Saturday, 18 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत नाही; अन्य दोन विधेयकं सरकारकडून मागे

·      विरोधकांना महिला शक्तीच्या रोषाला सामोरं जावं लागेल – गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया

·      मराठवाडा विशेष आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्याची बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची केंद्राकडे मागणी

·      नांदेडमध्ये खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेचे दोन अभियंते निलंबित

आणि

·      छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

****

संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेलं संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही. यासाठी झालेल्या मतदानात ५२८ सदस्यांनी मतदान केलं. त्यापैकी विधेयकाच्या बाजुने २९८ मतं, तर विरोधात २३० मतं पडली. घटना दुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची आवश्यकता असते, तेवढी मतं मिळाली नसल्याने हे विधेयक मंजूर झालं नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहिर केलं.

**

हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं त्यासाठी दोन तृतीयांश खासदारांची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे या विधेयकाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक २०२६, आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक २०२६ मागे घेत असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रीजीजू यांनी जाहीर केलं. ते म्हणाले,

बाईट – किरेन रिजिजू

**

महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारं हे विधेयक नाकारून त्याचा आनंद साजरा करणं, हे अत्यंत निंदनीय आणि कल्पनेपलीकडचे असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. विरोधकांना २०२९ लोकसभा निवडणुकांसह प्रत्येक निवडणुकीत आणि प्रत्येक स्तरावर ‘महिला शक्तीच्या रोषाला’ सामोरं जावं लागेल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.

काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आपला खरा चेहरा उघड केला असून, काँग्रेस महिला सक्षमीकरणाला विरोध करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

नारी शक्तीसोबत उभं राहण्याची विरोधकांकडे ऐतिहासिक संधी होती, परंतू त्यांनी ती गमावली, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

**

तत्पूर्वी या विधेयकांवरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना देश माफ करणार नाही असं म्हटलं. या विधेयकाला विरोध करणारे ओबीसी, दलितांच्या विरोधातले असल्याचा दावा त्यांनी केला. महिला आरक्षण लागू करण्यासाठी सर्व राज्यातल्या खासदारांची संख्या ५० टक्क्यांनी वाढणार आहे, त्यामुळे कुठल्याही राज्याच्या प्रतिनिधीत्वावर अन्याय होणार नाही, असं शहा यांनी सांगितलं होतं. देशातल्या १२० लोकसभा मतदारसंघात २० लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यांच्याकडे लक्ष देणं खासदारांना शक्य नाही, त्यामुळे मतदारसंघ फेररचना आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. संविधानाने सरकारवर संतुलित, समावेशक आणि व्यवहार्य लोकशाही व्यवस्था उभारण्याची जबाबदारी दिली असल्याचं शहा यांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट – अमित शहा

**

त्याआधी सभागृहात काल या विधेयकांवर वादळी चर्चा झाली.

देशाच्या निवडणुकीचं गणित बदलण्याचा प्रयत्न नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांमधून केंद्र सरकार करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. २०२३ मध्ये मंजूर केलेलं जुनं विधेयक सरकारनं पुन्हा आणावं, आम्ही त्याला तात्काळ पाठिंबा देऊ असं ते म्हणाले. देशातले दलित, ओबीसी आणि इतरांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी महिला आरक्षणाला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडणं हे महिलांवर अन्यायकारक असल्याचं म्हटलं, तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी काँग्रेसवर सामाजिक परिवर्तनात अडथळे निर्माण केल्याचा आरोप करत, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी असल्याचं सांगितलं.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी राष्ट्र उभारणीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी असल्याचं नमूद केलं होतं.

****

राज्यातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातला प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने आठ हजार नव्या बसगाड्या दाखल केल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चार नवीन बसस्थानकांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जुन्या बसच्या जागी नवीन गाड्या उपलब्ध करून ‘लालपरी’ सेवा अधिक सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच, येत्या एक जूनपासून राज्यातल्या सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यासोबतच, बसस्थानकांवरील उपाहारगृहांमध्ये केवळ ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देणं बंधनकारक करण्यात आलं असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं.

****

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन मराठवाडा, विशेषतः बीड जिल्ह्यातल्या गंभीर कृषी परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मराठवाडा विशेष आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करावं, पिक नुकसान भरपाई तातडीने आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, पंचनामे वेळेत, पारदर्शक आणि जबाबदारीने करण्याची प्रभावी यंत्रणा उभी करावी आदी मागण्यांचं निवेदन त्यांनी चौहान यांना दिलं.

****

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्याने केवळ उद्दिष्ट पूर्ण केलं नाही, तर सलग चौथ्या वर्षी १०० टक्क्यांहून अधिक कामगिरी करणारा राज्यातला एकमेव जिल्हा होण्याचा मान पटकावला आहे. या योजनेअंतर्गत ६२२ प्रकल्प महिला उद्योजिकांचे असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महडदळकर यांनी दिली. त्या म्हणाल्या,

बाईट – प्रियवंदा महडदळकर

****

नांदेडमध्ये चार शाळकरी मुलांच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या १६ एप्रिलला इस्लामपुरा परिसरात १० ते १३ वयोगटातल्या चार मुलांचा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, त्यामुळे कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातल्या उपअभियंता शिवकन्या जायभाये आणि कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

****

आगामी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहावं, असे निर्देश लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरण, विहीर पुनर्भरण आणि जलसंधारणाची कामं, मोहीम स्वरूपात राबवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

****

नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूरगड इथं सुरू असलेल्या विकासकामांमधून भाविकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयातून नियोजनबद्ध कामं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

माहूरगड विकास आराखड्याच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी सावे यांनी श्री रेणुका देवी मंदिर परिसर, मातृतीर्थ कुंड, पर्यटक सुविधा केंद्र, वाहनतळ तसंच इतर पायाभूत सुविधांच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

****

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी काल पदभार स्वीकारला. श्रीकांत यांनी सर्व विभाग प्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातल्या शेती, टंचाईस्थिती तसंच सामाजिक आणि प्रशासकीय विषयांबाबत माहिती जाणून घेतली.

****

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत नांदेड जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत १ हजार ६७ रुग्णांना सुमारे ८ कोटी २१ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उद्या १९ आणि परवा २० तारखेला परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment