▼

Monday, 4 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ मे २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी

·      पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा ओपेकचा निर्णय

·      नसरापूर बालिका अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

आणि

·      वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची ‘नीट’परीक्षा संपन्न  

****

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. आसाममध्ये १२६, केरळ मध्ये १४० आणि पुदुच्चेरीमध्ये ३० जागांसाठी, तर तामिळनाडूमधल्या २३४ आणि पश्चिम बंगालमधल्या २९४ पैकी २९३ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपालाची मतं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र – इव्हीएम मधल्या मतांची मोजणी होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचे कल हाती येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व २८५ मतदान केंद्रांवर २१ मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. या मतदारसंघाच्या मतांची मोजणी २४ मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्यावेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रियेशी निगडित गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतला आहे.

राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होणार आहे.

****

पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरुच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात देखील पेट्रोलचं अधिक उप्तादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सात ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष्य दररोज अंदाजे १ लाख ८८ हजार बॅरल इतकं वाढवायला तत्वतः सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. ओपेक संघटनेत आता २१ सदस्य आहेत.

**

दरम्यान, मार्शल आयलंडचा ध्वज असलेलं 'एमटी सर्व शक्ती' हे जहाज ४६ हजार ३१३ मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारताकडे येत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून हे जहाज १३ मे रोजी विशाखापट्टणम इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे.

****

पुण्यातल्या नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल नागपूर इथं बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी वेळेत दोषारोपपत्र दाखल होऊन खटला चालण्यासाठी सर्व पुर्तता जलदगतीने केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या कृत्याचा निषेध करत, ही घटना अतिशय क्लेशदायक असून मानवतेला कलंक असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी महिला आयोगाने राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाला पत्र लिहलं असून, तात्काळ कारवाई करण्याची विनंती केल्याचं रहाटकर यांनी सांगितलं.

पीडित बालिकेला आणि तीच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी बाल हक्क आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार असल्याचं आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सांगितलं.

**

नसरापूर इथली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणं क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत विद्यमान सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका करत अशा घटना घडू नयेत यासाठी राजकीय श्रेयवाद बाजूला ठेवून शक्ती कायद तातडीने लागू करावा,अशी मागणी देशमुख यांनी केली.

****

मध्य प्रदेशमध्ये जबलपूर इथं बार्गी धरण परिसरात जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३ वर पोहोचली आहे. बचाव पथकानं काल एका पाच वर्षीय मुलाचा आणि त्याच्या काकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे या दुर्घटनेनंतर बेपता झालेल्या सर्व १३ जणांचा शोध आता लागला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

देशभरात काल वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची ‘नीट’ परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडली. ५०० हून अधिक शहरांमधल्या परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा आणि बायोमेट्रिक पडताळणीनंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात ‘नीट-यूजी’ परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या ३४ परीक्षा केंद्रांवर एकूण १६ हजार २८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, त्यापैकी १६ हजार ७० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले.

****

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात बालेवाडी इथे झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

****

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सामाजिक माध्यमांवर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी स्व–नोंदणी किंवा घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देणं, या दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती न देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभरा खरेदीसाठी येत्या १५ मे पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य विपणन महासंघ आणि नाफेडद्वारे प्रति क्विंटल पाच हजार ८७५ रुपये दरानं हरभरा खरेदी सुरू होती. ही प्रक्रिया २९ एप्रिलपर्यंत सुरू राहणं अपेक्षित होतं, मात्र खरेदी पोर्टल २४ एप्रिल रोजी अचानक बंद करण्यात आलं, यामुळे नोंदणी केलेले शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असल्याचं मुंडे यांनी यासंदर्भातल्या पत्रात म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी, असं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी केलं आहे. जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत ३२ लाख ४७ हजार ९४ मतदारांपैकी २४ लाख १६ हजार ६१८ मतदारांचं मॅपिंग पूर्ण झालं आहे. 

****

परभणी इथं शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप काल तहसीलदार डॉ संदीप राजापुरे यांच्या उपस्थितीत झाला. परभणी इथल्या शिव स्वराज्य प्रतिष्ठान, आणि कोल्हापूर इथल्या शिवकानील युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या सात दिवसांच्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, मर्दानी खेळ, व्यायाम, योगा, वक्तृत्व प्रशिक्षण देण्यात आलं.

****

आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये यासाठी भूखंडाचे तुकडे करून लेआऊट केल्या प्रकरणी नाशिक पोलीसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलीसांनी १९४ भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४९ लेआऊट म्हणजेच अभिन्यासापैकी २१ प्रकरणातच फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते.

****

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर नव्यानं सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय राज्य सरकारनं रद्द करावा, अशी मागणी सकल मातंग समाजाचे समन्वयक मारोती वाडेकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा आणि मंत्रिस्तरीय उपसमिती नेमून त्यावर शिफारसी घेऊन त्यासंदर्भात शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

****

हवामान

पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. बुधवार आणि गुरुवारी बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४२ पूर्णांक चार तर छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. 

****

 

No comments:

Post a Comment