Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
यावर्षीच्या तीन मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची
नीट युजी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था– एनटीए नं आज ही घोषणा
केली. परीक्षेत झालेल्या कथित पेपरफुटीच्या
प्रकरणानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रीय अन्वेषण संस्था याबाबत तपास करणार आहे. नव्या परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाणार असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार नाही, तसंच कोणतंही अतिरिक्त शुल्कही भरावं लागणार नसल्याचं, एनटीएनं स्पष्ट केलं आहे.
****
आसाममध्ये, हिमंता बिस्वा सरमा यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
घेतली. गुवाहाटी इथं झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना
पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन
नबीन यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीशासित राज्यांचे मुख्यमंत्री
यावेळी उपस्थित होते.
****
आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे. आधुनिक परिचर्येच्या
संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीला हा दिवस साजरा केला जातो. परिचारिका
अर्थात नर्सेस म्हणजे देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या कणा आणि आशेचा स्तंभ असल्याचं मत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी व्यक्त
केलं आहे. देशाला आपल्या नर्सेसचा अभिमान आहे, असं अमित शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. तर, निस्वार्थ भावनेनं सर्वांची सेवा करणाऱ्या नर्सेसचा मान ठेवावा, त्यांचं रक्षण करावं आणि त्यांना सबल बनवावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.
****
दरम्यान, या दिनाच्या औचित्यानं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यंदाच्या
राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात
झालेल्या समारंभात राष्ट्रपतींनी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पंधरा व्यक्तिंचा गौरव केला.
****
महान शीख योद्धा बाबा बंदा सिंह बहादुरजी यांच्या सरहिंद
विजय दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. अनन्वित
छळानंतरही धर्म परिवर्तनास नकार देणाऱ्या बहादुरजींचं आयुष्य नेहमी प्रेरणा देत राहील, असं शाह यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
बाबा बंदा सिंह बहादुरजी यांनी १७१० साली मुघलांचा पराभव करून उत्तर भारताच्या मोठ्या
भागात स्वतंत्र शीख राज्य उभारलं होतं.
****
राज्यातल्या पाच हजार ४५९ पोलिसांना घरबांधणी अग्रीम म्हणून
एक हजार ७६८ कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या
या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात सांगितलं. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली
पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून आपण आग्रही
राहिलो असून, त्यामुळेच २०१४ ते २०१९ या काळात
मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबवण्यात आल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला
पाठवलेल्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे
२९ एप्रिलला पाठवलेल्या या यादीत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि सेक्रेटरी म्हणून
जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत कारकुनी चूक झाली असून, लवकरच ती दुरुस्त करण्यात येणार असल्याचं पक्षाच्या राष्ट्रीय
अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं
आहे.
****
जनगणनेसाठी आदेश प्राप्त होऊनही कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या
शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिला
आहे. महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत आणि आदेशानंतरही सदर कामास अनुपस्थित राहणाऱ्या
शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्षकांनी तत्काळ कर्तव्यावर रुजू
होऊन संबंधित अहवाल सादर करावा, असे निर्देश येडगे यांनी दिले.
****
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – पोकरा अंतर्गत लातूर
जिल्ह्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. “नवीन
तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी” या संकल्पनेवर आधारित हे अभियान
खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. सरपंचांनीही यामध्ये सक्रिय सहभाग
घ्यावा, असं आवाहन प्रकल्प संचालकांनी केलं
आहे.
****
No comments:
Post a Comment