Sunday, 26 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 26 April 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ एप्रिल २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन

·      जलद न्यायासाठी महसूल कायदे बदलण्यात येणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

·      आरोग्य समित्यांचं पुनरुज्जीवन करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश

आणि

·      राज्यातला बहुतांश भाग तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात;अकोल्यात ४६ पूर्णांक नऊ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

****

भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडलं असून, याच विचारानं आपले शास्त्रज्ञ नागरी अणू कार्यक्रम पुढे नेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाच्या मालिकेतील १३३वा भाग होता. तामिळनाडूच्या कल्पक्कमच्या अणू प्रकल्पात पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान असलेल्या संयंत्रणेतील फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकॅलिटीचा टप्पा साध्य केला आहे. संबंधित कार्यप्रणाली आता कार्यन्वयनाच्या टप्प्यात आली असल्यानं भारताच्या अणू ऊर्जा उत्पादन प्रवासातील ही एक ऐतिहासिक कामगिरी असल्याबद्दल मोदी यांनी प्रशंसा केली. पवन-शक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. आज भारत पवन ऊर्जा क्षमतेमध्ये जगात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे, हे आपल्या अभियंत्यांचं, युवा वर्गाच्या परिश्रमाचं तसंच, देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या यातील चांगल्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऐतिहासिक दस्तऐवजांचे संवर्धन करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सांगितलं. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारानं एका पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजांविषयी त्यांनी माहिती दिली. नागरिकांनी www.abhilekh-patal.in या संकेतस्थळाला भेट देऊन हे दस्तऐवज पाहावेत, असं आवाहन त्यांनी केलं.येत्या काही दिवसांतच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार असल्याचं स्मरण करून देत त्यांनी बुद्ध विचारांचं महत्व अधोरेखित केलं. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

फ्रान्समध्ये झालेल्या मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाचं कौतुक करत, मुंबईच्या श्रेया मुंदडा हिचा उल्लेख त्यांनी केला. देशात होणाऱ्या डिजिटल जनगणने बद्दल तसंच, भारतानं चीज उत्पादनात केलेल्या प्रगतीबद्दल आणि विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण चीज उत्पादनांबद्दल माहिती त्यांनी दिली. १८५७ चा पहिला स्वातंत्र्यलढा मे महिन्यातच सुरू झाल्याचं स्मरण त्यांनी करून देत, या उठावाच्या निमीत्तानं लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या भारतमातेच्या वीर सुपुत्रांना त्यांनी नमन केलं. मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात मुलांनी आनंद लुटण्यासोबतच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.

****

राज्याचं महसूल खातं हे नागरिकांच्या मालमत्तेचं रक्षण करतं त्यामुळं जुन्या महसूल कायद्यांमधील क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांची थेट सोडवणूक करण्यासाठी शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबारात ते आज बोलत होते. महसूल विभागातल्या प्रलंबित प्रकरणांबाबत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी त्यांच्याच स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले तर लोकांना मंत्रालयात येण्याची वेळ येणार नाही. महसुली प्रकरणांच्या सुनावणीत तारखांवर तारखा न देता केवळ दोन तारखांमध्ये निर्णय घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दुसऱ्या तारखेला लेखी युक्तिवाद न आल्यास एकतर्फी आदेश काढले जातील, असं महसुलमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी महसूलमंत्र्यांनी दोनशेहून अधिक नागरिकांची निवेदनं प्रत्यक्ष स्वीकारली. यातल्या काही निवेदनांवर जागेवरच निर्णय दिला, तर काही निवेदनांचा पंधरा दिवसांच्या आत निपटारा करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी महसूलमंत्र्यांच्या हस्ते महसुली सेवांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं.

****

राज्यात आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचं पुनरुज्जीवन करावं असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. समित्यांच्या पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसंच समाजातल्या सेवाभावी नागरिक यांनी सहभागी व्हावं. आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून, समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी तसंच त्रुटीबाबत त्वरीत उपाययोजना केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल असंही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी एका निवेदनाद्वारे नमूद केलं आहे.

****

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याची सरकारची इच्छा असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पुणे इथं भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात आज त्यांनी हे स्पष्ट केलं. राज्याचे अपारंपरिक ऊर्जा आणि दुग्धविकास, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्यानं होत असून इथं एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार असल्यानं कुशल, अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसंच, आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. भारती विद्यापीठानं छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसंच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

****

राज्यातला बहुतांश भाग तीव्र उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात आहे. राज्यात सरासरी तापमान ३२ ते ४२ अंश सेल्सियस दरम्यान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत उष्णतेची तीव्रता कायम आहे. अकोल्यात ४६ पूर्णांक नऊ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. प्रशासनानं नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

****

देशभरात पेट्रोलियम पदार्थ आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा प्राधान्यानं करण्यात येत आहे, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच, कोणत्याही वितरक केंद्रावर गॅस संपल्याची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात केतकीबेन पटेल केंद्रीय ग्रंथालयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. शिरपूरमध्ये राबवण्यात आलेलं जलसंधारण मॉडेल यापूर्वी राज्यात आदर्श ठरले असून, आता शिक्षण क्षेत्रातही शिरपूरनं देशपातळीवर वेगळा ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. शहरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नव्यानं सुरू करण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयामुळं, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे असं सांगू, इथलं केंद्रीय ग्रंथालय विद्यार्थ्यासाठी ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना चेन्नईमध्ये सुरू आहे. गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी १५९ धावांचं लक्ष्य आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात संघाच्या पाचव्या षटकांत बिन बाद ३३ धावा झाल्या होत्या.

आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजेपासून लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दरम्यान लखनऊमध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सध्या पंजाब किंग्ज संघ १३ गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद हे अन्य संघ पहिल्या चारमध्ये आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं एक मेपासून जनगणना सुरू होणार असून उद्या यानिमित्त कर्मचारी प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. महापालिकेनं यासाठी ३०८० कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात उद्यापासून घेण्यात येत असलेल्या १७ वर्षांखालील कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ८४० मल्ल सहभागी होणार आहेत. विभागीय क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा होणार असल्याची माहिती संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment