्थितीत या सप्ताहाचं उद्घाटन झालं. या सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार आणि महामानवांच्या विचारांचा जागर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

**

लातूर जिल्ह्यातही सामाजिक सप्ताहाचं उद्घाटन झालं असून, सर्व तालुक्यांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाटप सुरू करण्यात आलं आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने बीड शहर पोलीस स्थानकाच्या वतीने काल मोफत रोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. ७२ जणांनी या शिबीराचा लाभ घेतला.

****

राज्यातल्या इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण दीडशे पथकांच्या माध्यमातून ही पटपडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ८४ प्राथमिक शाळा तर अनुदानित प्राथमिक शाळांची संख्या २९२ एवढी आहे. या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या सुमारे २ लाख विद्यार्थी संख्येची पट पडताळणी करण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यातही सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पट पडताळणी करण्यात येणार असल्याच माहिती, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली.

या पटपडताळणीच्या अनुषंगाने इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे ११, १५ आणि २२ एप्रिल या तारखांना घेण्याची सूचनाही राज्यशासनाने केली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा पंचायत समितीच्या शिक्षण विभागात काल सकाळी आग लागली. यात पिरॉडिक असेसमेंट टेस्ट म्हणजे पॅट परीक्षेच्या दहा हजार प्रश्नपत्रिका जळाल्या. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने येत्या ११ तारखेला मराठी या विषयाची परीक्षा नियोजित आहे. याबाबत पुणे प्राथमिक शिक्षण परिषदेशी संपर्क साधण्यात आला असून, येत्या दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळण्याची शक्यता, गटशिक्षणाधिकायांनी व्यक्त केली.

****

No comments:

Post a Comment