Monday, 27 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 April 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पवनशक्ती देशाच्या विकासाची नवी गाथा लिहित असल्याचं पंतप्रधानांचं ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन, महाराष्ट्रातल्या पवनऊर्जा क्षेत्राचा गौरवपूर्ण उल्लेख

·      जलद न्यायासाठी महसूल कायदे बदलण्यात येणार – महसूलमंत्र्यांची माहिती

·      महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आणि

·      राज्यात उष्णतेची लाट, छत्रपती संभाजीनगर आणि परभणीचं तापमान ४३ अंशांवर

****

पवनशक्ती देशाच्या विकासाची नवी गाथा लिहित असून, स्वच्छ ऊर्जेचा अंगिकार करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १३३व्या भागात ते काल बोलत होते. आज भारत पवन-ऊर्जा क्षमतेमध्ये जगात चौथ्या स्थानावर असून, या क्षेत्रात महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या राज्यांत सुरु असलेल्या उपक्रमांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

आज जग ज्या प्रकारच्या तणावातून आणि संघर्षातून जात आहे, अशा काळात गौतम बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वाचे झाले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशवासियांना आगामी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही प्रासंगिक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

भारताने विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडलं आहे. शेतीपासून ते आधुनिक नवसंशोधकांपर्यंत सर्वांनाच भारताच्या नागरी अणू कार्यक्रमाने मोठी मदत केल्याचं पंतप्रधान म्हणाले. तामिळनाडूत कल्पक्कम इथं ‘प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिऍक्टर’ने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य केल्याबद्दल त्यांनी भारतीय अणुशास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

जनगणना २०२७ मध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी ती देशाच्या विकासासाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऐतिहासिक दस्तऐवजांचं संवर्धन करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. नागरिकांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अभिलेख डॅश पटल डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन हे दस्तऐवज पाहावेत, असं आवाहन त्यांनी केलं. मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात मुलांनी आनंद लुटण्यासोबतच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पंतप्रधानांनी यवेळी केलं.

पर्यावरण संवर्धनाच्या प्रेरणादायी कथा, कच्छमधले फ्लेमिंगो, उत्तर प्रदेशातले ‘गज मित्र’ उपक्रम, मध्य भारतातलं काळवीट आणि माळढोक संवर्धन, ईशान्य भारतातील बांबू क्षेत्रातील प्रगती, ‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ मध्ये भारतीय विद्यार्थिनींनी मिळवलेलं यश, भारतानं चीज उत्पादनात केलेली प्रगती आदी मुद्यांचा पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला.

****

राज्याचं महसूल खातं हे नागरिकांच्या मालमत्तेचं रक्षण करतं त्यामुळे जुन्या महसूल कायद्यांमधल्या क्लिष्ट प्रक्रिया कमी करून सर्वसामान्यांना जलद न्याय देण्यासाठी कायदे बदलण्यात येत आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल शिर्डी इथं जनता दरबारात बोलत होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्याच स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवले तर लोकांना मंत्रालयात येण्याची वेळ येणार नाही, महसुली प्रकरणांच्या सुनावणीत तारखांवर तारखा न देता केवळ दोन तारखांमध्ये निर्णय घेण्याचे आदेश बावनकुळे यांनी यावेळी दिले.

****

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कर्करोगसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याची सरकारची इच्छा असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. पुणे इथं भारती विद्यापीठाच्या ३१ व्या स्थापना दिन समारंभात ते काल बोलत होते. मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचा विकास झपाट्यानं होत असून, इथं एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार असल्यानं कुशल, अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसंच, आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. भारती विद्यापीठानं छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसंच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

**

दरम्यान, आरोग्य मंत्री आबिटकर यांनी एक निवेदन जारी करुन, राज्यात आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचं पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश दिले आहेत. समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास दृढ होईल असंही आबिटकर यांनी म्हटलं आहे.

****

धुळे जिल्ह्यात शिरपूरमध्ये राबवण्यात आलेलं जलसंधारणाचं मॉडेल राज्यात आदर्श ठरलं असून, आता शिक्षण क्षेत्रातही शिरपूरनं देशपातळीवर ठसा उमटवला आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. शिरपूर इथल्या केतकीबेन मुकेशभाई पटेल सेंट्रल लायब्ररीला काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानकेंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

येत्या एक मे पासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं ‘आपली बस, आपली सेवा’ हे नवं अभियान सुरू होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एस टी महामंडळानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत बस ताफ्यात समाविष्ट करण्यापूर्वी तिची स्वच्छता, वेळेआधी फलाटावर उपस्थिती, नीटनेटका गणवेश आणि शिस्तबद्ध वर्तन चालक वाहकांना बंधनकारक असेल.

****

राज्यात येत्या एक मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. याअंतर्गत नागरीकांना स्व–गणना करता येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं कर्मचारी प्रशिक्षण आजपासून घेतलं जाणार आहे. यासाठी ३०८० कर्मचारी नियुक्त केले असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.

****

लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्यानं अंगाई आणि युनिसेफतर्फे धाराशिव इथं लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना प्रबोधनपर प्रशिक्षण देण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत असल्याचं शासनानं म्हटलं आहे. खेळाधारित शिक्षण, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण होत आहे. देशात केवळ धाराशिव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमात, १२० शाळा, ८००हून अधिक शिक्षक आणि १८ हजाराहून अधिक मुलांचा सहभाग होता.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शेक्सपिअर महोत्सवात काल विल्यम शेक्सपियरच्या जीवनावर आधारित राजहंस एव्हनचा, हा अभिवाचनपर कार्यक्रम सादर झाला. परशुराम देशपांडे लिखित कादंबरीवर आधारित या कार्यक्रमाचं शरद कुलकर्णी, अश्विनी दाशरथे, हर्षवर्धन दीक्षित, शाल्मली दाशरथे आणि कल्याण जोशी यांनी वाचन केलं. या अभिवाचनाला प्रबोध जोशी यांनी व्हायोलिनवर साथसंगत केली. दुसऱ्या सत्रात मलमली तारुण स्वरांचे, हा ज्येष्ठ गायिका स्वर्गीय आशा भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम गायक वैभव जोशी आणि गायिका वर्षा जोशी यांनी सादर केला. जीवन विकास ग्रंथालय आणि साहित्य कला मंचच्या या शेक्सपिअर महोत्सवाचा या सादरीकरणाने समारोप झाला.

****

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यात गंगाखेड पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळा काल घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातल्या नळणी–राजूर मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. काल रात्री हा अपघात झाला.

****

देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची तीव्र लाट असून, जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या १०० शहरांमध्ये भारतातल्या ९५ शहरांचा समावेश आहे. अकोला इथं काल विक्रमी ४६ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सुमारे ४३ पूर्णांक पाच, बीड इथं ४२, तर धाराशिव इथं ४१ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, बुलढाणा आणि चंद्रपूर इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, असं हवामान विभागाकडून कळवण्यात आलं आहे. 

****

 

No comments:

Post a Comment