Thursday, 21 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 May 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताने राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत जगातला सर्वात मोठा तापसणी आणि प्राथमिक ओळख कार्यक्रम सुरू केला आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्ड़ा यांनी सांगितलं. जिनीवा इथं जागतिक आरोग्य सभेच्या ७९व्या अधिवेशनात, फुफ्फुस आरोग्याच्या तपासणीवर मंत्रीस्तरीय दृष्टीकोन या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक घरी पोहचून रुग्णाचा शोध घेणं, फिरते तपासणी शिबीर, सार्वजनिक मोहीम आणि जोखमीच्या भागांमध्ये विशेष मोहिमा राबवून संवेदनशील लोकसंख्येमध्ये सक्रियपणे रुग्ण ओळखण्याचं काम वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाने टीबी आणि फुफ्फुसांशी संबंधित इतर आजार शोधण्यासाठी आधुनिक तपासणी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

****

सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस भारत दौऱ्यावर असून, आज मुंबईत भारत-सायप्रस बिझनेस फोरम मध्ये त्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मुंबईत सायप्रस व्यापार केंद्र उभारण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी यावेळी केली. हे केंद्र यावर्षी एक सप्टेंबर पासून सुरु होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भारत आणि सायप्रस या देशांमध्ये चित्रपट आणि सर्जनशील क्षेत्रातील सहकार्याची घोषणा करण्यात आली. ‘इश्का’ या आगामी चित्रपटाचा मुहूर्तही यावेळी पार पडला असून, चित्रिकरणाचा मुख्य टप्पा सायप्रसमध्ये होणार आहे. भारत–सायप्रस भागीदारी अधिक दृढ होत असून सांस्कृतिक सहकार्यामुळे दोन्ही देश अधिक जवळ येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

****

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. १९९१ मध्ये याच दिवशी त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.

दहशतवादविरोधी दिनही आज पाळला जात आहे. युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो.

****

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गूगल आणि टेलिग्रामसह काही प्रमुख समाजमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समुहाद्वारे होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. येत्या २१ जूनला होणार्या नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज माध्यमांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी या बैठकीत दिले.

****

एल निनोच्या प्रतिकुल परिणामांची शक्यता लक्षात घेत लातूर जिल्ह्यात “वैरण विकास योजना – चारा उत्पादक कार्यक्रम” राबवण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर संकरीत मका आणि ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. या साठी पात्र शेतकऱ्यांनी येत्या २८ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात परभणी जिल्ह्यातल्या महिला स्वयंसहायता समूहांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. अवघ्या १७ दिवसांच्या या प्रदर्शनात जिल्ह्यातल्या सहा महिला बचतगटांनी तब्बल ८२ लाख २२ हजार ३०० रुपयांची उल्लेखनीय उलाढाल करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एक ते १७ मे दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

****

देशातल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ऍग्रो हॅकथॉन स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करणारे निवृत्त रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. हाके यांनी विकसित केलेलं सिल्क स्कॅनर हे अत्याधुनिक उपकरण भविष्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार असल्याचं मत कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पेक्ट्रोमिती संवेदक आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेलं हे उपकरण रेशीम कोषांची गुणवत्ता अचूकपणे तपासण्यास सक्षम आहे. सिल्क स्कॅनर हे यंत्र रेशीम कोषांचं वैज्ञानिक परीक्षण करून शेतकऱ्यांना पारदर्शक आणि योग्य दर मिळवून देण्यास मदत करणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आंबा तसंच मिलेट महोत्सवाचं आज शेतकऱ्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा महोत्सव सोमवार पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात संपूर्ण मराठवाडा तसंच कोकणातले हापूस आंबा उत्पादक सहभागी झाले असल्याचं सभापती श्रीराम शेळके यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment