Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 15 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन
अधिनियमाला पाठिंबा द्यावा, पंतप्रधानांचं आवाहन
·
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर
·
निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर
आजपासून दंडात्मक कारवाई
·
महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना
मराठी भाषा येणं अनिवार्य
·
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विविध
कार्यक्रमातून आदरांजली
आणि
·
मराठवाड्यासह बहुतांश जिल्ह्यांना पुढील दोन दिवस उष्णतेच्या
लाटेचा इशारा
****
देशातल्या
सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना
पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
एका पत्राद्वारे केलं आहे. नारी शक्ति वंदन अधिनियमाशी संबंधित महत्वपूर्ण सुधारणांवर
चर्चा करण्यासाठी उद्या १६ एप्रिलपासून संसदेचं सत्र सुरू होणार आहे. हे विधेयक मंजूर
होण्यासाठी देशातल्या कोट्यावधी महिलांचे आशीर्वाद आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी सरकार कटिबद्ध असून हा ऐतिहासिक बदल लवकरच प्रत्यक्षात येईल,
असा विश्वास त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
****
महिला आरक्षण
विधेयक संमत झाल्यानंतर महिलांना संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळांमध्ये त्यांच्या
हक्काचं, योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास,
केंद्रीय युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला
आहे. त्या काल दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या.
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आज नागपूर दौऱ्यावर आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स च्या
दुसऱ्या दीक्षान्त समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या उपस्थित राहतील. राष्ट्रीय
प्रत्यक्ष कर अकादमी इथं भारतीय महसूल सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा समापन
समारंभही राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
****
राष्ट्रीय
महामार्गांवरून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या वाहनांवर शुल्क आकारण्यासाठी
सरकारनं राष्ट्रीय महामार्ग शुल्क चौथा सुधारित नियम २०२६, अधिसूचित
केला आहे. हा नियम आजपासून लागू होत आहे. यानुसार, निर्धारित
क्षमतेपेक्षा दहा टक्के जास्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर जादा वजनासाठीचं शुल्क लागणार
नाही. दहा ते चाळीस टक्के जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या दुप्पट तर त्यापेक्षा
जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर मूळ शुल्काच्या चौपट शुल्क लागेल. हे शुल्क केवळ फास्टॅगच्या
माध्यमातून वसूल केलं जाईल आणि अशा वाहनांची राष्ट्रीय वाहन रजिस्टरमध्ये नोंद होईल,
असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
येत्या
१ मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा
येणं अनिवार्य आहे. याबाबत राज्यात मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवण्यात
येणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. अनेक शहरांमध्ये चालकांना प्रवाशांशी मराठीत
संवाद साधता येत नाही, तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ
करतात, अशा तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्र्यांनी
सांगितलं.
****
अनुसूचित
जातींच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल राज्य सरकारनं
जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या समितीनं कशाप्रकारे विभाजन केलं आहे
हे तपासू द्यावं, अशी विनंती त्यांनी केली. आरक्षणात वर्गीकरण करण्याचा अधिकार संसदेचा
आहे, पण सर्वोच्च न्यायालयानं तो अधिकार घेतला आणि राज्य सरकारला
उपवर्गीकरण करायला सांगितलं, याबद्दल आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त
केली.
****
भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त
काल देशभरात अभिवादन करण्यात आलं. मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन
केलं. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले होते. बाबासाहेबांना
शासकीय मानवंदना देऊन, हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांनी
यावेळी बोलताना, बाबासाहेबांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख
केला. ते म्हणाले,
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
मराठवाड्यातही
शोभायात्रा, व्याख्यानं आणि विविध कार्यक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात
आलं. या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख सुरक्षा व्यवस्था
ठेवण्यात आली होती.
छत्रपती
संभाजीनगर शहरात भडकल गेट इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेक पक्ष, संघटनांच्या
वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या विविध भागांमधून दुचाकी, चारचाकी फेऱ्या काढण्यात आल्या. पुस्तकं खरेदी, तसंच
वाचन उपक्रमही काल राबवण्यात आले.
डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध स्पर्धा तसंच व्याख्यानातून बाबासाहेबांना
अभिवादन करण्यात आलं. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेबांच्या तैलचित्राची
ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी तैलचित्राला
पुष्प अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात केली.
जालना शहरासह
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी
झाली. मस्तगड इथल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राजकीय तसंच
सामाजिक कार्यकर्ते आणि अनुयायांची गर्दी दिसून आली.
परभणी इथं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, भिक्खू संघाच्या
वतीने सामूहिक महावंदना घेण्यात आली. पंचशील ध्वजारोहण, समता
दलाची फेरी, पुस्तक प्रदर्शन आदी कार्यक्रम पार पडले.
हिंगोली
इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सार्वजनिक आंबेडकर जयंतीचं आयोजन करण्यात
आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एखादं जरी तत्त्वज्ञान आत्मसात करून जीवनात
अंगीकारलं तर जीवनाचं कल्याण होईल, असं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यावेळी
म्हणाले. जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला
विविध राजकीय पदाधिकारी, पक्ष-संघटनांनी अभिवादन केलं. भारतीय
बौद्ध महासभेच्या वतीने 'बालविवाह मुक्त हिंगोली - आपला संकल्प'
हे अभियान राबवत सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.
बीड इथं
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान
यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लातूर शहरात
उत्साहपूर्ण वातावरणात विविध समाजोपयोगी, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात
आले. लातूरच्या द्वारकादास श्यामकुमार ग्रुप आणि तुकाराम पाटील मित्र मंडळ यांच्या
मोफत खिचडी वाटप उपक्रमात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, लातूर शहरातल्या
सुभेदार रामजी नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने सादर करण्यात आलेला युद्धावर आधारित
देखावा विशेष आकर्षण ठरला. या देखाव्यातून “युद्ध नको, बुद्ध
हवा” असा प्रभावी शांततेचा संदेश देण्यात आला.
नांदेड
इथं खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, यांच्यासह अन्य
मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हा परिषदेच्या
वतीनं यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
धाराशिव
इथं अभिवादनासह अन्नदान कार्यक्रम उत्साहात पार पडले. अन्नदान स्टॉलचं उद्घाटन जिल्हाधिकारी
कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या वतीनं आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
हवामान
मुंबईसह
संपूर्ण कोकण, मराठवाडा, विदर्भासह आगामी दोन दिवसात उष्णतेची
लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर,
जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना उष्णतेचा
यलो अलर्ट जारी करण्यात आलं आहे. अकोल्यात काल राज्यातल्या सर्वाधिक ४३ पूर्णांक आठ
अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी
आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. यासाठी तीन व्यापक मानक
कार्यपद्धती – एसओपी, सरकारने जारी केल्या आहेत. यामध्ये कामाच्या
वेळेत बदल, विश्रांतीसाठी थंड ठिकाणं, पाणी
पुरवठा, तसंच उपचारासह इतर उपाययोजनांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment