Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १८ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकासंदर्भात संसदेचं तीन
दिवसांचं विशेष अधिवेशन १६ एप्रिलपासून सुरू झालं होतं. आज या अधिवेशनाचा अखेरचा दिवस
आहे.
संसद आणि राज्य विधीमंडळांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षणाची
तरतूद असलेलं संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत
मंजूर होऊ शकलं नाही. यासाठी झालेल्या मतदानात ५२८ सदस्यांनी मतदान केलं. त्यापैकी विधेयकाच्या बाजुने २९८ मतं, तर विरोधात २३० मतं पडली. घटना दुरुस्ती
विधेयक पारित करण्यासाठी दोन तृतीयांश मतांची आवश्यकता असते. तेवढी मतं मिळाली नसल्याने
हे विधेयक मंजूर झालं नसल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं.
****
दरम्यान, हे घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं त्यासाठी दोन तृतीयांश
खासदारांची मंजुरी आवश्यक होती. त्यामुळे या विधेयकाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना
विधेयक २०२६, आणि केंद्रशासित प्रदेश
कायदे सुधारणा विधेयक २०२६ मागे घेत असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रीजीजू यांनी
जाहीर केलं.
****
राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत
मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा
निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती
निश्चित केली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इंग्रजी माध्यमाच्या
खासगी शाळांमध्ये या तरतुदींचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या
पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक
राहील. तसेच, मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की, नाही याची तपासणी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षक यांच्या पथकांमार्फत केली जाणार
असल्याचे शासनाने स्पष्ट केलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस
देण्यात येईल आणि १५ दिवसांत खुलासा सादर करणे बंधनकारक असेल. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास
संबंधित शाळा व्यवस्थापनावर एक लाख रुपयांपर्यंत
दंड आकारला जाईल. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षापासून मराठी
विषय अनिवार्यपणे सुरू करण्याचे आदेश दिले जातील.
****
वाढत्या तापमानामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांच्या
वेळेत बदल करण्यात आला आहे. आजपासून उन्हाळी सुटीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत
भरतील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज
आशिया यांनी दिले आहेत. दरम्यान, हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या
लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
****
अकोला जिल्ह्यातही उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळी ११ वाजेपर्यंतच
शाळा आणि कॉलेज सुरू ठेवले जात आहेत. महानगरपालिकेने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली.
काही शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस
सुरू असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या वडाळा इथं काल अवकाळी पावसाने
हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ४३ अंशाच्या वर तापमान होते. कालच्या
पावसामुळे तापमानात घट झाली.
****
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या
जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उद्या १९ आणि
परवा २० तारखेला परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना
अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
नाशिकमधील कॉर्पोरेट
कंपनी टीसीएसमधील लैंगिक छळवणूक प्रकरणातील आरोपी निदा खान दोन महिन्यांपासून ठाण्यातील मुंब्रा भागात वास्तव्याला होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. तिचा
पती मोईन खान याला मुंब्रा पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी
दिली. निदा खान फरार असल्याने तिच्या पतीला ताब्यात घेतल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
भंडारा जिल्ह्यातल्या धनेगाव इथं मोहफूल वेचणारी एक
महिला जंगली प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाली. हल्ला करणारा प्राणी बिबट्या किंवा वाघ
असल्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
****
इराणने होर्मुज सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी
खुली केली आहे. लेबनॉनमधील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री
सय्यद अब्बास अराघची यांनी ही सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली. इराणच्या बंदरे
आणि सागरी संघटनेने निश्चित केलेल्या समन्वित मार्गाचे पालन सर्व जहाजांसाठी बंधनकारक
असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये
११ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.
****
आईपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल अहमदाबाद इथं झालेल्या
सामन्यात गुजराथ टाईटन्सने कोलकोता नाईट
राईडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. शुभमन गिल याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात
आला. आज बंगलुरू इथं दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू यांच्यात तर हैद्राबादमध्ये
चेन्नई सुपर किंग्स आणि सनराईजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे.
****
महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत डर्बन इथं झालेल्या सामन्यात
दक्षिण आफ्रिकेनं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिका पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० ने आघाडीवर
आहे.
****
चारधाम यात्रेसाठीच्या ऑफलाईन नोंदणीला कालपासून सुरुवात
झाली. काल पहिल्या दिवशी २ हजार ७१३ यात्रेकरुंनी
वैयक्तिक पद्धतीने नोंदणी केली. ऑफलाईन नोंदणीमध्ये ६८३ यात्रेकरुंनी यमुनोत्रीसाठी, ६६७ केदारनाथ आणि ६७३ यात्रेकरुंनी
बद्रीनाथसाठी नोंदणी केली असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment