Monday, 25 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राष्ट्रपतींच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यात ६६ पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार

· मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन, मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती

· शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करावं-वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं आवाहन

·      आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा बाद फेरीत प्रवेश, उद्या रॉयल्स चँलेजर्स बेंगळुरु आणि गुजरात संघादरम्यान पहिला सामना

·      आणि

·      राज्यात बहुतांश भागात अवकाळी पाऊस, पुढील दोन दिवस बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

**

पद्म पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी ६६ जणांना गौरवण्यात येईल. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित सहा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. यावेळी दोन जणांना पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरीत पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येतील. राज्यातून १५ जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

**

जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचं असेल, तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरच्या निमजी गोंडखैरी परिसरात, १०० एकरावर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर ते बोलत होते. या सुविधेमुळे उद्योग, उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून, मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं, ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टीक्सच्या व्यवस्थेत वाढ होण्यास वाव दिसत आहे. या क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, गोदाम लॉजिस्टिक्स पार्क, हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास इंधन खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

**

यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर, फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं, भारतीय रिझर्व बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर एक अब्ज ३० कोटी डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च एक अब्ज नऊ कोटी होता, असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ, आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

**

प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या ‘संसद रत्न’ पुरस्कारांसाठी १२ खासदार आणि ४ संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलका यांच्या अध्यक्षतेखालची ग्राम विकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती, या संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

**

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईने इयत्ता बारावीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक अडचणींबाबत मोठी कबुली दिली आहे. या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांकडून चुकीने जास्त आणि चुकीची फी कपात झाली असल्याचं मंडळाने मान्य केलं असून, अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त घेतलेली फी परत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण न येता उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल असंही सीबीएसईने याबाबत आज जारी केलेल्या परिपत्रकात सांगितलं आहे.

**

मराठवाड्यासह राज्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजन दक्षतेनं करण्याचं आवाहन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसामध्ये अनियमितता निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, राज्यात सर्वसाधारण ते कमी पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत येवून कमी पाण्यावर तग धरणारी पिकांची निवड, पेरणीपूर्वी बियाण्यांवर योग्य बीजप्रक्रिया, मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब, ठिबक आणि तुषार सिंचनासह शेततळे, पाणी साठवण आणि संरक्षित सिंचन व्यवस्थापनावर भर देण्याचं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर इंद्र मणि यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी कृषि विद्यापीठ आणि कृषि विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करावी असंही त्यांनी सांगितलं आहे.

**

शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य, इतिहासाचे अभ्यासक डॉ. गनी पटेल यांना काल प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर इथं राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गनी पटेल यांना गौरवण्यात आलं.

**

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या वतीनं देण्यात यणाऱ्या पुरस्कारांचं वितरण काल ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रंगकर्मी बंकट पुरी पुरस्कार अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना, रंगमंचीय कार्य गौरव पुरस्कार अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांना, तर विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदीप भोकरे यांना प्रदान करण्यात आला.

**

दरम्यान, लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी यांच्या वतीनेही ‘सन्मान कर्तृत्वाचा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा काल पार पडला. यावेळी आकाशवाणीचे लातूर जिल्ह्याचे वार्ताहर पत्रकार शशिकांत पाटील, संगीत क्षेत्रात आसावरी बोधनकर-जोशी, निवेदक सुशील सूर्यवंशी, महेश हेड्डा, बालाजी जगताप, अण्णाराव खोडेवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे तसंच नागपूर इथल्या दिपाली आणि अंजली राठोड यांना सन्मानित करण्यात आलं.

**

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीजखर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौरऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनाने किमान ३० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी, प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल.

**

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. व. ल. देशपांडे यांचं काल निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 

**

नांदेड शहरात साठे चौक परिसरातल्या दोन मुलांचा गोदावरी नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. १४ वर्षीय रणवीर शिंगाडे आणि १३ वर्षीय गणेश डोंगरे हे दोघं नगीनाघाट परिसरात पोहण्यासाठी गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

**

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या आंबा महोत्सवाला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात दोन हजार २०३ क्विंटल आंबा दाखल झाला असल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं. ही या हंगामातली आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली असून, दर्जानुसार आंब्याला प्रतिक्विंटल साडेचार ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळाला.

**

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, काल राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडीयन्सवर ३० धावांनी, तर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला. यासह रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे संघ अंतिम चार मध्ये खेळणार आहेत. पहिला सामना उद्या धरमशाला इथं रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरु, गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे.

**

राज्याच्या विविध भागात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांतही काल जोरदार पाऊस झाला. 

दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

तर येत्या २६ तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment