Tuesday, 14 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन

·      मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून महामानवाला आदरांजली

·      महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य

आणि

·      निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून दंडात्मक कारवाई

****

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथं लोकभवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

सरन्यायाधी सूर्यकांत, उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणा स्थळावर आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.

****

राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. बाबासाहेबांना शासकीत मानवंदना देऊन, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्व आणि त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे, या बाबासाहेबांच्या मूळ गावी त्यांच्या मूळ घरी असलेल्या स्मारकात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी डॉक़्टर आंबेडकर यांच्या अस्थिकलश आणि अर्धपुतळ्याला अभिवादन केलं. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही आंबडवे इथे बाबासाहेबांना अभिवादन केलं.

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातल्या चवदार तळे इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऐक्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संविधानाच्या उद्देशिकेतल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा अंगीकार करून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं.

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध स्पर्धा तसंच व्याख्यानातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेबांच्या तैलचित्राची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी तैलचित्राला पुष्प अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली.

शहरात भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेक पक्ष, संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या विविध भागांमधून दुचाकी, चारचाकी फेऱ्या काढण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी पुस्तकं खरेदी, तसंच वाचन उपक्रम राबवले जात आहेत.

जालना शहरासह जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी केली जात आहे. मस्तगड इथल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राजकीय तसंच सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

 

परभणी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, भिक्खू संघाच्या वतीने सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण समता दलाची फेरी काढून अभिवादनही करण्यात आलं. यानिमित्त शहरात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 

 

हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करून अभिवादन करण्यात आलं. शहरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय पदाधिकारी, पक्ष-संघटनांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं.

 

बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

लातूर इथे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लातूर शहरासह जिल्हाभरात आज रक्तदान, अन्न वाटप, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे.

 

नांदेड इथे खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, यांच्यासह अन्य मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हा परिषदेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

 

धाराशिव इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा संघ चालक विधीज्ञ रविंद्र कदम यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. धाराशीव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात संघाच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

संयुक्त जनता दलाचे नेते नीतिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सम्राट चौधरी यांची बिहारच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. सम्राट चौधरी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २६ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात, या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे तेहतिसावा भाग असेल.

****

देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी एका पत्राद्वारे केलं आहे. नारी शक्ति वंदन अधिनियमाशी संबंधित महत्वपूर्ण सुधारणांवर चर्चा करण्यासाठी १६ एप्रिलपासून संसदेचं सत्र सुरू होणार आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी देशातल्या कोट्यावधी महिलांचे आशीर्वाद आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर महिलांना संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळांमध्ये त्यांच्या हक्काचं, योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास, केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्या आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या.

****

येत्या १ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. याबाबत राज्यात मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अनेक शहरांमध्ये चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय महामार्गांवरून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर शुल्क आकारण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय महामार्ग शुल्क चौथा सुधारित नियम २०२६, अधिसूचित केला आहे. हा नियम उद्यापासून लागू होणार आहे. यानुसार, निर्धारित क्षमतेपेक्षा दहा टक्के जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर जादा वजनासाठीचं शुल्क लागणार नाही. दहा ते चाळीस टक्के जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या दुप्पट तर त्यापेक्षा जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या चौपट शुल्क लागेल. हे शुल्क केवळ फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केलं जाईल आणि अशा वाहनांची राष्ट्रीय वाहन रजिस्टरमध्ये नोंद होईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या सौरकृषीपंप लाभार्थ्यांच्या कृषीपंपांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी येत्या १६ ते २० एप्रिल या काळात महावितरणनं तक्रार निवारण मेळाव्याचं आयोजन केलं आहे. शेतकऱ्यांनी या मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

****

No comments:

Post a Comment