Thursday, 21 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      जागतिक भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन;सायप्रस सोबत सहा तर दक्षिण कोरियासोबत तीन सामंजस्य करार

·      एलनिनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज

·      बोलाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत दक्षता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन

आणि

·      नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील डॉ. मनोज शिरूरे सीबीआयच्या ताब्यात

****

महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सायप्रसच्या उद्योगसमूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केलं आहे.

सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलीदेस यांनी यावेळी बोलतांना, भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस साहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या १ सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरु करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली.

 

दोन्ही देशांमध्ये सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 

दरम्यान, दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागांने आज तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातील तरुणांसाठी जागतिक संधी निर्माण करेल, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालींच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल, असा विश्वास व्यक्त केला.

****

यंदाच्या खरीप हंगामावर एल-निनोचं सावट असून, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई इथं झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल, या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. हे संकट लक्षात घेता, जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामे अत्यंत जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

 कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे सरचिटणीस प्रवीण पटेल, संघटन मंत्री सुभाष शाह, संघटन मंत्री अरविंद पटेल आणि सदस्य रमेश पटेल उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचं पत्र सादर केलं. देशातील १२ लाख कृषी निविष्ठा विक्रेते आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी चार वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण मागण्या यातून करण्यात आल्या आहेत.

****

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. डॉ. ज्योती विनायक मेटे यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही यासंदर्भात पाठपुरावा केला होता.

****

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीर भूमी इथं जाऊन अभिवादन केलं.

 

छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनी ही शपथ घेत, दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.

****

बोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतील डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी बोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या लक्षणांमध्ये ताप, डोकेदूखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्त्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही २१ दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळली तर वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयाने केलं आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील बालरोग तज्ञ डॉ. मनोज शिरूरे याला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने आज ताब्यात घेतलं. डॉ. शिरूरे याने आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने लातूरमधील शिरूरे याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं, चौकशीअंती आज त्याला ताब्यात घेण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी संयम राखावा, असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून, सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिला आहे.

****

ठाणे जिल्ह्यातल्या नौपाडा परिसरातल्या गावदेवी भाजी बाजारात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला असून दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले. ही आग आटोक्यात आणली असून, दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. 

****

तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅक वॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून, सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धरतीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं, या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

****

ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. २००८ साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली हा खटला सुरु होता. फिर्यादी पक्षाला साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या २६ मे पासून सर्व प्रकारच्या प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या २६ मेपासून तीन महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

****

राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक ४७ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४३ अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक सहा, बीड ४० पूर्णांक चार, तर धाराशिव इथं ३९ पूर्णांक एक दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

 

विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या ४८ तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

****

बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे.

****

नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी यावेळी बोलतांना, सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा ही शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असल्याचं सांगितलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज तीन प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. मृतांमधे सात महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे.

****

No comments:

Post a Comment