Friday, 10 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·   महिला आरक्षण विधेयकासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन

·   बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, २३ एप्रिल रोजी राहुरी आणि बारामतीत मतदान

·   होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून ग्रीन आशा जहाज मुंबईत दाखल

·   जायकवाडी आणि माजलगावसह विविध धरण परिसरात पर्यटन केंद्र विकासित करण्याचा निर्णय

आणि

·   धाराशिव जिल्ह्यातल्या सात जिल्हा परिषद शाळांची 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' म्हणून निवड

****

महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी १६ ते १८ एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत लिहिलेला लेख तसंच सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीतून माहिती देतांना, विधानमंडळांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं, हे बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,

बाईटपंतप्रधान नरेंद्र मोदी

 

देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचं राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान अमूल्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. महिला जेव्हा प्रशासकीय तसंच निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या आपल्या अनुभवांतून आणि दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ अजित पवार यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसंच राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

****

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेतला असून, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, चार मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांमधली पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे काल स्पष्ट झालं. बारामती मतदार संघात २३ उमेदवार तर राहुरी मतदार संघात सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

****

भारताचंग्रीन आशानावाचं एलपीजी वाहून आणणारं जहाज होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पार करून काल मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बंदरात दाखल झालं. हे जहाज १५ हजार ४०० टन एलपीजी घेऊन आलं आहे. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यापासून या बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजीवाहू जहाज आहे.

****

खरीप पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत किमान आधारभूत खरेदी योजनेत पूर्व नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून मका खरेदीसाठी केंद्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यांनी खरेदी केलेला साठा पुढच्या खरेदी हंगामापूर्वी वितरीत करावा तसंच हा मका वापरायोग्य असल्याचं गुणवत्ता प्रमाणन आवश्यक असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

बालकांना सकस अन्नाची असलेली गरज सार्वत्रिक असून, तिचं एका लोकचळवळीत रूपांतर व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल पोषण पंधरवडा २०२६ च्या आठव्या टप्प्याचा प्रारंभ केल्यानंतर त्या बोलत होत्या. बालकांच्या पहिल्या सहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त मेंदूचा विकास घडवून आणणे हा या पोषण पंधरवड्याचा विषय आहे. स्थानिक आणि पारंपरिक पोषक पदार्थांची मातांना नव्याने ओळख करून देणं, त्याद्वारे ॲनिमिया आणि कुपोषण कमी करणं यावर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भर द्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

वारकरी संप्रदाय आणि त्यांची परंपरा यांचं आपल्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात ते काल बोलत होते. शेकडो वर्षांची आक्रमणं झेलूनही वारकरी परंपरा अबाधित राहिल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले….

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार धनंजय मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांची गडावर मोठी गर्दी झाली होती.

****

जायकवाडी, माजलगाव, इसापूर या धरणांसह अहिल्यानगर जिल्‍ह्यातल्या निळवंडे आणि भंडारदरा परिसरात पर्यटन केंद्र विकसित करुन, रोजगार निर्म‍िती करण्‍यावर भर देण्‍यात येणार आहे, जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी काल शिर्डी इथं ही माहिती दिली. धरण परिसरामध्‍ये असलेल्‍या जलसंपदा विभागाच्‍या जागांचा उपयोग पर्यटन विकास केंद्रासाठी केला जाणार आहे. यासाठी एक धोरण निश्चित करण्‍यात आलं असून, बहुराष्‍ट्रीय कंपन्‍या सल्‍लागार म्‍हणून काम करतील. नवीन धोरणात वॉटर स्‍पोर्ट, रिसोर्ट उभारुन पर्यटक आकर्षित होतील अशा पद्धतीचं नियोजन असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.

****

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव हे राज्याच्या ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं अभियान असून, त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावं, असं आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांमधले आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसंच ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या सात शाळांची 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा' म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यातल्या ४०५ शाळांना याअंतर्गत मान्यता मिळाली आहे. निवड झालेल्या या शाळांमध्ये 'विकसित महाराष्ट्र - २०४७' चा दृष्टीकोन ठेवून जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

****

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीविरुद्धच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना निलंबित करण्यात आलं आहे. महसूल आणि वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी काल हे आदेश जारी केले. दळवी त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.

****

बीड जिल्ह्यातल्या केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन झालं. काल सकाळी लातूर-अंबाजोगाई मार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात झाला. गिड्डे हे स्वतःच्या चारचाकीने प्रवास करत असताना, अचानक नियंत्रण सुटून वाहन उलटल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत जनजागृतीपर कार्यक्रम, शिबीरं आणि विविध विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. काल दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसंच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी ४५ हजार रुपये धनादेशांचं वितरण करण्यात आलं.

****

जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्याच्या पूर्वतयारीसाठी बीड जिल्ह्यात तीन दिवसीय प्रशिक्षणास काल प्रारंभ झाला. यात जिल्ह्यातले एकूण ९० फील्ड ट्रेनर सहभागी झाले आहेत. दोन टप्प्यात चालणाऱ्या या प्रशिक्षणात तांत्रिक कौशल्य कार्यपद्धती तसंच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजाची माहिती देण्यात येत आहे.

**

परभणी इथंही काल क्षेत्रीय प्रशिक्षकांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. जनगणनेच्या कामासाठी जिल्ह्यात दोन हजार ७२७ प्रगणक आणि ४७१ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

****

परभणी इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचं काल जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केवळ मिरवणुका आणि औपचारिक कार्यक्रमांपुरती बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मर्यादीत न ठेवता, त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात यावा, असं सांगून त्यांनी, ही जयंती नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरी करण्याचं आवाहन केलं.

****

 

No comments:

Post a Comment