Wednesday, 13 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेतलेली नीट रद्द;नाशिकमधून एकास अटक

·      आंतरराष्ट्रीय परिचारका दिनी फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

·      एनसीईआरटी आणि सीबीएसईचा कृत्रीम बुद्धिमत्तेवर आधारित नवीन अभ्यासक्रम

·      सांगलीत पावसामुळे भिंत कोसळून सहा जण ठार;परभणीत वाळू टिप्परच्या धडकेत माजी सरपंचांचा मृत्यू

·      हिंगोली जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

आणि

·      मराठवाड्यात दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

****

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी तीन मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था – एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी ही माहिती दिली. कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात असून, केंद्रीय अन्वेषण संस्था-सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे.

दरम्यान, पुनर्परीक्षेची तारीख तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही, तसंच यापूर्वी भरलेलं शुल्कही परत केलं जाईल, असं अभिषेक सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग

****

ही परीक्षा रद्द झाल्यामुळे लातूर इथल्या विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. मुलांवर मानसिक ताण वाढेल, अशी प्रतिक्रिया पालकांकडून देण्यात आली. तर  दोषींवर कठोर कारवाई व्हावी; मात्र प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये,” अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाविरोधात एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली आहे. संबंधित क्लासेसने परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल ४२ प्रश्न हे प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे.

****

महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आर्थिक बळकटीसाठी देशातली संपत्ती देशातच राहिली पाहिजे, असं सांगत, पंतप्रधानांनी केलेल्या बचतीच्या आवाहनासंदर्भात विरोधकांच्या वर्तणुकीवर बावनकुळे यांनी टीका केली.

****

ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. कोणतीही वैध परवानगी, नसतांना या ॲप्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे. ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

****

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी एक हजार ७६८ कोटी रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. पोलिसांना स्वतःचं घर मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या पाच हजार चारशे एकोणसाठ पोलिसांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस काल साजरा झाला. या दिनाच्या औचित्यानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पंधरा व्यक्तिंचा गौरव केला. विजेत्यांमध्ये चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा समावेश आहे.

****

एनसीईआरटी आणि सीबीएसई यांनी संयुक्तपणे इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संगणकीय विचारसरणी आणि कृत्रीम बुद्धिमत्ता या विषयावर आधारित नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या नवीन अभ्यासक्रमाचं शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि शाळा पुन्हा सुरू झाल्यावर या विषयांचं अध्यापन सुरू होईल. एनसीईआरटीकडून इयत्ता ९, १०, ११ आणि १२ साठीही कृत्रीम बुद्धिमत्तेवर पाठ्यपुस्तकं तयार केली जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा, आरटीईअंतर्गत राखीव २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशाची मुदत या महिन्याच्या आठ तारखेला संपली असून, यामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र काही जागा रिक्त राहिल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

****

सांगली जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर १५ ते २० जण जखमी झाले. जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं दर मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या मरगुबाई यात्रेत ही दुघर्टना घडली. जखमींना जत आणि सांगली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या संदलापूर इथं पूर्णा नदीतून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत माजी सरपंच तथा सरपंच पती पंडितराव म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. संतप्त जमावाकडून टिप्परला आग लावण्यात आली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या दंगा नियंत्रण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जमावावर नियंत्रण मिळवलं.

****

हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये काल संध्याकाळी भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात तीन पूर्णांक चार रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या दोन महिन्यांतला हा पाचवा धक्का असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहराची तहान भागवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या १२ जूनच्या डेडलाईनपूर्वीच नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. सोमवारी जॅकवेलवरील पंपिंग यशस्वीरित्या सुरू झाली. काल हे पाणी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचलं. २२ मेपर्यंत हे पाणी मुख्य संतुलित जलकुंभात पोहोचवण्याचं नियोजन आहे.

****

बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांच्या घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे ५४ हजार लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून, हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

****

लातूर जिल्हा महसूल विभागानं ‘डिजिटल सातबारा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या, भूलेख डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहण्याची किंवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे.

****

जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा, छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत आणि आदेशानंतरही सदर कामास अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

शिक्षकांनी तत्काळ कर्तव्यावर रुजू होऊन संबंधित अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्त येडगे यांनी दिले.

****

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या शेत आणि पाणंद रस्त्यांची कामं नियोजनबद्धरीत्या पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल जालना आणि घनसावंगी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये प्रस्तावित पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतमाल वाहतुकीसाठी तसंच शेतीपर्यंत कृषी यंत्रसामग्री पोहोचण्यास सुलभता निर्माण होणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

****

राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगर इथं ४३ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३४ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****              

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment