Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 29 April
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २९ एप्रिल
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या
दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत १८ पूर्णांक
३९ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातल्या सात जिल्ह्यांमधल्या १४२ मतदारसंघांचा यात
समावेश असून, तीन कोटी २० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या
टप्प्यात एक हजार ४४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, यात २२० महिलांचा समावेश आहे.
****
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत
दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं ही राष्ट्रीय चळवळ असल्याचं म्हणत सर्वोच्च
न्यायालयाने याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. लखनौमधल्या एका खासगी शाळेनं शिक्षण हक्क
कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी निवड होऊनही
एका विद्यार्थीनीला प्रवेश नाकारला होता, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने, राज्य सरकारच्या
निर्देशांनुसार खासगी अनुदानित शाळांसह परिसरातल्या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश
देणं कायद्याने बंधनकारक असल्याचं नमूद केलं. समाजातल्या दुर्बल आणि वंचित वर्गातल्या
मुलांना प्रवेश नाकारणं म्हणजे घटनेतल्या कलम २१ अ मधल्या शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराचं
उल्लंघन असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
देशातल्या नागरिकांना आणि करदात्यांना
सुलभ व्हावं, त्यांची सोय व्हावी यासाठी नवीन आयकर कायदा अंमलात आला
असल्याची माहिती आयकर विभागाचे मुख्य आयुक्त विक्रम सहाय यांनी दिली. मुंबईत काल नवीन
आयकर कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयकर कायदे
आणि आयकर यंत्रणा यात सुधारणा कारणासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं. नवीन
आणि जुन्या आयकर कायद्यांविषयी त्यांनी उपस्थित व्यापारी, करदाते, कर सल्लागार यांच्या शंकांचं निरसन केलं.
****
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागात ‘जीव -द क्रियेचर’ आणि ‘एप्रिल मे ९९’ या दोन चित्रपटांची
निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे
पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली. येत्या १२ ते २२ मे या कालावधीमध्ये फ्रान्समध्ये
कान चित्रपट महोत्सव होणार आहे.
****
हस्तलिखित दस्तऐवजांच्या स्वरूपात असलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनानं डिजिटल
नोंदणीचा उपक्रम सुरू केला आहे. या नोंदणीसाठी
'हर घर दस्तक' ही विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत महाराष्ट्राच्या हस्तलिखित दस्तऐवजांची ऑनलाईन
नोंद करून त्यातून राज्याचा सांस्कृतिक वारसा जगासमोर आणावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. काल यासंदर्भात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. देशभरातल्या हस्तलिखित दस्तऐवजांचं जतन आणि डिजिटायझेशन करणं, हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असून, यासाठी ज्ञानभारती ॲप
विकसित करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रातल्या कारागिरांच्या
सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आज जागतिक उत्पादन बनली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर
पोहोचवण्यासाठी, प्राडा हा जागतिक ब्रॅन्ड आणि लिडकॉम म्हणजेच संत रोहिदास
चर्मउद्योग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या करारानुसार कारागिरांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याकरता प्राडा पुढील तीन वर्षांसाठी
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ लेदर अँड फॅशन
टेक्नॉलॉजी इथं प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार आहे. पारंपरिक
कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक
पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.
****
नाशिक शहरातल्या वृक्षतोडीच्या
मुद्यावर हरित लवादानं यापूर्वी दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. नाशिक मध्ये कुंभमेळ्याच्या कामांसाठी मोठ्या
प्रमाणात वृक्षतोड प्रस्तावित आहे. त्याप्रकरणी मनीष बाविस्कर यांनी नाशिक महापालिकेविरुद्ध याचिका दखल केली होती. या प्रकरणाच्या सुनावणीत
महापालिकेनं स्थगिती आदेश मागे घेण्याची मागणी केली होती, मात्र हरित लवादानं ती फेटाळून लावत १९ जूनपर्यंत वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली
आहे.
****
राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची
लाट असून, अकोला जिल्ह्यात आतापर्यंत उष्माघाताच्या सर्वाधिक म्हणजेच
७२ रुग्णांची नोंद झाली आहे. ५५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, उर्वरित रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
सामोआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल
युवा आणि कनिष्ठ गट भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल चार सुवर्णपदकं पटकावली.
पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात सुनील सिंग याने २७१ किलो तर अभिनोब गोगोई याने ७१ किलो
वजनी गटात एकूण २८४ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरलं. चारू पेसी याने पुरुषांच्या
६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं तर महिलांच्या ५८ किलो वजनी गटात १८५ किलो वजन
उचलून ऐसांगफा गोगोई हिने सुवर्णपदक मिळवलं.
****
No comments:
Post a Comment