Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १३ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात
वाढ केली असून,
ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात
ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदीच्या घटकांवर पाच टक्के शुल्क आकारलं जाईल, तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी पाच पूर्णांक चार टक्के शुल्क लागू होईल.
****
नीट पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं
आतापर्यंत १५ जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी
प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेने तपास
सुरु आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं.
तत्पूर्वी,
राजस्थान पोलिसांनी सात मे रोजी डेहराडूनमधून पाच जणांना अटक
केली होती. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने नाशिक इथून शुभम
खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे
शाखेनं ही कारवाई केली.
****
तामिळनाडूमध्ये, टीव्हीके आणि घटक पक्षांच्या
वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध कराण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. मित्रपक्षांच्या
पाठिंब्यासोबतच,
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी AIADMK च्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे एकमेव आमदार एस. कामराज यांचाही
पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीके कडे एकंदर १५० आमदारांचा पाठिंबा
उपलब्ध आहे.
****
ए आय एन आर सी नेते एन. रंगस्वामी यांनी आज पुदुचेरीच्या मुख्यमंत्रीपदाची
शपथ घेतली. नायब राज्यपाल कैलासनाथन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
****
सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका यात्रेदरम्यान भिंत कोसळून
सहा जणांना मृत्यू झाल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
यासंदर्भात सामाजिक माध्यमावर लिहिलेल्या संदेशात त्यांनी, जखमी
लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त
केलं असून,
मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांपैकी तिघे जण जत तालुक्यातले
असून,
इतर तिघे कर्नाटकातले आहेत. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असून
त्यांच्यावर मिरज, जत, संख
आणि विजापूर इथल्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ
झाली असून,
महागाई निर्देशांक तीन पूर्णांक ४८ शतांश टक्क्यांवर पोहोचला
आहे. मार्च महिन्यात हा दर तीन पूर्णांक चार दशांश टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम
अंमलबजावणी मंत्रालयानं ही माहिती जाहीर केली. एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ
महागाई दर तीन पूर्णांक ७४ शतांश टक्के राहिला, तर
शहरी भागातला महागाई दर तीन पूर्णांक १६ शतांश टक्के नोंदवला गेला.
****
राज्य विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा
उद्या होणार आहे. सभापती राम शिंदे या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले डॉ.
नीलम गोऱ्हे,
बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, झीशान सिद्दीकी, माधवी
नाईक,
सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित
आमदारांमध्ये समावेश आहे.
****
राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण
केंद्र उभारण्याला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन
आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची पन्नासावी वार्षिक बैठक काल मुंबईत राज्यपालांच्या
अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी
विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी
आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना
संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या
सामाजिक,
शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे.
****
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या
नाशिक महापालिकेला केंद्र सरकारने २७२ कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे.
त्यामुळे महापालिकेला काही महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती
नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल
गोदावरी,
शुद्ध गोदावरी, रामकालपथ प्रकल्पाचा
दुसरा टप्पा,
वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक
मदत होणार आहे,
असं त्यांनी सांगितलं.
****
राजस्थानमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात
आला आहे. गुजरात, महाराष्ट्र
आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये उद्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची
शक्यता असून,
किनारी कर्नाटकात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सने
सनरायजर्स हैदराबाद संघाचा ८२ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच गुजरातचा संघ गुण
तालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे. या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता
नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. रायपूर इथं संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment