Thursday, 16 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      धोरणकर्त्यांमध्ये महिला वर्गाचा समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन; संसदेच्या विशेष अधिवेशनात नारीशक्ती वंदन विधेयक सादर

·      विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच विकसित भारतासाठी योगदान द्यावं-राष्ट्रपतींचं आवाहन

·      राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान

·      नांदेड शहरात नाल्याच्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू

आणि

·      छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन हेल्प डेस्ककार्यान्वित करण्याचे महापौरांचे निर्देश

****

देशाच्या लोकसंख्येचा ५० टक्के हिस्सा असलेल्या महिला वर्गाचा धोरणकर्त्यांमध्ये समावेश करणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नारीशक्ती वंदन अधिनियमातल्या महत्त्वाच्या घटनात्मक सुधारणेवर चर्चा करण्यासाठी संसदेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं, या विधेयकावरच्या चर्चेत पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६, आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक २०२६ सादर केलं. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक २०२६ सादर केलं. महिलांना संसदीय प्रणालीत बरोबरीचं स्थान देणारं हे विधेयक देशाची दशा आणि दिशा निश्चित करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी मतदारसंघ पुनर्रचना तसंच केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा, ही विधेयकं मांडण्यास विरोध केला. या विधेयकांमुळे देशाच्या संघराज्यीय रचनेला धक्का पोहोचेल, असा आरोप त्यांनी केला. गृहमंत्री अमित शाह यांनी या आरोपांचं खंडन केलं. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी ही विधेयकं इतक्या घाईघाईने आणण्याच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या गृहमंत्री अमित शाह या चर्चेला उत्तर देत आहेत.

तत्पूर्वी, सभागृहाचं कामकाज सुरू होताच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह तीन दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अबू हासेम खान चौधरी, मोहसिना किडवाई आणि हरी नारायण राजभर यांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यसभेत आज विनोद तावडे, नितीन नबीन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह नवनिर्वाचित १४ सदस्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

महिला आरक्षण विधेयक २०२३ साली संसदेत मंजूर झालेलं असून, त्यानुसार ३३ टक्के महिला आरक्षण तत्काळ लागू करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. मतदारसंघ पुनर्रचना हा एक व्यापक, राष्ट्रीय एकात्मेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणूनच त्यावर अधिक चर्चा आणि संशोधन होणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी म्हटल आहे.

****

विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच देश आत्मनिर्भर करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी योगदान द्यावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर तसेच विद्यापीठाच्या कुलपती कुमुद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या ज्ञान आणि शिक्षणाचा वापर केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता समाज तसंच राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्याचा वापर करावा, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. त्या म्हणाल्या -

बाईट – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं.

 

दरम्यान, राष्ट्रपतींनी आज सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधीजींचं पहिलं निवासस्थान आदि निवास तसंच बापू कुटी, कस्तुरबा गांधी यांचं निवासस्थान बा निवास तसंच गांधीजींच्या तत्कालीन कार्यालयालाही राष्ट्रपतींनी भेट देऊन पाहणी केली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी उपस्थित होते. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी संबंधित बाबींची यावेळी माहिती दिली. यानंतर राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सूत कताई केली. प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसंच परिसरात वृक्षारोपण केलं.

****

राज्य विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने आज विधान परिषदेचा द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी २३ ते ३० एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. २ मे रोजी अर्जांची छाननी होईल, ४ मे पर्यंत अर्ज मागे घेता येतील. आणि १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, राजेश राठोड आणि रणजीतसिंह मोहिते हे सदस्य येत्या येत्या १३ मे रोजी निवृत्त होत असल्याने, या जागा रिक्त होत आहेत.

****

पुण्यात ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन आज पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यावेळी उपस्थित होत्या. पुण्याजवळ नांदोशी इथं ही संस्था उभारण्यात येणार आहे.

****

दरम्यान, राज्यात सद्यस्थितीत उद्योगांचं नवं पर्व सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं वर्षा निवासस्थानी श्याम स्टील उद्योग आणि जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूहाने राज्यात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासन गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आठ ते अठरा वयोगटातली ही चार मुलं शाळा सुटल्यानंतर घरी जात असतांना, हारूनबाग परिसरात एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

****

छत्रपती संभाजीनगरात पर्यटकांच्या सोयीसाठी पुढच्या आठ दिवसांत विशेष पर्यटन हेल्प डेस्ककार्यान्वित करण्याचे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या हेल्प डेस्कसाठी शहरात योग्य जागेचा शोध घेऊन, तिथे पर्यटन विभागामार्फत विशेष प्रशिक्षित गाईड्सची नियुक्ती केली जाणार आहे. ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन वस्तूंच्या जतनासाठी महानगरपालिकेतर्फे तातडीने एक सुसज्ज संवर्धन प्रयोगशाळाविकसित करण्याला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा कायापालट करण्याचा मानस या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

****

धाराशिव जिल्ह्यात तेर इथल्या संत गोरोबा यांच्या समाधी मंदिरातील ओवरीच्या कामांसाठी राज्य शासनाने तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. ते आज तुळजापूर इथं बोलत होते. मंदिराच्या पूर्व बाजूस २ कोटी रुपये खर्चून ओवरीचं बांधकाम केलं जाणार असून, वारी किंवा उत्सवाच्या काळात भाविकांच्या विश्रांतीसाठी आणि भजनासाठी ही जागा हक्काचं केंद्र ठरणार आहे, असं पाटील म्हणाले.

****

बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे एक हजार ७७३ रुग्णांना सुमारे १३ कोटी ६९ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणं आदी सकारात्मक बदल झाले आहेत. त्यासोबतच विविध सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य लाभत आहे.

****

सामाजिक विशेष सहाय्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन उल्लेखनीय यश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावलं आहे.

****

No comments:

Post a Comment