Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· वैद्यकीय प्रवेशासाठी
तीन मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द
· अनधिकृत बाईक टॅक्सी
ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधितांवर कारवाईबाबत परिवहन मंत्र्यांची कठोर भूमिका
· आंतरराष्ट्रीय परिचारका
दिनाच्या औचित्यानं फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
· प्रधानमंत्री सूर्यघर
मोफत वीज योजनेमुळे मराठवाड्यातले ९३ हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी
आणि
· छत्रपती संभाजीनगरच्या
नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू
****
वैद्यकीय प्रवेशासाठी तीन
मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था– एनटीएकडून
आज ही माहिती देण्यात आली. कथित पेपरफुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय
अन्वेषण संस्था-सीबीआय या प्रकरणाचा तपास करणार आहे, दरम्यान, पुनर्परीक्षेची तारीख
लवकरच जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा
लागणार नाही,
कोणतंही
अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नाही. यापूर्वी भरलेलं शुल्कही परत केलं जाईल, असं एनटीएचे महासंचालक
अभिषेक सिंग यांनी सांगितलं. ते म्हणाले -
बाईट - अभिषेक सिंग, महासंचालक, एनटीए
****
दरम्यान, या पेपरफुटी
प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातून
आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
देशभरातल्या न्यायालयांचं
आधुनिकीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं एक उच्चाधिकार समिती गठीत करणार असल्याची
घोषणा देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
अरविंद कुमार या समितीचं नेतृत्व करतील. न्यायालयीन कामांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करणं आणि एकविसाव्या शतकाला शोभतील अशी न्यायालय संकुलं उभारणं, यासह अन्य महत्वाच्या
मुद्द्यांवर ही समिती लक्ष केंद्रित करणार आहे.
****
सार्वजनिक क्षेत्रातल्या
बँकांनी २०२५-२६ या वर्षात, एक लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांचा, आतापर्यंतचा सर्वोच्च
निव्वळ नफा नोंदवला आहे. त्यासोबतच, सलग चौथ्या वर्षी या बँका नफ्यात आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालयानं
ही माहिती दिली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या बँकांच्या एकूण व्यवसायात, बारा पूर्णांक आठ
टक्के,
तर
ठेवींमध्ये दहा पूर्णांक सहा टक्के वाढ झाली आहे. २०२५-२६ या वर्षात या बँकांच्या एकूण
थकित कर्जांचं गुणोत्तर एक पूर्णांक त्र्याण्णव शतांश टक्क्यांपर्यंत
घसरल्यामुळे बँकांच्या गुणवत्तेत वाढ झाल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या
अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर
भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी महाराष्ट्र
सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवले आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून
विविध ॲप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन
विभागाच्या नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडोसारख्या संस्थांच्या
अनधिकृत बाईक टॅक्सींचे प्रमाण वाढत असून, ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या
दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
****
पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या निधीला मान्यता
दिली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या याबाबतच्या प्रस्तावाला
मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत असलेल्या पोलिसांना
स्वतःचं घर मिळावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ पाच हजार
चारशे एकोणसाठ पोलिसांना मिळणार आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय परिचारका
दिवस आहे. या दिनाच्या औचित्यानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या फ्लोरेन्स
नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या
समारंभात राष्ट्रपतींनी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पंधरा व्यक्तिंचा
गौरव केला. विजेत्यांमध्ये चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४
वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा समावेश आहे.
दरम्यान, परिचारक अर्थात नर्सेस
म्हणजे देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या कणा आणि आशेचा स्तंभ असल्याचं मत केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी व्यक्त केलं आहे. देशाला
आपल्या नर्सेसचा अभिमान आहे, असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं
आहे. तर,
निस्वार्थ
भावनेनं सर्वांची सेवा करणाऱ्या नर्सेसचा मान ठेवावा, त्यांचं रक्षण करावं
आणि त्यांना सबल बनवावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.
****
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत
वीज योजनेचा लाभ घेत मराठवाड्यातले ९३ हजारांहून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले
आहेत. त्यांच्या घराच्या छतांवर ३४१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच कार्यान्वित करण्यात
आले आहेत. दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी
आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं या उद्देशानं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा,असं आवाहन महावितरणनं केलं
आहे.
****
शाळांमध्ये शिक्षण हक्क कायदा, आरटीई खाली राखीव
असलेल्या २५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशाची मुदत या महिन्याच्या आठ तारखेला संपली असून, यामध्ये, छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र काही
जागा रिक्त राहिल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध
होणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, त्यानंतर प्रतीक्षा
यादीतल्या विद्यार्थ्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहराची
तहान भागवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या १२ जूनच्या डेडलाईनपूर्वीच नवीन
पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सोमवारी जॅकवेलवरील पंपिंग यशस्वीरित्या
सुरू केली. आज हे पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पोचले. २२ मेपर्यंत
हे पाणी मुख्य संतुलित जलकुंभात पोहोचवण्याचे नियोजन आहे.
****
बीड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री
आवास योजनेसह इतर विविध घरकुल योजनांतर्गत घरकुलांचं काम हाती घेतलेल्या सुमारे ५४
हजार लाभार्थ्यांचे हप्ते गेल्या अनेक महिन्यांपासून मिळाले नसल्याची माहिती समोर आली
आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र
लिहून जिल्ह्यासाठी विशेष निधीची मागणी केली असून, हा प्रश्न तातडीनं मार्गी
लावण्याची विनंती केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आगामी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा
प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून
काम करावं,
असे
निर्देश परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी
आढावा बैठकीत ते आज बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी
यावेळी दिल्या.
****
लातूर जिल्हा महसूल विभागानं
‘डिजिटल सातबारा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या, भूलेख डॉट महाभूमी
डॉट जीओव्ही डॉट इन, संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहाण्याची
किंवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. तर, कायदेशीर कामासाठी
आवश्यक असलेला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा मिळवण्यासाठी नाममात्र शुल्कासह, डिजिटल सातबारा डॉट
महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन हे संकेतस्थळ वापरता येणार आहे.
****
मुंबईचं लोकमान्य टिळक टर्मिनस
ते बल्लारशाह या नव्या रेल्वे सेवेच्या संचालनाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंजुरी
दिली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातल्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी
मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत
आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये
नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment