Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 May 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२६ सायंकाळी
६.१०
****
· बारावीचा निकाल जाहीर;राज्यातून ८९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण
· मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर अव्वल;लातूरचा
निकाल सर्वात कमी ८४ टक्के
· उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस
· प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती
आणि
· माजी आमदार सुरेश जेथलिया अनंतात विलीन
****
राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा
निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८९ पूर्णांक
७९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी
माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमधे
विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक १४ टक्के
लागला आहे तर,
पुणे विभाग ९१ पूर्णांक २५ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई ९० पूर्णांक ०८ टक्के, नाशिक ९० पूर्णांक ७२ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ६८ टक्के लागला आहे. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९० पूर्णांक ८२ टक्के लागला, लातूर विभागाचा निकाल सर्वात
कमी म्हणजे ८४ पूर्णांक १४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
जालना ८६ पूर्णांक
१७ शतांश टक्के,
नांदेड ७७ पूर्णांक
७०,
बीड ९० पूर्णांक
१४,
परभणी ८७ पूर्णांक
६९,
हिंगोली ८८ पूर्णांक
६८ तर धाराशिव जिल्ह्याचा निकाल ८८ पूर्णांक ५९ शतांश टक्के इतका लागला आहे. नांदेड जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत
१५ टक्क्यांनी घसरला आहे.
दरम्यान, या
परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांचं
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन करत विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कल
विचारात घेऊन पुढील वाटचाल करावी असं आवाहन केलं आहे. दरम्यान, या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी
हताश न होता पुन्हा नव्या उमेदीनं अभ्यासाला लागावं आणि यश संपादन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरु केलेली उमेद मॉलची व्यवस्था
तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला
आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन
२०२६ या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
झालं त्यावेळी ते बोलत होते. सध्या २० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित १६ जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरु करू असं त्यांनी सांगितलं. महालक्ष्मी
सरस उपक्रमाअंतर्ग उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर एक हजारापेक्षा
जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी
करावी,
असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
मुंबई पुणे द्रृतगती महामार्गावरचा मिसिंग लिंकचा भाग आजपासून
वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत
लोकार्पण झालं. उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर आज हा मार्ग मोकळा
झाला.
****
ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकारपरिषदेत बोलत होते. राज्यातल्या
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर १७ लाख कोटी रुपयांचे करार केल्याची
माहिती त्यांनी दिली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना
मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक se.census.gov.in या पोर्टलवर घरबसल्या किंवा कुठूनही सहज ३३ प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.
****
केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं
सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण
सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाचवेळी
नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन ईशारा देणारे
संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा
विकसीत केली असल्याची माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं
आवाहन त्यांनी केलं आहे.
****
प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, जोशी यांच्या नियुक्तीबद्दल
अभिनंदन करत,
त्यांच्या शब्दांमध्ये मातीचा सुगंध असून, त्यांच्या दूरदृष्टीमध्ये देशाच्या संस्कृतीचे कालातीत सार प्रतिबिंबित होत असल्याचं
म्हटलं आहे. दरम्यान जोशी यांनी यापूर्वी मुंबईच्या केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे
अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.
****
परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया
यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी परतूर इथल्या विठ्ठल जिनिंग परिसरात अंत्यसंस्कार
करण्यात आले. ६९ वर्षीय जेथलिया यांचं काल हृदयविकाराने निधन झालं होतं. खासदार कल्याण काळे, आमदार
अर्जुन खोतकर,
आमदार बबनराव लोणीकर, आमदार
राजेश विटेकर,
आमदार हिकमत उढाण, यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी जेथलिया यांना अखेरचा निरोप दिला.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनाच्या
वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं ‘गोदा ते नर्मदा’
ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर ते महेश्वर या प्रवासादरम्यान ही
जलयात्रा आज श्री क्षेत्र वेरूळ इथं दाखल झाली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर
तसंच आमदार प्रशांत बंब यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
****
परभणीचे नूतन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आज आपल्या पदाचा
कार्यभार स्वीकारला. मावळते पोलिस
अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांना पोलिस दलाकडून
आज निरोप देण्यात आला. पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची मुंबई इथं गुप्त वार्ता
विभागाच्या उपआयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक आणि परिमंडल कार्यालयात
काल महाराष्ट्र दिनानिमित्त वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४१ तंत्रज्ञ आणि यंत्रचालकांचा
गौरव करण्यात आला. यावेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांच्या हस्ते
ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची
उपस्थिती होती.
****
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात काल
'बुद्ध पौर्णिमे' निमित्त
प्राणी गणना पार पडली. यासाठी 'निसर्ग अनुभव' अर्थात प्राणी गणना उपवनसंरक्षक कृष्णा भवर आणि सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे
यांनी मार्गदर्शन केलं. या गणनेमध्ये एकूण १५ वन्यजीवांची नोंद करण्यात आली. यामध्ये
आठ सोनेरी कोल्हे, तीन राज मांजर, एक
तरस,
एक मुंगूस, दोन रान ससे आढळल्याचं वनखात्यानं
कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातील वनसंपदेचं रक्षण, संवर्धन
आणि विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत
आज बैठक पार पडली.या बैठकीत वनविभागाच्या सद्यस्थितीचा आणि भविष्यातील नियोजनाचा सविस्तर
आढावा घेण्यात आला. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करताना
स्थानिक प्रजातींना प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी,उन्हाळ्यात वाढलेल्या वणव्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी ‘वन अग्नी सुरक्षा पथक’
बळकट करणे तसंच गावपातळीवर जनजागृती करणे यावर भर देण्याचे निर्देश मंत्री रावल यांनी
यावेळी दिले.
****
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारताच्या
संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपान्त्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकी रेड्डी या जोडीने चिनी
तैपेई बरोबरचे आपापले सामने जिंकल्याने भारत उपान्त्य फेरीत दाखल झाला आहे.
****
राज्यात आज सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं
गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक पाच, छत्रपती
संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक आठ, धाराशिव आणि नांदेड इथं सरासरी
४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.
****
भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकीग समुहाची कोट्यावधी रुपयांची
आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात
सीबीआयला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यर्पण
घडवून आणलं. पारेख १ मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर
किंग्ज या संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नई इथे सायंकाळी साडे सात वाजता सामना
सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment