Wednesday, 29 April 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 April 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात समावेश असून, एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

****

देशात विजेच्या सर्वोच्च मागणीचा उच्चांक गाठला जाऊन, ती मागणी पूर्ण करण्यातही भारताला यश आलं आहे. चार दिवसांपूर्वी म्हणजे, २५ एप्रिलच्या दुपारी २५६ गिगावॅटपेक्षा अधिक विजेचा पुरवठा करून ही विक्रमी मागणी पूर्ण केली असून, त्याचवेळी शेजारी देशांना होत असलेली वीज-निर्यातही सुरळीत सुरु ठेवली. देशात पारंपरिक वीज उत्पादनाच्या प्रकारांबरोबरच जलविद्युत, अणुऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प अश्या अनेक माध्यमातून हे विजेचं सर्वोच्च उत्पादन यशस्वीपणे करण्यात आल्याचं वीज मंत्रालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च मागणी पुरवताना नवीकरणीय ऊर्जेनं -विशेषतः सौर ऊर्जेनं मोलाचं योगदान दिल्याचंही मंत्रालयाने अधोरेखित केलं.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग – एनसीबीच्या विभागीय संचालकांची या वर्षाची पहिली त्रैमासिक परिषद नवी दिल्ली इथं पार पडली. या परिषदेत एनसीबीच्या सर्व क्षेत्रीय विभागांनी, पुढील तीन वर्षांत देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापराचा प्रभावीपणे मुकाबला करण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. या दोन दिवसीय परिषदेत प्रभावी खटला चालवणं, संयुक्त समन्वय समिती आणि नार्को समन्वय केंद्र यंत्रणेचा वापर करणं, फरार आरोपींना न्याय मिळवून देणं, एनसीबी विभागीय कार्यालयांच्या अंमलबजावणी आणि समन्वय कार्यांचा सविस्तर आढावा घेणं यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं.

****

केंद्र सरकारने 'केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९' मध्ये प्रस्तावित सुधारणांची रूपरेषा स्पष्ट करणारी एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, इथेनॉल आणि जैवइंधन मिश्रणाचं वाढीव उद्दिष्ट लक्षात घेऊन, नियमांमध्ये काही बदल सुचवण्यात आले आहेत. हायड्रोजन इंधनाचं वर्गीकरण 'Hydrogen + CN' वरून 'Hydrogen + CNG' असं करणं, ठराविक श्रेणीतल्या वाहनांसाठी वजनाची मर्यादा वाढवणं, 'E20' इंधनाच्या अंमलबजावणीशी सुसंगत बदल करणं, बायोडिझेलमध्ये श्रेणी सुधारणा करणं, उत्सर्जन चाचणीच्या निकषात बदल करणं, आदी सुधारणा या अधिसूचनेत प्रस्तावित आहेत.

****

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज अधिकृत नावाची घोषणा करण्यात येईल आणि उद्या उमेदवारी अर्ज भरला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राष्ट्रवादीच्या गाभा समितीची बैठक झाली, त्यानंतर तटकरे यांनी ही माहिती दिली. संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे एकच जागा असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी परभणी जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया येणाऱ्या सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू आणि जिंतूर या दोन तालुक्यांमधून जालना-नांदेड महामार्ग जात आहे. आतापर्यंत सेलू तालुक्यातल्या ६५ पूर्णांक ३८ टक्के हेक्टर क्षेत्राचं, तर जिंतूर तालुक्यातल्या ९० टक्के क्षेत्राचं भूसंपादन झालं आहे.

****

राज्यात लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सर्वसमावेशक कार्यपद्धतीसह संपूर्ण कार्यान्वयासाठी समन्वय संस्था म्हणून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्य करणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****

जलसंवर्धनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेली ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल यात्रा काल धुळे इथं पोहोचली. या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर इथून गोदावरी नदीचं पवित्र जल घेण्यात आलं असून, चौंडी इथून पवित्र माती आणण्यात आली आहे. राज्यातल्या १३१ नद्यांचं पाणी एकत्र करून ते नर्मदा नदीत अर्पण करण्यासाठी नेलं जात आहे.

****

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं उद्या तीस तारखेला लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतल्या लाभार्थ्यांसाठी कर्जवाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड शहरातल्या शंकरराव चव्हाण सभागृहात हा मेळावा होणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे.

****

राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट असून, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच ७२ रुग्णांची नोंद झाली आहे.

****

No comments:

Post a Comment