▼

Sunday, 3 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

दिल्लीत आज पहाटे वातानुकुलीत यंत्र अर्थात ‘एसी’चा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सुमारे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिल्लीतील विवेक विहार भागातील शाहदरा इथल्या चार मजली इमारतीत घडली. स्फोटानंतर इमारतीत भीषण आग लागली यात दहा ते बारा रहीवासी होरपळले असून चौघे जण जखमी झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चौदा गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. आता पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आलं आहे. घटनास्थळाहून चार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं शहादराचे पोलिस उपायुक्त राजेंद्र प्रसाद मीना यांनी सांगितलं. घटनास्थळी शोधकार्य अद्यापही सुरू आहे.

****

देशभरात आज वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा' ‘नीट’ पार पडत आहे. परीक्षा केंद्रांवर सकाळी अकरा वाजेपासून प्रवेश दिला जाणार आहे तर, दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा होणार आहे. माहितीपत्रकानुसार केंद्रात प्रवेशाची शेवटची वेळ दुपारी दीड वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

****

नीती आयोगावर डॉ. आर. बालसुब्रमण्यम् आणि डॉ. जोराम अनिया या दोन नवीन पूर्णवेळ सदस्यांची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. बालसुब्रम्हण्यम् आणि अनिया यांचा समृद्ध अनुभव आणि विविध विषयांची सखोल जाण धोरणनिर्मितीला अत्यंत बळकट करेल तसंच त्यांचं योगदान या प्रक्रियेला गती देण्यास साहाय्यभूत ठरेल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

****

देशातील गॅसची गरज पुर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून मार्शल आयलंडचा ध्वज असलेले 'एमटी सर्व शक्ती' हे एलपीजी टँकर होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून भारताच्या दिशेने सुरक्षितपणे रवाना झाले आहे. या जहाजावर १८ भारतीयांसह एकूण २० कर्मचारी असून, यात ४६ हजार ३१३ मेट्रिक टन ‘एलपीजी’ साठा आहे. हे जहाज १३ मे पर्यंत विशाखापट्टणम बंदरात पोहोचण्याची शक्यता असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

****

दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठीच्या केंद्र सरकारनं निर्धार केला असून ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याच निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. या मोहिमेदरम्यान सशस्त्र दलांनी दर्शवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे लष्कराच्या इतिहासात याची नोंद सुवर्ण अध्याय म्हणून केली जाईल असंही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत आयोजित शौर्य या कार्यक्रमाला संबोधित करताना सिंह बोलत होते. युद्धभूमी असो अथवा नैसर्गिक आपत्ती किंवा लोकांचा बचाव या सर्व ठिकाणी सशस्त्र दलं सर्वोत्तम काम करतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. या कार्यक्रमाला सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

****

भारतीय रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८९५ कोटीं रुपयांच्या प्रकल्पांना काल रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली. ‘मेट्रो रेल्वे’च्या क्षमता वाढीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे.

****

आज 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन'. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचे मूलभूत तत्त्व जपण्यासाठी आणि जगभरातील पत्रकारितेच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. १९९३ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिनाची घोषणा केली होती. 'शांततापूर्ण भविष्याची निर्मिती' ही या वर्षाच्या दिनाची संकल्पना आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि पत्रकारिता, मानवाधिकार तसंच 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' यांसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती व्यवस्था अधिक बळकट करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

****

डेन्मार्कच्या हॉर्सेन्स इथं झालेल्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदक जिंकलं आहे. २०२२ च्या सुवर्णपदकानंतर थॉमस कपच्या इतिहासातील आपलं दुसरं पदक भारतानं निश्चित केलं.

उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघ फ्रान्सकडून पराभूत झाला. दुखापतीमुळे लक्ष्य सेनची अनुपस्थिती संघाला महागात पडली. दरम्यान, पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ, थॉमस कपच्या समांतर चालणाऱ्या उबर कप २०२६ मध्ये गट फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही.

****

भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकत आपल्या नावावर केली आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं २०० धावांचं लक्ष्य ४१ पुर्णांक १ षटकांत गाठत नऊ गडी राखून विजय मिळवला.

****

मराठवाड्यासह कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील, विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि वीजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या स्थितीमुळे या भागासह मराठवाड्यातही उन्हाचा पारा अंशतः कमी झाला आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, नागालँड, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Post a Comment