Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 08
May 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२६ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल
आज जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९२ पूर्णांक ०९ टक्के लागला आहे. कोकण विभागाचा
निकाल सर्वाधिक ९७ पूर्णांक ६२ टक्के आहे तर कोल्हापूर विभाग ९५ पूर्णांक ४७ टक्क्यांसह
दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई ९४ पूर्णांक ९७ टक्के, नाशिक ९० पूर्णांक ५३ टक्के, तर छत्रपती
संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८८ पूर्णांक ४१ टक्के लागला आहे. विभागात
बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८ पुर्णांक ७० टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा
निकाल ८८ पूर्णांक १४ टक्के इतका लागला आहे, राज्यातून या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५५ हजारांहून अधिक
विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
आहेत. यंदाच्या निकालात १७९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत, यात सर्वाधिक
१०४ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
दहावीच्या निकालात यंदा मुलींनी
बाजी मारली असून ९४ पुर्णांक ९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८९ पुर्णांक
५६ टक्के मुलं परिक्षेत उत्तीर्ण झाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांना
गुणपडताळणीसाठी उद्यापासून २३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास
संस्था, डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल यांनी संयुक्तिरत्या काल ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘टॅक्टिकल
अॅडव्हान्स्ड रेंज ऑग्मेंटेशन’, टारा या शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी केली. संरक्षण
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टारा ही देशातली पहिली स्वदेशी ग्लाइड वेपन प्रणाली असून
ती अचूक लक्ष्यभेद करते.
****
आकाशवाणीच्या ९० व्या स्थापना
दिनानिमित्त आज दिल्लीसह विविध शहरांमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी, दूरदर्शन आणि
प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. दिल्ली इथं प्रसार भारतीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांची
उपस्थिती होती. आकाशवाणीला ९० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त विविध उपक्रमांचं
आयोजन करण्यात येत असल्याचं गौरव द्विवेदी यांनी सांगितलं.
बाईट- प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गौरव द्विवेदी
****
रेल्वेच्या जुन्या आरक्षण
प्रणालीवरुन अद्ययावत प्रणालीकडे वाटचाल करत असताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा
त्रास होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश रेल्वेमंत्री
अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. नवी दिल्ली इथं यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. १९८६ मध्ये सुरु झालेल्या आरक्षण प्रणालीत मागील वर्षात अनेक किरकोळ
बदल करण्यात आले आहेत, मात्र आता या प्रणालीची पूर्णपणे फेररचना करण्यात आली
असल्याचं त्यांनी सांगितलं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रवाशांच्या
क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असल्याचं वैष्णव यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, NPS च्या लाभधारकांची
संख्या मार्च महिन्यात २ कोटी १७ लाखांवर पोहोचली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास
प्राधिकरणाच्या नियमनाखालील या योजनेत सुमारे १६ लाख कोटी रुपयांपर्यंत ठेवी पोहोचल्या
आहेत. अटल पेन्शन योजनेचेही ८ कोटी ९६ लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. मे २०१५ मध्ये
सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा
व्यवस्था निर्माण करणे हा आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे उद्या नऊ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात
आलं आहे. जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र
दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई, भुसंपादन, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील
वाद, बँका आणि अन्य वित्तीय संस्थांमधील तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित आणि दाखलपुर्व
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
****
नांदेड शहरातील देगलूर नाका
भागातील चुनाभट्टी इथं काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ लाख ९८ हजार रुपयांचा
गुटखा जप्त केला.
****
No comments:
Post a Comment