▼

Sunday, 3 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      दिल्लीतील एका इमारतीत झालेल्या ‘एसी’ स्फोटात नऊ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

·      देशभरात वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा सुरळीत पार पडली

·      पुणे-नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची उद्या मतामोजणी

आणि

·      आयपीएल स्पर्धेत हैदराबादचे कोलकातासमोर विजयासाठी १६६ धावांचं लक्ष्य

****

दिल्लीतील विवेक विहार भागात एका चार मजली इमारतीत आज पहाटे वातानुकुलीत यंत्र-‘एसी’चा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला तर, चौघेजण जखमी झाले आहेत. या इमारतीतील १५ जणांना बचाव पथकानं सुखरुप बाहेर काढलं आहे. शाहदरा स्थित इमारतीत लागलेली आग सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पूर्णतः आटोक्यात आणली गेली. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. ही घटना अत्यंत क्लेशदायक असल्याचं सांगत त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना प्रकट केल्या. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

****

जबलपूर इथं नर्मदा नदीतील बर्गी धरणात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे. काल सायंकाळी पाच वर्षीय दोन आणि आज सकाळी एका मुलाचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं.

****

देशभरात आज वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे आयोजित ही परीक्षा दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत घेण्यात आली. ५०० हून अधिक शहरांमधील परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा आणि बायोमेट्रिक पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी उपस्थित होते.

****

पुण्यातील नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी वेळेत दोषारोपपत्र दाखल होऊन खटला चालण्यासाठी सर्व पुर्तता जलदगतीने केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या कृत्याचा निषेध केला, “ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेवरला कलंक आहे, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.” याप्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहलं असून तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी बाल हक्क आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार असल्याचं बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी म्हटलं आहे. भोर तालुक्यातील नसरापूर इथं एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना शुक्रवारी घडली होती.

****

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, चार मे रोजी पार पडणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपालाची मतं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र– ‘इव्हीएम’मधील मतांची मोजणी होईल. या प्रक्रियेदरम्यान उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक उपस्थित राहतील. दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे तसंच केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

पश्चिम बंगालमध्ये ७७ केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून पाचही राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात विविध टप्प्यांत मतदान झाले होते. आसाममधील १२६, केरळमधील १४०, पुद्दुचेरीमधील ३०, तामिळनाडूतील २३४ आणि पश्चिम बंगालमधील २९३ जागांच्या निकालांकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

****

आज ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे मूलभूत तत्त्व जपण्यासाठी आणि जगभरातील पत्रकारितेच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिनाची घोषणा केली होती. ‘शांततापूर्ण भविष्याची निर्मिती’ ही या वर्षाच्या दिनाची संकल्पना आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि पत्रकारिता, मानवाधिकार तसंच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती व्यवस्था अधिक बळकट करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

****

नाशिकचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. डी. एस. स्वामी यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे सूत्रे सोपविली; पाटील यांची मुंबईत पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. स्वामी यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

****

राज्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी येत्या १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडं लेखी पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र राज्य विपणन महासंघ आणि नाफेडद्वारे प्रति क्विंटल पाच हजार ८७५ रुपये दरानं हरभरा खरेदी सुरू होती. ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत सुरू राहणं अपेक्षित होतं, मात्र खरेदी पोर्टल २४ एप्रिल रोजी अचानक बंद करण्यात आले. यामुळे नोंदणी केलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असं या पत्रात नमूद आहे.

****

धुळे जिल्ह्यातील नगावबारी ते फॉरेस्ट कॉलनी दरम्यानच्या ४० फुटी रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होतं. उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार अग्रवाल यांनी यावेळी सांगितलं. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगावबारी, फॉरेस्ट कॉलनीसह ५० कॉलनींतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत ३२ लाख ४७ हजार ९४ मतदारांपैकी २४ लाख १६ हजार ६१८ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

****

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक तपासणी केंद्राचं लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते आज झालं. राज्यातील ११ रुग्णालयांमध्ये डायलिसिस केंद्र आणि भंडाऱ्यासह सात जिल्ह्यांमध्ये ‘एमआरआय’ सेवांचा यात समावेश आहे. या सेवेमुळं गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरात जाण्याची आता गरज राहणार नाही.

****

विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या ठिकाणांना एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती -अकोला- तिरुपती या साप्ताहिक एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेसेवेची सुरुवात झाली आहे. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी आठ वाजून १० मिनिटांनी धावणार असून या रेल्वेमुळे अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबादमार्गे थेट तिरुपती गाठता येणार आहे. या रेल्वे सेवेचा बालाजी भक्तांसह, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी अशा सर्व प्रवाशांना लाभ होणार असल्याची भावना खासदार धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

****

क्रिकेट

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद इथं सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर यांच्यात सामना सुरु आहे. हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि १९ षटकात सर्व बाद १६५ धावा करत कोलकाता संघासमोर १६६ धावांचं विजयासाठी लक्ष्य दिलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकाता संघाच्या ७ षटकात एक गडी बाद ७९ धावा झाल्या होत्या. दरम्यान, आजचा दुसरा सामना अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सांयकाळी साडेसात वाजता होणार आहे.

****

भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकत आपल्या नावावर केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं २०० धावांचं लक्ष्य ४१ षटकं आणि एका चेंडुत गाठत नऊ गडी राखून विजय मिळवला.

****

No comments:

Post a Comment