Monday, 13 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      नारीशक्ती वंदन सुधारणा विधेयक संसदेत एकमुखानं मंजूर व्हावं, पंतप्रधानांचं राजकीय पक्षांना आवाहन

·      पत्रकारांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाही

आणि

·      आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आयुष शेट्टीला रौप्यपदक   

****

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ९२ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना परवा रुग्णालयात दाखल केलं होत, उपचारादरम्यान, काल दुपारी त्यांचं निधन झालं.

आपल्या जादुई आवाजानं प्रत्येक गाणं अजरामर करणाऱ्या आशाताईंच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा हा संक्षिप्त आढावा...

बाईट-आशा भोसले ट्रिब्यूट

 

नाच रे मोरा..

मराठी घरातल्या अनेक पिढ्यांचं बालपण समृद्ध करणाऱ्या या बालगीतासोबत, भक्तीगीतं, प्रेमगीतं, नाट्यगीतं, भावगीतं, लावणी, गजल, कॅब्रे, पॉप यासह संगीत क्षेत्रातल्या सर्वच प्रकारच्या, आणि मानवी मनाची प्रत्येक भावना टिपणाऱ्या गाण्यांना, अनोखा स्वरसाज चढवलेल्या आशाताईंनी आपल्या संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर अधिराज्य केलं.

 

शुरा मी वंदिले..

रेशमाच्या रेघांनी..

 

आठ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी सुरू केलेला गानप्रवास, पुढची आठ दशक पार करून, वयाच्या नव्वदीतही सुरू होता. ओ. पी. नय्यर, दत्ता डावजेकर, श्रीनिवास खळे, मदन मोहन, एस डी आणि आर. डी. बर्मन, रोशन आणि राजेश रोशन, सुधीर आणि श्रीधर फडके, इलैया राजा, अनु मलिक, ए. आर. रहमान यांसारख्या संगीतकारांच्या अनेक पिढ्यांसोबत त्यांनी काम केलं.

 

फिटे अंधाराचे जाळे

पांडुरंग कांती

 

१९९७ मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी अवॉर्डसाठी नामांकनही मिळालं होतं. आशा ॲण्ड फ्रेण्डस या अल्बमधून त्यांनी उर्मिला मातोंडकर, संजय दत्त आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट ली यांच्यासोबत गाण्याचा धाडसी प्रयोगही केला. जानम समझा करो तसंच आपकी आशा या स्वत: संगीतबद्ध केलेल्या अल्बमला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अगदी काही वर्षांपूर्वीच माई या चित्रपटातून त्यांनी अभिनयही केला. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तासनतास प्रसन्न वावर असलेल्या आशाताईंनी गायलेलं ऋतू हिरवा, सैनिक हो तुमच्यासाठी, केंव्हा तरी पहाटे आणि भरलं आभाळ यासारखी गाणी रसिकांच्या कायम ओठांवर आहेत..

 

ऋतू हिरवा

भरलं आभाळ

 

आयुष्यात आलेल्या अनेक संकटांवर धैर्यानं मात केलेल्या आशाताईंनी पहाडाएवढ्या दु:खांचाही धीराने सामना केला. अनेक मराठी व्यंजनांना त्यांनी आपल्या आशाज् नावाच्या हॉटेलच्या माध्यमातून जगभरात पोहोचवलं. आशाताईंनी लौकिकार्थाने इहलोकाचा प्रवास पूर्ण केला असला तरीही, त्यांचे चीरतरूण सूर मात्र, आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात कायमच सोबत राहतील.. सर्वार्थाने महाराष्ट्राचं भूषण असलेल्या या महाराष्ट्र कन्येला भावपूर्ण आदरांजली...

फिरुनी नवी जन्मेन मी

 

आशा भोसले यांच्या हिंदी गायनाच्या कारकिर्दीचा आढावा, आमच्या उर्दू बातमीपत्रात आपल्याला ऐकता येईल.

**

आपल्या विलक्षण सांगितिक योगदानासाठी आशा भोसले यांना विविध संस्था, संघटनांसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मविभुषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण, नाईटिंगेल ऑफ एशिया, बीबीसी जीवनगौरव, आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

**

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, यांच्यासह देशभरातून आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आशाताईंचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक, संगीत क्षेत्रासह समाजाच्या सर्वच स्तरातून आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त होत आहे. मंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं.

आशा भोसले यांच्यासोबत पार्श्वगायन तसंच देशविदेशात अनेक लाईव्ह शोज केलेले तरुण गायक ऋषिकेश रानडे यांनी, आशाताईंसोबत काम करतांना खूप शिकायला मिळाल्याचं सांगितलं. ते म्हणाले…

बाईट-ऋषिकेश रानडे

****

महिला आरक्षण कायदेविषयक, नारीशक्ती वंदन सुधारणा विधेयक संसदेत एकमुखानं मंजूर व्हावं, यासाठी पाठिंबा देण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी, सर्व पक्षीय नेत्यांना केलं आहे. आगामी २०२९ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महिला आरक्षणासह झाल्या पाहिजेत, असंही पंतप्रधानांनी याबाबतच्या पत्रात नमूद केलं. या आरक्षणाबाबत २०२३ मध्ये संविधानात दुरुस्ती करण्यात आली होती. महिला आरक्षण अधिनियमाद्वारे लोकसभेतल्या जागांची संख्या वाढून ८१६ होईल, ज्यामध्ये २७३ जागा महिलांसाठी असतील.

दरम्यान, भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांना व्हीप जारी केला असून, १६ ते १८ एप्रिल हे तीनही दिवस संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

****

पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. धाराशिव इथं जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. आकाशवाणीचे हिंगोलीचे वार्ताहर रमेश कदम, यांच्यासह विविध श्रेणीत उत्कृष्ट कार्य केलेल्या पत्रकारांना यावेळी गौरवण्यात आलं.

****

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनमध्ये काल झालेल्या अंतिम लढतीत आयुषला चीनच्या शी यु कि याच्याकडून २१-८, २१-१० अशा सलग दोन गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला.

****

No comments:

Post a Comment