Sunday, 19 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सर्वोच्च न्यायालयाकडून रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक तत्त्वं जारी

·      होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांवर गोळीबाराच्या घटनेचा भारताकडून तीव्र निषेध

·      अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर, परशुराम जयंतीचा सर्वत्र उत्साह

आणि

·      भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष आगरकर यांना मुदतवाढ

****

सर्वोच्च न्यायालयानं रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. प्रशासकीय चुका किंवा पायाभूत सुविधांमधल्या त्रुटींमुळं द्रुतगती मार्ग हे धोक्याचे मार्ग बनू नयेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए. एस. चांदुरकर यांच्या खंडपीठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. भारताच्या एकूण रस्ते जाळ्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांचा वाटा केवळ दोन टक्के आहे, मात्र रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे ३० टक्के मृत्यू हे याच महामार्गांवर होतात. टाळता येण्याजोग्या धोक्यांमुळं एकाही जिवाचा बळी जाणं, हे सरकारचं अपयश दर्शवतं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. कोणतेही जड किंवा व्यावसायिक वाहन राष्ट्रीय महामार्गावर किंवा त्याच्या कडेला उभं केलं जाणार नाही किंवा थांबवलं जाणार नाही; केवळ अधिकृत सुविधा केंद्रांवरच त्यांना थांबता येईल. इतर निर्देशांसह, न्यायालयानं राष्ट्रीय महामार्गांच्या हद्द क्षेत्रात कोणत्याही नवीन ढाब्याचे, उपहारगृहाचे किंवा व्यावसायिक वास्तूचे बांधकाम किंवा कार्यान्वयन करण्यास तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सर्व राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना महामार्गावरची सुरक्षा सुधारण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याचे निर्देशही खंडपीठानं दिले आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज पहाटे एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. बस उलटल्यावर मागून येणाऱ्या एका चारचाकी वाहनानं या बसला धडक दिली. अपघातातील जखमी प्रवाशांवर नजिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचा चालक आणि क्लिनर सुरू बसमध्ये रील बनवत होते, अशी माहिती प्रवाशांनी दिली आहे.

****

आखाती देशातील सध्याच्या युध्दजन्य परिस्थितीत, अशियाच्या मध्यपूर्व भागातील जलमार्ग होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नुकत्याच दोन भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या परराष्ट्र सचिवांनी दिल्ली इथं इराणच्या राजदूतांसोबत चर्चा करुन या संदर्भातली भारताची आपली गंभीर चिंताही व्यक्त केली आहे. या जलमार्गावरुन याआधीही भारतीय जहाजांच्या सुखरुप वाहतुकीबाबत सोय होती, तशी ती पूर्ववत करण्याबाबत निवेदन परराष्ट्र सचिवांनी यावेळी केलं.

****

सर्वसाधारण निवडणूक आणि पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व संबंधित पक्षांनी विद्यमान कायदेशीर तरतुदींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, माहिती तंत्रज्ञान नियम आणि आदर्श आचारसंहिता यांचा समावेश असलेल्या तरतुदींचं पक्षांनी पालन करून सामाजिक संपर्क माध्यम आणि डिजिटल मंचांचा जबाबदारीनं आणि नैतिकतेनं वापर करावा, असं निवडणूक आयोगाद्वारे नमूद करण्यात आलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोणतीही दिशाभूल करणारी किंवा बेकायदेशीर कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मित किंवा फेरफार केलेली सामग्री तीन तासांच्या आत कारवाईसाठी घेतली जावी, असं आयोगानं म्हटलं आहे.

****

अक्षय्य तृतीयेचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक समजला जाणारा हा सण, कधीही नाश न पावणारं सुख आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरात सणाचा उत्साह आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह, मराठवाड्यातल्या सर्व प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये आज नागरिकांचा खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. बाजारपेठ आंबे, डांगर आणि मातीच्या घागरींनी सजली आहे. अक्षय्य तृतीया तसंच परशुराम आणि बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती आणि भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय तृतीया हा सण आपल्याला सत्कर्म, दान आणि सेवाभावाच्या मार्गावर पुढे जाण्यास प्रेरणा देतो. हा सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर, भगवान परशुरामांकडून आपल्याला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची आणि सत्याच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा मिळते असं मोदी यांनी नमूद केलं. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

****

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पुढील तीन तासांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची तसंच गारपिटीची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अक्षय तृतीया, परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ब्राह्मण समाज समन्वय समितीतर्फे सकाळी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साह आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. औरंगपुरा इथं परशुराम स्तंभ येथे पूजन करून वाहन फेरी काढण्यात आली. तसंच महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा महोत्सव समितीच्या वतीनं आज सकाळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांमधून दुचाकी वाहन फेऱ्या काढण्यात आल्या. शहरात अक्षयतृतीयेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मंदिरांमध्ये तसंच घरोघरी पूजा करण्यात आली. अनेकांनी नवीन घरांमध्ये प्रवेश केला तर अनेकांनी नवीन वाहन खरेदीवर भर दिला. त्यात सर्वाधिक दुचाकी खरेदीला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सोनं-चांदी खरेदीसाठीही आजचा शुभ मुहुर्त साधल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे शहरातल्या बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. परभणीत महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ध्वजवंदन तसंच प्रतिमा पूजन करण्यात आलं. शहरातल्या कारेगांव मार्ग, बसवेश्वर चौक या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांना मानवंदना देण्यात आली. बीडमध्ये वीरशैव समाजातर्फे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात जातीभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे, असं माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.

****

सोलापूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली. बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे अनेक देखावे या मिरवणुकीमध्ये सहभागी मंडळांतर्फे सादर करण्यात आले.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला आहे. २०२७च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे. जुलै २०२३ मध्ये आगरकर यांची वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात निवडलेल्या भारतीय संघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं आयोजित चार स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली, आणि त्यापैकी दोन टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक तसंच, एका आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने खेळवण्यात येत आहेत.

कोलकाता नाईट रायडर संघासमोर राजस्थान रॉयल्स संघानं विजयासाठी १५६ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. कोलकाता इथं सुरू या सामन्यात कोलतकाता संघानं दोन्ही सलामीवर शुन्यावर गमावले असून संघाच्या पाचव्या षटकात तीन बाद ३ धावा झाल्या आहेत. आजचा दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता नविन चंदीगढ इथं पंजाब किंग्ज आणि लखनऊ सपर जायंटस यांच्यात होणार आहे. सध्याच्या गुणतालिकेनुसार, पंजाब किंग्ज संघ अव्वल स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरू, राजस्थान रॉयल, सनरायजर हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स हे अन्य संघ प्रारंभीच्या स्थानांसाठी शक्ती पणाला लावताना दिसत आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातील नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यात कामठा फाटा इथं पुलावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालयं सकाळच्या सत्रात अकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या संदर्भात निर्देश दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानाने ४४ अंश सेल्सीसचा पल्ला गाठला आहे.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात टुनकी इथं शेतीतला अभिनव प्रयोग प्रशंसा मिळवत आहे. इथले प्रयोगशील शेतकरी सुभाष शालिग्राम चांदुरकर यांनी विदर्भातल्या कडक उन्हात सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

****

No comments:

Post a Comment